Bajaj Housing Finance Share Listing Date and Time: बजाज फायनान्सची मालकी असलेल्या बजाज हाऊसिंग फायनान्सच्या बहुचर्चित आयपीओ नुकताच बंद झाला. या आयपीओला गुंतवणूकदारांनी तुफान प्रतिसाद दिला. या आयपीओने आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढत गुंतवणूकदारांकडून तब्बल ३.२० लाख कोटी रुपयांच्या बोली मिळविल्या. आता गुंतवणूकदारांना या कंपनीचा शेअर कधी लिस्टिंग होतो, याची उत्सुकता लागली आहे. १६ सप्टेंबर रोजी बीएसई आणि एनएसईवर शेअर लिस्टिंग होईल.

अनेक वर्षांनंतर बजाज समूहाची एखादी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होत आहे. पदार्पणातच ही कंपनी जोरदार सुरुवात करून गुंतवणूकदारांना चांगला नफा कमावून देऊ शकते, अशी शक्यता वर्तविली जात आहे. बजाज हाऊसिंग फायनान्सचा आयपीओ ९ ते ११ सप्टेंबर दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला होता. यावेळी प्रति शेअरची किंमत ६६ रुपये ते ७० रुपये एवढी होती. इनव्हेस्टरगेन या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार आता शेअर जेव्हा लिस्ट होईल, तेव्हा त्याची किंमत १४८ रुपयांवर पोहचू शकते. म्हणजेच ज्यांनी आयपीओमध्ये गुंतवणूक केली, त्यांचा पैसा दुप्पट होण्याची शक्यता आहे. ग्रे मार्कटे अर्थात जीएमपीवर सध्या शेअरची लिस्टिंग होईपर्यंत त्यावर ट्रेड केला जातो. जीएमपीच्या ट्रेडवरून हा अंदाज काढण्यात आला आहे.

हे वाचा >> विश्लेषण : उच्चांकी पातळीवर पोहोचलेला मुंबई शेअर बाजार ‘सेन्सेक्स’ पुन्हा का  कोसळला? पडझड किती काळ सुरू राहणार?

तीन लाख कोटीहून अधिकची बोली

बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आयपीओला ३.२० लाख कोटी रुपयांची बोली लागल्यामुळे एक नवा विक्रम प्रस्थापित झाला. यामुळे नायका आणि कोल इंडियाच्या आयपीओलाही बजाजने मागे टाकले. नायकाचा IPO नोव्हेंबर २०२१ साली बाजारात आला होता. त्यावेळी त्यावर २.४३ लाख कोटी रुपयांची बोली लागली होती. कोल इंडियाचा IPO २००८ साली आला होता. त्याच्यावर २.३६ लाख कोटींची बोली लागली होती. तर अलीकडे झोमॅटोच्या आयपीओलाही जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. या आयपीओला दोन लाखांहून अधिकच्या बोली मिळाल्या होत्या.

एकाच वेळी पाच कंपन्यांचे, त्यातही पीएनजी ज्वेलर्स, टॉलिन्स टायर्स सारख्या ‘आयपीओ’शी स्पर्धा असतानाही, बजाज हाऊसिंग फायनान्सच्या समभागांनी गुंतवणूकदारांकडून मिळविलेली दमदार मागणी लक्षणीय ठरते. अलिकडच्या काळातील सर्वाधिक ६७.४३ पट अधिक भरणा या ‘आयपीओ’मध्ये झाला. आयपीओतून मिळणाऱ्या निधीचा वापर बजाज हाऊसिंग फायनान्स कंपनीकडून भांडवली पाया मजबूत करण्यासाठी केला जाणार आहे.