आशीष थत्ते
Badmaash Company Movie Financial Strategy : उद्योगधंदा कसा करावा यापेक्षा तो कसा करू नये हेच जणू सांगणारा हा चित्रपट. ही कथा आहे चार मित्रांची. त्यातील एक अनुष्का शर्मा म्हणजे बुलबुल आणि करण म्हणजे शाहिद कपूर. स्त्री-पुरुष पात्रे आली म्हणजे ओघानेच प्रेमकथा आली पण तरीही हे दोघे मिळून आणि इतर २ मित्र म्हणजे झिंग आणि चंदू मिळून कायद्यातील पळवाटा शोधून आपला उद्योग कसा करतात हे दाखवले आहे. आणि हो यात चक्क डॉ. मनमोहन सिंगसुद्धा आहेत! जोपर्यंत पळवाटा शोधत होते तोपर्यंत ठीक आहे. पण नंतर ते लोकांना फसवण्याचा उद्योग करू लागले.
तो काळ १९९२ च्या आसपासचा दाखवला आहे, जेव्हा परदेशात बनलेल्या रिबॉकच्या बुटांवर १२० टक्के आयात कर लागू होता. करण म्हणजे शाहिद कपूरला एक वेगळीच कल्पना सुचते, तो बँकॉकवरून दोन हजार बूट मागवतो पण फक्त डाव्या पायांचे तेसुद्धा कलकत्ता येथील बंदरावर आणि तेच उजव्या पायांचे बूट मागवतो मद्रास येथील बंदरावर. आणि जेव्हा वस्तूंचे वितरण त्या त्या बंदरावर होते तेव्हा आपल्याला चुकीच्या वस्तू मिळाल्या आहेत, असे सांगून एकाच पायाच्या बुटांचा ताबा घेण्यास नकार देतो. सीमाशुल्क विभागाच्या नियमानुसार दोन महिन्यांनी हा नाकारलेला माल सार्वजनिकरीत्या लिलावात काढण्याची पद्धत असते. मग काय करण आणि त्याचे मित्र त्या लिलावात पोहोचतात आणि आपणच नाकारलेला माल परत विकत घेतात. दोन्ही पायांचे बूट आता त्यांच्या ताब्यात असतात जे मद्रास आणि कलकत्ता येथून मुंबई मध्ये आणतात त्यांच्या जोड्या बनवतात आणि आर्ची भाई नावाच्या विक्रेत्याला बाजारात असणाऱ्या किमतीपेक्षा कमी किमतीत विकतात आणि १० लाख रुपये फायदा कमावतात. हा उद्योग आता ते मोठ्या प्रमाणावर करू लागले होते. संशय येऊ नये म्हणून वेष बदलून प्रत्येक वेळेला वेगळ्या वेगळ्या बंदरावर आणि लिलावात जाऊन बूट एकत्र करण्याचे काम करू लागले.
ज्याला वित्त विषय समजतो तो हे जाणेल की, १२० टक्के कर वाचवून नक्की काय नफा कमावला. ज्यावेळेला परदेशातून वस्तू विकत घेऊन आपल्या देशात विकल्या जातात त्याला कंसाइनमेंटची लागत निश्चिती किंवा मालसाठ्याचे अकाउंटिंग असेदेखील म्हणतात. वस्तू आयात करणे म्हणजे त्याची मूळ किंमत मोजणे, त्यातील परकीय चलनाच्या किमतीचे चढ-उतार, इन्शुरन्स, मालवाहतुकीचे भाडे आणि भारतात आल्यावर येथील स्थानिक कर यांना लक्षात घेऊन वस्तूची विक्री किंमत ठरवावी लागते. चित्रपटात हा आयात कर वाचवण्यासाठी ‘कितने पापड बेलने पडे ये तो वो ही जाने!’ कमीतकमी दोन ठिकाणी तीन माणसे जाऊन मालाचा ताबा घेण्यास नकार देणे, मग पुन्हा लिलावाच्या ठिकाणी जाऊन लिलावात भाग घेणे आणि त्याचे पैसेसुद्धा देणे, सगळा माल दोन्ही ठिकाणाहून घेऊन मुंबईला आणून परत एकदा ‘असेम्ब्ली’ म्हणजे डावा आणि उजवा एकत्र करणे इत्यादी.
