नवी दिल्ली : पश्चिम आशियातील संघर्षामुळे वाढलेल्या इंधन किमतींच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी सोमवारी मासिक आढाव्यात आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांसाठीच्या विमान इंधन (एव्हिएशन टर्बाइन फ्युएल-एटीएफ) दरात तब्बल २७ टक्क्यांची कपात केली. मात्र देशांतर्गत विमान कंपन्यांसाठी एटीएफचे दर सलग दुसऱ्या महिन्यात स्थिर ठेवण्यात आले आहेत.

या कपातीनंतर आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांसाठी एटीएफचा दर प्रति किलोलिटर १,५०० डॉलरहून अधिक पातळीवरून सुमारे १,१०० डॉलरपर्यंत खाली आला आहे. मे महिन्यात या दरात ५.३३ टक्क्यांची वाढ झाली होती. जागतिक बाजारातील इंधनाच्या किमती मवाळ झाल्यानंतर त्याचा लाभ आता परदेशी विमान कंपन्यांना देण्यात आला आहे.

देशांतर्गत विमान कंपन्यांसाठी मात्र एटीएफचा दर प्रति किलोलिटर १,०४,९२७ रुपये इतकाच कायम ठेवण्यात आला आहे. एप्रिलमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय दरवाढीचा संपूर्ण भार विमान कंपन्यांवर टाकण्याऐवजी सरकार आणि तेल कंपन्यांनी नियंत्रित वाढीचा मार्ग स्वीकारला होता. त्यामुळे सध्या देशांतर्गत विमान कंपन्यांना बाजारभावापेक्षा कमी दराने इंधन मिळत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

विमान कंपन्यांना नेमका कसा फायदा?

विमान कंपन्यांच्या एकूण परिचालन खर्चात इंधनाचा वाटा साधारण ४० टक्के असतो. त्यामुळे एटीएफ दरातील मोठी घट ही विमान कंपन्यांसाठी थेट खर्च बचतीचे कारण ठरणार आहे. त्यामुळे इंधनाचे दर कमी-जास्त होण्याचा थेट परिणाम विमान कंपन्यांच्या नफ्यावर आणि तिकिटांच्या दरांवर होतो:

आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांचा खर्च घटणार: आंतरराष्ट्रीय हवाई कंपन्यांना प्रति किलोलिटर ४०० डॉलरची बचत होणार असल्यामुळे त्यांचा परिचालन खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होईल.

विमान तिकिटे स्वस्त होण्याची शक्यता: इंधनाचा खर्च घटल्यामुळे आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या परदेश प्रवासाच्या तिकिटांचे दर कमी करू शकतात. यामुळे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये किंवा आगामी काळात परदेशी जाणाऱ्या प्रवाशांना स्वस्त तिकिटांचा लाभ मिळू शकतो.

देशांतर्गत विमान कंपन्यांना अप्रत्यक्ष दिलासा: जरी देशांतर्गत विमान कंपन्यांसाठी दरात कपात झाली नसली, तरी मे महिन्यात जागतिक बाजारात प्रचंड वाढ झाली असतानाही भारताने त्यांचे दर वाढवले नव्हते. जर तेल कंपन्यांनी तेव्हा दर वाढवले असते, तर देशांतर्गत विमान तिकिटे प्रचंड महाग झाली असती. दर स्थिर राहिल्यामुळे देशांतर्गत विमान कंपन्यांना तिकीट दर न वाढवता प्रवासी संख्या टिकवून ठेवण्यात मदत झाली आहे.

विशेषतः पश्चिम आशियातील युद्धामुळे हवाई मार्गांमध्ये बदल, उड्डाणांचा वाढलेला कालावधी आणि इंधनावरील अतिरिक्त खर्च यांचा सामना करणाऱ्या विमान कंपन्यांना ही कपात महत्त्वाचा दिलासा मानली जात आहे.

व्यावसायिक एलपीजी पुन्हा महाग

दुसरीकडे हॉटेल, रेस्टॉरंट आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ४२ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीतील सिलिंडरची किंमत ३,११३.५० रुपये झाली आहे. मे महिन्यातच या सिलिंडरच्या किमतीत तब्बल ९९३ रुपयांची वाढ करण्यात आली होती.

१९ किलोचा व्यावसायिक सिलिंडर: दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ४२ रुपयांची वाढ झाली असून, आता एक सिलिंडर ३,११३.५० रुपयांना मिळणार आहे. १ मे रोजी यामध्ये ९९३ रुपयांची विक्रमी वाढ झाली होती, त्यानंतर ही सलग दुसरी वाढ आहे.

५ किलोचा व्यावसायिक सिलिंडर: यामध्ये ११ रुपयांची वाढ करण्यात आली असून नवा दर ८२१.५० रुपये झाला आहे.

घरगुती सिलिंडर (१४.२ किलो): सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा देत घरगुती सिलिंडरचे दर ९१३ रुपयांवर स्थिर ठेवण्यात आले आहेत.

पेट्रोल-डिझेल दर स्थिर

संपूर्ण महाराष्ट्रात पेट्रोलचा सरासरी दर साधारण ₹ १११.७८ ते ११२.४७ आणि डिझेलचा सरासरी दर ९८.४८ च्या आसपास स्थिर आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्येही कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर १०२.१२ रुपये, तर डिझेलचा दर ९५.२० रुपये इतका कायम आहे. दरम्यान, देशांतर्गत विमान कंपन्यांसाठी एटीएफचे दर बाजारभावापेक्षा कमी ठेवले जात असल्याने आणि पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती एलपीजीवरही तोटा सहन करावा लागत असल्याने सरकारी तेल कंपन्यांवर आर्थिक ताण कायम असल्याचे सूत्रांनी सांगितले. तेल मंत्रालयाच्या अंदाजानुसार मे महिन्यात या कंपन्यांचा दररोजचा एकत्रित तोटा सुमारे ६५० कोटी रुपये होता.