Apple supplier Foxconn to Invest in India : अॅपल कंपनीसाठी आयफोन बनवणारी कंपनी फॉक्सकॉन त्यांच्या भारतातील युनिटमध्ये तब्बल १.४८ अब्ज डॉलर्सची (जवळपास १२,८०० कोटी रुपये) गुंतवणूक करणार आहे. फॉक्सकॉनच्या सिंगापूरस्थित युनिटने तमिळनाडूमधील युजान टेक्नोलॉजी (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड या फॉक्सकॉनच्याच युनिटमध्ये ही गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने त्यांच्या स्टॉक एक्सचेंज फायलिंगमध्ये (शेअर बाजाराला दिलेली माहिती) याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
अॅपलला भारतातील आयफोनची निर्मिती वाढवायची असल्याने इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाणार आहे. कंपनीला चीनवरील अवलंबित्त्व कमी करायचं आहे. त्यासाठी कंपनी भारत व व्हिएतनामसारख्या देशातील त्यांच्या युनिटवर अधिक लक्ष देत आहे. याच योजनेचा भाग म्हणून कंपनीने आता भारतात तब्बल १२,८०० कोटी रुपये गुंतवण्याचा निर्णय घेतला आहे.
अमेरिकेच्या बाजारात भारतात तयार झालेल्या आयफोन्सचा बोलबाला
अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) टिम कूक यांनी घोषणा केली आहे की “अॅपल कंपनी जूनच्या तिमाहित अमेरिकन बाजारात भारतात तयार करण्यात आलेले फोन मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देणार आहे”. म्हणजेच अमेरिकन बाजारात भारतीय बनावटीच्या आयफोन्सचं सर्वाधिक प्रमाण दिसेल. तर, चीनमध्ये तयार केलेले आयफोन इतर देशांमधील बाजारपेठांमध्ये उपलब्ध केले जातील. हळूहळू चीनमधील उत्पादन कमी करून भारतात उत्पादन वाढवणे हे अॅपलचे उद्दीष्ट आहे. फॉक्सकॉन कंपनी, टाटा इलेक्ट्रॉनिक्स व पेगाट्रॉन इंडिया (टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या मालकीची आणखी एक कंपनी) या कंपन्या भारतात आयफोनच्या निर्मितीत उतरल्या आहेत.
ट्रम्प यांच्या विरोधाकडे दुर्लक्ष?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आयफोनच्या भारतातील उत्पादनाला विरोध आहे. अलीकडेच त्यांनी अॅपल कंपनीला भारतात आयफोन न बनवण्याचं आवाहन केलं होतं. ट्रम्प यांनी अॅपलचे सीईओ टिम कुक यांना सांगितले आहे की भारताला स्वतःचे हितसंबंध सांभाळू द्या. तुम्ही अमेरिकेत उत्पादन करण्यावर भर द्या.
ट्रम्प म्हणाले, “मी अलीकडेच टिम कूक यांच्याशी बातचीत केली. त्यावेळी त्यांना म्हटलं की आम्ही (अमेरिकेचं सरकार) तुमच्याशी खूप चांगले वागतोय. पण मी ऐकलं की तुम्ही भारतात कारखाने उभारताय. तुम्हाला भारताला मदत करायची असेल तर ते ठीक आहे, पण भारत हा आपल्याकडून सर्वात जास्त कर आकारणाऱ्या देशांपैकी एक आहे. तिथे विक्री करणे कठीण आहे. त्यापेक्षा तुम्ही अमेरिकेत उत्पादन करण्याकडे लक्ष द्यावं.”