Ankur Warikoo parenting tips : आजच्या बदलत्या काळात मुलांना चांगल्या संस्कारांसोबत पैशांचे महत्त्व आणि नियोजन शिकवणे आवश्यक झाले आहे. याबाबत अनेक पालक जागरुक झाले आहेत. मात्र, पाल्यांना हे कसे शिकवावे, हा प्रत्येक पालकासमोरील मोठा प्रश्न असतो. तुम्हाला देखील हीच अडचण येत असेल काळजी करू नका. प्रसिद्ध उद्योजक, लेखक आणि कंटेंट क्रिएटर अंकुर वारिकू यांनी आपल्या १५ आणि ९ वर्षांच्या मुलांचे संगोपन करताना स्वतः पाळलेले ‘३ सोपे गोल्डन रूल्स’ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे साधे नियम तुमच्या मुलांना अर्थसाक्षर होण्यास मदत करतील.
१. मुलांना पैसे नाहीत ऐवजी याची गरज नाही हे सांगा
वारिकू यांनी सोशल मीडियावर सांगितलंय, की ते त्यांच्या मुलांशी कधीही खोटं बोलत नाही. एखादी वस्तू मुलांनी मागितली तर आपल्याकडे पैसे नाहीत किंवा आपण गरीब आहोत, असं कधीही सांगितलं जात नाही. त्याऐवजी त्या वस्तूची आपल्याला खरच गरज आहे का? यावर आम्ही चर्चा करतो. मुलांना विश्वासात घेऊन समजावले तर ते नक्कीच ऐकतात. मित्राकडे एखादी महागडी वस्तू असेल तर ता आपल्याकडेही असावी हा अट्टाहस मुलांनी धरू नये. कोणतीही वस्तू खरेदी करताना ती केवळ इच्छा म्हणून नव्हे, तर खऱ्या गरजेपोटीच घेतली पाहिजे, हा विचार मुलांच्या मनात रुजवणे आवश्यक आहे.
२. मुलांना स्वावलंबी बनू द्या
अंकुर वारिकू यांच्या दुसऱ्या नियमानुसार, मुले जेव्हा एखाद्या अडचणीत अडकतात किंवा त्यांना एखादी गोष्ट जमत नसेल तर पालक लगेच मदत करायला पुढे सरसावतात. वारिकू म्हणतात, मुलांना स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवण्याची संधी दिली पाहिजे. उद्या जेव्हा मुले घराबाहेर पडून जगात पाऊल ठेवतील, तेव्हा प्रत्येक निर्णयासाठी त्यांना पालकांवर अवलंबून राहता येणार नाही. त्यामुळे अडचणींशी लढा देण्याचे स्वातंत्र्य त्यांना लहानपणापासूनच मिळायला हवे.
३. नात्यात मतभेद चालतील, पण अनादर नको!
तिसरा नियम हा घरातील कौटुंबिक वातावरण आणि नात्यांच्या मूल्यांशी संबंधित आहे. पालकांमध्ये अनेक मुद्द्यांवरुन मतभेद होऊ शकतात. अनेकदा मुलं समोर असतानाही हे घडू शकतात. वारिकू यांच्या मते, अशावेळी ऐकमेकांचा अनादर होणार नाही, याची काळजी घ्यावी. तुमची मुलं तुमचं अनुकरण करणार आहेत, हे लक्षात ठेवा. त्यामुळे वादविवाद होणे स्वाभाविक आहे, पण एकमेकांचा आदर राखणे अनिवार्य आहे, हा धडा मुलांना घरातूनच मिळतो.
मुलांना पॉकेटमनी देणे म्हणजे आर्थिक नियोजन शिकवणे नव्हे
पाल्यांना केवळ पॉकेटमनी देणे किंवा त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करणे म्हणजे उत्तम पालकत्व नव्हे. त्यांना पैशांचे आर्थिक मूल्य, समस्या सोडवण्याचे कौशल्य आणि नात्यांचा सन्मान करायला शिकवणे हीच पालकांनी दिलेली सर्वांत मोठी ‘आर्थिक’ शिकवण आहे.