चित्रपटात दाखवल्याप्रमाणे सुरुवातीला मालाचे पैसे दिल्यानंतर डावे-उजवे एकत्र होईस्तोवर २ महिन्यांचा कालावधी जाऊ द्यावा लागला म्हणजे तेवढे दिवस पैसे अडकले होते. हे सगळे खर्च लक्षात घेऊन त्यासमोर १२० टक्के आयात कर वाचवल्यावर किती फायदा झाला तर १० लाख रुपये!
पैसे मिळाल्यावर अशाच पद्धतीने अजून काही व्यवहार केल्याचे दाखवले आहे. मग येतात अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग जे बुटांवरचा आयात कर १२० टक्क्यांवरून सरळ २० टक्क्यांवर आणतात. म्हणजे चारही मित्रांच्या लक्षात येते की, आपला उद्योग बंद. आता ते पुढील उद्योगासाठी अमेरिकेला जातात. जिथे त्यांना करणचा मामा जॅझ भेटतो, जो त्यांना मदत करतो. एका कंपनीशी ते करार करून १,००,००० हातमोजे म्हणजे ग्लोव्हसचे कार्यादेश मिळवतात. पण देताना मात्र जुन्याच आयडियाप्रमाणे फक्त उजव्या हाताचे हातमोजे देतो आणि आपली कंपनी गुंडाळून ते सगळे परागंदा होतात.
मग तेच फक्त उजव्या हाताचे हातमोजे कंपनीकडून कवडी मोलाने घेऊन दुसरीकडे ठेवलेले डाव्या हाताचे हातमोजे एकत्र करून त्याच कंपनीला मोठ्या प्रमाणावर नफा कमवत विकतात. चित्रपट म्हणून असे वित्तीय व्यवहार आपण मान्य करतो पण खऱ्या जगात असे व्यवहार होतीलच असे नाही. त्यात एक उपकथा म्हणून करणच्या वडिलांची जीवन गाथा सांगितली आहे. त्यांचे नावसुद्धा सज्जन असते, जी भूमिका अनुपम खेर यांनी साकारली आहे. एकाच कंपनीमध्ये इमानेइतबारे २५ वर्षे नोकरी केल्याचे फळ म्हणून कंपनीकडून होणारा सत्कार हे त्यांच्या आयुष्याचे फलित असल्याचे दाखवले आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा बँकॉकला जाऊन घरातल्या सगळ्यांसाठी भेटवस्तू आणतो आणि त्याला कुणीही प्रश्न विचारात नाही हे मात्र थोडेसे खटकते.
प्रत्येक वेळेला पैसे मिळाल्यानंतर चारही मित्र आपल्या आपल्या स्वभावानुसार ते कसे उडवायचे हे ठरवून आलेले असतात. पुढे जाऊन पुन्हा एकदा घर विकत घेणे आणि बँकेला बनवेगिरी करून पैसे कमावतात पण या वेळेला करणला ६ महिन्याची शिक्षा होते. शिक्षा भोगून तो वाल्याचा वाल्मीकी झालेला दाखवलेला आहे. तोच काय त्याचे इतर मित्रसुद्धा फसवेगिरी सोडून मेहेनतीच्या रस्त्यावर आल्याचे दाखवले आहे. पण नंतर जेव्हा त्याचा मामा अडचणीत सापडतो. तेव्हा आपली बुद्धी आणि व्यवहारचातुर्य दाखवून त्याला त्यातून सोडवतो. हे शेवटचे काही प्रसंग मात्र तुम्ही नेटफ्लिक्सवर जाऊनच चित्रपट बघा, पण अर्थातच वित्तीय नजरेतून!
- लेखक कॉस्ट अँड मॅनेजमेण्ट अकाउंटंट म्हणून कार्यरत
ashishpthatte@gmail.com
