Ankur Warikoo Driver Salary : प्रसिद्ध लेखक आणि कंटेंट क्रिएटर अंकुर वारिकू सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच लोकांना आर्थिक साक्षरता आणि गुंतवणुकीचे धडे देत असतात. त्यांचे अनेक व्हिडीओ आणि रिल्स व्हायरल होत असतात. नुकतीच त्यांनी त्यांच्या चालकाबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लिंक्डइनवर शेअर केलेली एक पोस्ट सध्या भलतीच चर्चेत आली आहे. “मी माझ्या चालकाला दरमहा ५३,००० रुपये पगार देत असून ही माझी सर्वोत्तम गुंतवणूक आहे”, असं वारिकू म्हणाले. या पोस्टवरुन नेटिझन्समध्ये दोन गट पडल्याचे पाहायला मिळाले आहे.

काय आहे वारिकू यांची पोस्ट?

अंकुर वारिकू यांच्या पोस्टनुसार, दयानंद नावाचे त्यांचे वाहन चालक गेल्या १३ वर्षांपासून त्यांच्या कुटुंबासोबत काम करत आहेत. सुरुवातीला १५,००० रुपये महिना पगारावर रुजू झालेल्या दयानंद यांचा सध्याचा मासिक पगार ५३,३५० रुपये आहे. याशिवाय त्यांना कुटुंबासाठी आरोग्य विमा, दिवाळीचा एक महिन्याचा बोनस आणि एक स्कूटी देखील देण्यात आली आहे. वारिकू म्हणतात, “दयानंद हे केवळ आमचे चालक नसून, आमच्या कुटुंबातील एक सदस्य झाले आहेत. आम्ही डोळे झाकून त्यांच्यावर विश्वास ठेऊ शकतो. मुलांचे क्लासेस असोत की घरातील महत्त्वाचे काम, त्यांना काहीही सांगावे लागत नाही.

जगात सर्वाधिक किमती वस्तू म्हणजे विश्वास!

अनेक युजर्सनी अंकुर वारिकू यांच्या या विचारांचे समर्थन केले आहे. सध्याच्या काळात ‘विश्वास’ सर्वाधिक अनमोल गोष्ट असल्याचे नेटकरी म्हणाले. अनेक व्यावसायिक आणि उद्योजकांनी लिहिलं की, अशा विश्वासू सहकाऱ्यांमुळे त्यांचा मानसिक ताण कमी होतो आणि मुख्य कामावर लक्ष केंद्रित करता येते. एका युजरने मत मांडले, “उदारता हा खर्च नसून विश्वासात केलेली दीर्घकालीन गुंतवणूक आहे. अशा नातेसंबंधांमुळे कामात टिकून राहण्याची वृत्ती वाढते.”

नेटिझन्सचा आक्षेप कशावर?

या पोस्टवर अनेक नोटिझन्सनी वारिकू यांनी वापरलेल्या ‘इन्व्हेस्टमेंट’ (गुंतवणूक) या शब्दावर अनेकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. एक युजरने तर स्पष्ट लिहिलंय की “१३ वर्षांच्या प्रामाणिक सेवेनंतर ५३,३५० रुपये पगार देणे ही कोणती ‘उदारता’ आहे? हा तर त्यांचा हक्कच आहे. खरं पाहता, दयानंद यांनी आपल्या आयुष्याची १३ वर्षे देऊन या कुटुंबात विश्वासाची गुंतवणूक केली आहे!” एका युजरने वारिकू यांच्या पोस्टवर कमेंट करताना लिहिले, “तुम्ही त्यांना फक्त पगार देत आहात, पण दयानंद यांनी इतकी वर्षे प्रामाणिक सेवा देऊन खरी गुंतवणूक केली आहे. एकजण म्हणतो, “१३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर हा पगार तसा सामान्यच आहे, त्यात फुशारकी मारण्यासारखे काही नाही.