मुंबई : टाटा इलेक्ट्रॉनिक्सनंतर वाहन निर्मिती क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘बजाज ऑटो’ला मोठ्या सायबर हल्ल्याचा फटका बसला आहे. कंपनीच्या मुख्य यंत्रणेवर ‘रॅन्समवेअर’ हल्ला झाल्याची माहिती समोर आल्यानंतर शेअर बाजारात बजाज ऑटोच्या समभागात तब्बल २.५ टक्क्यांची घसरण झाली. या पडझडीमुळे हा शेअर आजच्या व्यापारी सत्रात ‘निफ्टी-५०’ (Nifty) निर्देशांकात सर्वाधिक तोट्यात राहिलेला शेअर ठरला आहे.

बजाज ऑटोवर सायबर हल्ला कसा झाला?

बजाज ऑटोने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या मुख्य सर्व्हर आणि डेटा यंत्रणेला लक्ष्य करण्याचा प्रयत्न या सायबर हल्ल्याद्वारे झाला आहे. हा एक सुनियोजित रॅन्समवेअर हल्ला होता, ज्यामध्ये कंपनीचा डेटा ब्लॉक किंवा इनक्रिप्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेनंतर कंपनीच्या आयटी तज्ज्ञांनी तात्काळ पावले उचलत सायबर हल्ला रोखण्यासाठी आणि डेटा सुरक्षित करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली आहे. मात्र, या सायबर गुन्ह्यामुळे कंपनीच्या दैनंदिन कामकाजावर किंवा उत्पादनावर किती प्रमाणात परिणाम झाला आहे, याचा सविस्तर अंदाज घेतला जात आहे.

सायबर हल्ल्याच्या बातमीनंतर बजाज ऑटोचे शेअर्स कोसळले

सद्यस्थितीत कोणत्याही बड्या कॉर्पोरेट कंपनीवर होणारे सायबर हल्ले हे त्यांच्या व्यावसायिक गोपनीयतेसाठी आणि प्रतिमेसाठी मोठे आव्हान मानले जातात. बजाज ऑटोसारख्या मजबूत फंडामेंटल असलेल्या कंपनीसाठी हे तात्कालिक संकट असले, तरी सुरक्षेच्या कारणास्तव गुंतवणूकदारांनी काहीशी नफावसुली केल्याने शेअरवर दबाव पाहायला मिळाला. आगामी सत्रांमध्ये कंपनीकडून येणाऱ्या अधिकृत स्पष्टीकरणानंतरच या शेअरमधील पुढील दिशा स्पष्ट होईल.

सायबर तज्ज्ञांच्या मदतीने तपास सुरू

बजाज ऑटोने या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून, बाहेरील आघाडीच्या सायबर सुरक्षा तज्ज्ञांची आणि तपास यंत्रणांची मदत घेतली जात आहे. बॅकअप यंत्रणेच्या साहाय्याने प्रभावित झालेला डेटा आणि सिस्टीम पुन्हा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

सायबर हल्ल्याच्या वृत्तामुळे गुंतवणूकदारांनी विक्रीला प्राधान्य दिल्याने बजाज ऑटोचा शेअर २.५ टक्क्यांपर्यंत खाली आला. कंपनी आणि तिच्या उपकंपनीच्या  आयटी यंत्रणेला या रॅन्समवेअर सायबर हल्ल्याचा फटका बसला आहे. या तांत्रिक संकटामुळे बाजारात नकारात्मक वातावरण निर्माण झाले, ज्याचे थेट पडसाद शेअरच्या किमतीवर उमटले. या सायबर हल्ल्याचे वृत्त बाजारात धडकताच गुंतवणूकदारांमध्ये काहीशी चिंतेची लाट पाहायला मिळाली, ज्यामुळे आजच्या व्यापारी सत्रात बजाज ऑटोच्या समभागावर काही काळ दबाव दिसून आला.

बजाज ऑटोचा समभाग सध्या १.६३ टक्क्यांच्या घसरणीसह ₹१०,०२५.०० च्या पातळीवर व्यवहार करत आहे. या व्यापारी सत्रात शेअरने १०,२५९.०० चा उच्चांक आणि ९,९४९.०० का नीचांक गाठला होता. कंपनीची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी १०,८३४.०० तर नीचांकी पातळी ७,८५८.५० आहे. बाजार भांडवलाचा विचार केला तर, सुमारे २,८०,१९७ कोटींच्या एकूण बाजार मूल्यासह ऑटो क्षेत्रात कंपनी भक्कमपणे तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे.