Tata Chemicals Kenya news President William Ruto exit order: सुमारे १०० वर्षांच्या खाणकाम परवान्यानंतर आता भारतीय उद्योग क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ‘टाटा केमिकल्स’ला केनियामधून गाशा गुंडाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. येथील सोडियम कार्बोनेट देशाबाहेर नेऊनही त्यावर स्थानिक पातळीवर प्रक्रिया उद्योग उभारण्यात टाटा अपयशी ठरल्याचा थेट आरोप केनियाचे राष्ट्राध्यक्ष विल्यम रुटो यांनी केला आहे. “टाटांनी आता आपले सामान भरावे आणि चालते व्हावे,” असा संतप्त इशारा देत रुटो यांनी कंपनीला देशातून बाहेर पडण्याचे निर्देश दिले.
दरम्यान, टाटा केमिकल्सने हे सर्व आरोप फेटाळून लावत नियमांचे काटेकोर पालन केल्याचा दावा केला आहे. द इंडियन एक्सप्रेसने याबाबतचे सविस्तर वृत्त दिले आहे.
आम्ही काय गुलाम आहोत का?
दक्षिण केनियातील मागाडी दौऱ्यादरम्यान एका जाहीर सभेत बोलताना राष्ट्राध्यक्ष रुटो यांनी टाटा समूहावर जोरदार टीका केली. “टाटांकडे गेल्या १०० वर्षांपासून खाणकामाचे हक्क होते; तरीही त्यांनी काजियाडो प्रांतात स्थानिक विकासासाठी काहीही केले नाही. ते आमची नैसर्गिक संसाधने भारत आणि जगभरात वाहून नेतात. आता काहीही झाले तरी चालेल, दिलेल्या अटी पूर्ण न केल्याने मी त्यांना निघून जाण्यास सांगितले आहे”, अशी प्रतिक्रिया राष्ट्राध्यक्ष रुटो दिली.
“आम्ही काय इतरांचे गुलाम आहोत का?”, असा संतप्त सवाल रुटो यांनी केला. स्थानिक पातळीवर काच आणि रासायनिक खतांच्या निर्मितीसाठी आता दोन नवीन कंपन्यांना पाचारण करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
केनिया सरकारचा नेमका आक्षेप काय?
काजियाडोचे गव्हर्नर जोसेफ ओले लेंकू यांनीही या निर्णयाला पाठिंबा दर्शवला. खाणकामाचे हक्क २०२३ मध्येच संपुष्टात आल्याचे सांगत ते म्हणाले, “इथून नैसर्गिक साधनसंपत्ती उत्खनन करणाऱ्यांना येथेच काच आणि रसायने तयार करणारे मोठे प्रक्रिया उद्योग उभे करावे लागतील.” केवळ कच्च्या मालाची निर्यात करून स्थानिक अर्थव्यवस्थेला डावलणे आता खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा स्थानिक प्रशासनाने दिला आहे.
टाटा केमिकल्सची भूमिका
टाटा केमिकल्सने केनिया सरकारच्या या दाव्यांचे खंडन केले आहे. कंपनीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “टाटा केमिकल्सने सर्व नियमांचे पूर्णपणे पालन करत असून संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून काम करत आहे. मंत्रालयाने उपस्थित केलेल्या सर्व मुद्यांवर कंपनीने सविस्तर व सर्वसमावेशक उत्तर सादर केले असून सरकारच्या अंतिम आदेशाची आम्ही वाट पाहत आहोत.” कायदेशीर आणि अधिकृत मार्गाने या वादावर तोडगा काढण्यास कंपनी कटिबद्ध असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. टाटा केमिकल्सने २००५ मध्ये ब्रुनर मोंड लिमिटेडकडून मागाडी प्रकल्पाची सूत्रे हाती घेतली होती.
सोडा अॅशचे जागतिक महत्त्व
काच, डिटर्जंट्स, रसायने आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी निर्मितीमध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक असलेला नैसर्गिक सोडा अॅश उत्पादनात केनियाचा जगात चौथा क्रमांक लागतो. जागतिक उत्पादनापैकी १ टक्के उत्पादन केनियातील काजियाडो प्रांतात असलेल्या मागाडी सरोवराच्या परिसरातून होते; जिथे टाटा गेल्या अनेक दशकांपासून कार्यरत आहे.
