मुंबई: देशातील आघाडीची मालमत्ता व्यवस्थापन कंपनी ‘ॲक्सिस म्युच्युअल फंडा’ने नवीन ‘ॲक्सिस निफ्टी ५० इक्वल वेट्स इंडेक्स फंड’ ही निर्देशांकाधारित योजना बाजारात आणली आहे. या योजनेत गुंतवणूकदारांसाठी ३ जुलै २०२६ ते १७ जुलै २०२६ या कालावधीत गुंतवणूक करता येईल. या नवीन फंड प्रस्तुती अर्थात एनएफओ कालावधीत आणि त्यानंतरही किमान १०० रुपये आणि त्यानंतर १ रुपयाच्या पटीत गुंतवणूक करता येईल.ही योजना निफ्टी ५० इक्वल वेट इंडेक्स या निर्देशांकाच्या कामगिरीचा मागोवा घेईल.

या योजनेत निफ्टी निर्देशांकातील सर्व ५० आघाडीच्या ब्लू-चिप कंपन्यांमध्ये समान प्रमाणात निधी वाटप केला जाईल. यामुळे काही मोजक्या कंपन्यांवरील अवलंबित्व कमी होऊन गुंतवणूकदारांना संतुलित पोर्टफोलिओचा लाभ मिळेल. नंदिक मलिक आणि रोहित गौतम या योजनेचे निधी व्यवस्थापन पाहतील.पूर्व-निर्धारित नियमांच्या आधारे दर तिमाहीला या पोर्टफोलिओचे पुनर्संतुलन केले जाईल, ज्यामुळे वैयक्तिक पूर्वग्रहांना वाव राहणार नाही. २०१९-२० मध्ये या प्रकारच्या पॅसिव्ह योजनांची व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) सुमारे १०० कोटी रुपये होती, जी २०२५-२६ मध्ये जवळपास १०,००० कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

गुंतवणूकदार आता त्यांच्या मुख्य पोर्टफोलिओला कार्यक्षम आणि वैविध्यपूर्ण पॅसिव्ह गुंतवणूक पर्यायांची जोड देण्यास प्राधान्य देत आहेत. अशा प्रकारच्या गुंतवणूक धोरणांमुळे दीर्घकालीन कालावधीत स्थिर परतावा मिळण्यास मदत होईल, असे ॲक्सिस एएमसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, बी. गोपकुमार या योजनेसंबंधाने म्हणाले. पॅसिव्ह गुंतवणुकीच्या गरजा पूर्ण करू शकतील, अशा अष्टपैलू आणि मजबूत योजनांची निर्मिती करण्यावर पुढेही भर राहिल, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘ॲक्सिस म्युच्युअल फंडा’च्या या योजनेत दर तिमाहीला पोर्टफोलिओचे पुनर्संतुलन केले जाते. याचा फायदा असा की, ज्या कंपन्यांचे शेअर्स खूप वाढले आहेत, त्या विकून नफा वसूल केला जातो. मात्र ज्या कंपन्यांचे शेअर्स स्वस्त झाले आहेत, त्यामध्ये अधिक खरेदी केली जाते. ही प्रक्रिया आपोआप आणि नियमांनुसार होत असल्याने गुंतवणूकदाराला बाजाराच्या चढ-उताराचा चांगला फायदा मिळतो. त्यामुळे समान जोखीम असूनही ‘निफ्टी ५० इक्वल वेट इंडेक्स’ने वेगवेगळ्या कालावधीत नियमित ‘निफ्टी ५० इंडेक्स’पेक्षा अधिक आणि सरस परतावा दिला आहे आणि हे गेल्या काही वर्षांच्या आकडेवारीतून स्पष्टपणे दिसून येते.