August Bank Holidays List Marathi: ऑगस्ट २०२६ मध्ये तुमचं बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचं काम असल्यास, ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या महिन्यात स्वातंत्र्यदिन आणि विविध सण-उत्सवांमुळं देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये बँकांना अनेक दिवस सुट्ट्या असणार आहेत. त्यामुळे ऐनवेळी होणारी धावपळ आणि गैरसोय टाळण्यासाठी आधीच बँकांच्या सुट्ट्यांचे वेळापत्रक तपासून नियोजन करणं सोयीचं ठरेल.
महिन्याचे सर्व रविवार तसेच दुसरा आणि चौथा शनिवार या नियमित सुट्ट्यां व्यतिरिक्त, विविध प्रादेशिक व धार्मिक सणांमुळं वेगवेगळ्या राज्यांत बँकांचं कामकाज बंद राहील.
१५ ऑगस्ट: स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरात बँका बंद
१५ ऑगस्ट २०२६ (शनिवार) रोजी भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरातील सर्व बँकांना सुट्टी असेल. हा राष्ट्रीय दिवस असल्याने संपूर्ण भारतात कोणत्याही बँकेच्या शाखेत प्रत्यक्ष कामकाज होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी आपली आर्थिक किंवा बँकेशी संबंधित तातडीची कामे या दिवसाआधीच पूर्ण करून घ्यावीत.
ऑगस्ट महिन्यातील प्रमुख सण आणि सुट्ट्या
स्वातंत्र्यदिनाव्यतिरिक्त ऑगस्ट महिन्यात केर पूजा, तेंडोंग ल्हो रुमफाट (सिक्कीमचा सण), पॅट्रियट्स डे (देशभक्त दिन), पारसी नववर्ष (शहेनशाही), महाराजा वीर विक्रम किशोर माणिक्य बहादुर जयंती, ईद-ए-मिलाद (मिलाद-उन-नबी), ओणम, रक्षाबंधन, पांग-ल्हाबसोल (सिक्कीमचा सण), श्री नारायण गुरु जयंती आणि अय्यनकाली जयंती यांसारख्या सणांनिमित्त विविध राज्यांत बँकांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत.
या सुट्ट्या राज्यनिहाय असल्याने देशभरात सर्वत्र एकाच वेळी बँका बंद राहणार नाहीत.
ऑगस्ट २०२६: राज्यनिहाय बँकेच्या सुट्ट्यांचे वेळापत्रक
४ ऑगस्ट: केर पूजेनिमित्त त्रिपुरामध्ये बँका बंद राहतील.
८ ऑगस्ट: तेंडॉन्ग ल्हो रम फातनिमित्त सिक्कीममध्ये बँकांना सुट्टी असेल.
१३ ऑगस्ट: देशभक्त दिनानिमित्त (Patriot’s Day) मणिपूरमध्ये बँका बंद राहतील.
१५ ऑगस्ट: स्वातंत्र्यदिनानिमित्त संपूर्ण देशभरात बँका बंद राहतील.
१९ ऑगस्ट: महाराजा वीर विक्रम किशोर माणिक्य बहादुर यांच्या जयंतीनिमित्त त्रिपुरामध्ये बँकांचे कामकाज बंद राहील.
२५ ऑगस्ट: ईद-ए-मिलाद / पहिला ओणम / मिलाद-इ-शरीफ निमित्त केरळ आणि आंध्र प्रदेशमध्ये बँकांना सुट्टी असेल.
२६ ऑगस्ट: ईद-ए-मिलाद / बारावफात / तिरुवोणम निमित्त महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, तामिळनाडू, उत्तराखंड, तेलंगणा, मणिपूर, जम्मू आणि श्रीनगर, झारखंड, छत्तीसगड, बिहार, नवी दिल्ली, उत्तर प्रदेश आणि केरळ या राज्यांमध्ये बँका बंद राहतील.
२८ ऑगस्ट: रक्षाबंधन / पांग-ल्हाबसोल / श्री नारायण गुरु जयंती / अय्यनकाली जयंती निमित्त गुजरात, मध्य प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, राजस्थान, उत्तर प्रदेश, जम्मू आणि श्रीनगर, केरळ आणि हिमाचल प्रदेशमध्ये बँका बंद राहतील.
डिजिटल बँकिंग सेवा सुरूच राहणार
या सर्व सुट्ट्यांचा परिणाम केवळ बँकेच्या प्रत्यक्ष शाखांमधील कामकाजावर होईल. इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, यूपीआय, आयएमपीएस, एटीएम आणि कार्ड पेमेंट यांसारख्या सर्व ऑनलाईन सुविधा २४ तास पूर्ववत सुरू राहतील.
नवीन खाते उघडणे, केवायसी जमा करणे, लॉकर सुविधा किंवा डिमांड ड्राफ्ट काढणे यांसारख्या कामांसाठी बँकेत जाणे आवश्यक असल्यास, आपल्या राज्यातील सुट्ट्यांचे वेळापत्रक पाहूनच बाहेर पडावे.
