Zomato, Swiggy, Blinkit Employees Strike: विविध ॲप-आधारित डिलिव्हरी सेवांचे मुंबई आणि महाराष्ट्रातील कर्मचारीही गिग (ऑनलाईन डिलिव्हरी) कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी संपात सहभागी होण्याची शक्यता असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. गिग कामगारांच्या संघटनांनी पुकारलेल्या संपामुळे नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याबाबत मनीकंट्रोलने वृत्त दिले आहे.
तेलंगणा गिग अँड प्लॅटफॉर्म वर्कर्स युनियन आणि इंडियन फेडरेशन ऑफ ॲप-बेस्ड ट्रान्सपोर्ट वर्कर्स यांनी दावा केला आहे की, चांगला मोबदला मिळावा आणि कामाच्या परिस्थितीत सुधारणा व्हावी, या मागणीसाठी लाखो कर्मचारी या देशव्यापी संपात सहभागी होणार आहेत.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, “ॲप-आधारित फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मच्या कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी संपाशी संबंधित घडामोडींवर महाराष्ट्र पोलीस बारकाईने लक्ष ठेवून आहेत.”
एका अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, मुंबई आणि महाराष्ट्रातील विविध ॲप-आधारित डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवरील गिग आणि प्लॅटफॉर्म कर्मचारी या संपात सहभागी होण्याची शक्यता आहे. “या संपामुळे कोणत्याही मोठ्या समस्या निर्माण होण्याची शक्यता नाहीत, परंतु ॲप-आधारित डिलिव्हरी सेवांवर परिणाम होऊ शकतो”, असे ते म्हणाले.
या संपामुळे नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला सर्वाधिक मागणी असताना झोमॅटो, स्विगी, ब्लिंकिट, इन्स्टामार्ट आणि झेप्टोसारख्या फूड डिलिव्हरी आणि क्विक कॉमर्स कंपन्यांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
“कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस संपात सहभागी झालेल्या संघटना आणि संपाच्या आयोजकांशी चर्चा करत आहेत”, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
ऑनलाइन डिलिव्हरी कर्मचाऱ्यांच्या मागण्या
ॲमेझॉन, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट, स्विगी आणि फ्लिपकार्टसारख्या प्रमुख फूड डिलिव्हरी आणि ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवरील डिलिव्हरी कर्मचाऱ्यांनी यापूर्वी २५ डिसेंबर रोजीही संप पुकारला होता. कामगार संघटनांचा दावा आहे की, ऑनलाइन डिलिव्हरीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची परिस्थिती सतत बिघडत चालली आहे. त्यामुळे या कंपन्यांवर दबाव वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
कामगार संघटनांचा असा दावा आहे की, वेतन आणि कामाची उद्दिष्टे ठरवणाऱ्या अल्गोरिदमवर प्लॅटफॉर्म कंपन्यांचे अतिशय जास्त नियंत्रण आहे. त्यांचे म्हणणे आहे की, डिलिव्हरीची जोखीम कामगारांवर ढकलली जात आहे. तसेच डिलिव्हरी पोहोचवण्याची कालमर्यादा अधिक कठोर करण्यात येत आहे. याचबरोबर प्रोत्साहन भत्त्याच्या नियमांमध्ये सतत बदल होत आहेत.
संप पुकारलेल्या संघटनांनी एका निवेदनात म्हटले आहे की, मागणी जास्त असते तेव्हा आणि सणासुदीच्या काळात ग्राहकांना अन्न आणि पॅकेजेस पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे डिलिव्हरी कर्मचारी गंभीर समस्यांना तोंड देत आहेत. यामध्ये घटलेले उत्पन्न, कामाचे जास्त आणि अनिश्चित तास, वर्क आयडी अचानक ब्लॉक करणे आणि कर्मचाऱ्यांसाठी कोणत्याही मूलभूत सुरक्षा किंवा कल्याणकारी योजना नसणे यांचा समावेश आहे.
