ATM Cash Withdrawal Decline In India: बँकांचे शाखाबाह्य केंद्र असलेल्या ‘ऑटोमेटेड टेलर मशीन’ अर्थात ‘एटीएम’मधून रोख रक्कम काढण्याच्या प्रमाणात सरलेल्या २०२५ वर्षात मोठी घसरण झाल्याचे दिसून आले. ग्राहकांच्या मोठ्या रांगा अनुभवलेल्या एटीएमकडेच आता जनसामान्यांची पाठ फिरली असल्याचे दिसण्यामागे, प्रामुख्याने यूपीआय आणि रोकडरहित डिजिटल देयक व्यवहारांकडील वाढता कल कारणीभूत ठरला आहे. स्टेट बँकेबरोबरीनेच अनेक बड्या बँकांनी एटीएम व्यवहारावरील शुल्कात केलेल्या वाढीचा परिणाम म्हणून याकडे पाहता येईल.
देशातील विविध बँकांसाठी ७३,००० ‘एटीएम’चे व्यवस्थापन पाहणाऱ्या सीएमएस इन्फो सिस्टीम्सने ही माहिती बुधवारी पुढे आणली. मात्र, ग्राहक संख्या जरी घटली असली तरी प्रति व्यक्ती रक्कम काढण्याचे सरासरी आकारमान मात्र वाढ असल्याचे कंपनीच्या निदर्शनास आले आहे.
सीएमएस इन्फो सिस्टीम्सच्या अहवालानुसार, २०२५ मध्ये देशभरात प्रति एटीएम दर महिन्याला सरासरी वितरित होणारी रक्कम १.२१ कोटी रुपये होती. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये हे प्रमाण १.३० कोटी रुपये होते. याचा प्रति एटीएम दरमहा नऊ लाख रुपये कमी रक्कम सध्या काढली जात आहे.
लोकप्रिय डिजिटल देयक प्रणाली बनलेल्या युनिफाइड पेमेंट इंटरफेस अर्थात यूपीआयच्या माध्यमातून पार पडणाऱ्या व्यवहारांमध्ये वाढ होत आहे. यूपीआयच्या व्यवहारांनी नवीन उच्चांक गाठला आहे. इतर डिजिटल देयक असलेल्या क्रेडिट कार्ड्सच्या व्यवहारांमध्येदेखील जोरदार वाढ झाली आहे, विशेषतः ऑनलाइन. क्रेडिट कार्ड ई-कॉमर्स मंचावर होणाऱ्या व्यवहांरामध्ये वार्षिक आधारावर २२ टक्के वाढ झाली आहे.
वर्ष २०२५ साठीच्या सीएमएस उपभोग अहवालानुसार, एटीएममधून रक्कम काढण्याच्या प्रति व्यक्ती सरासरी आकारात ४.५ टक्क्यांनी वाढ होऊन ते २०२४ मधील ५,५८६ रुपयांवरून २०२५ मध्ये ५,८३५ रुपये झाले आहे. कर्नाटकातील प्रत्येक एटीएममधून सर्वाधिक सरासरी १.७३ कोटी रुपयांची रक्कम दरमहा काढण्यात आली. तर जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात हे प्रमाण सर्वात कमी ८३ लाख रुपये नोंदवले गेले. महानगरांच्या तुलनेत निम-शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये एटीएममधून रोख रक्कम काढण्याची प्रवृत्ती अधिक दिसून आली, जिथे २०२५ मध्ये प्रति एटीएम १.३० कोटी रुपये वितरित केले गेले, तर महानगरांमध्ये १.१८ कोटी रुपये आणि शहरी भागांमध्ये १.११ कोटी रुपये वितरित करण्यात आले.
अतिवृष्टी, उष्णतेची लाट आणि प्रदूषण यांसारख्या हवामानविषयक घटनांचा, तसेच सणांचा, एटीएममधून वितरित होणाऱ्या सरासरी मासिक रोख रकमेवर परिणाम दिसला आहे, असे कंपनीने म्हटले आहे.

