Bangalore 50 Lakh Salary Cost : साधारणपणे श्रीमंत होण्यासाठी तुमचे उत्पन्न जास्त असावे असे समजले जाते. मात्र, आता हा नियम पुरेसा नाही. यापुढे तुम्ही कोणत्या शहरात राहता, त्यावरुन तुम्ही किती संपत्ती साठवू शकता हे ठरणार आहे. ५० ते ७० लाखांचे वार्षिक पॅकेज बहुतेक लोकांना स्वप्नवत वाटू शकते. पण, आयटी हब असणाऱ्या बंगळुरू शहरात राहणाऱ्या व्यक्तीला नाही. “इतका मोठा पगार मिळवूनही बंगळुरूतील महागड्या जीवनशैलीमुळे तुम्ही श्रीमंत होऊ शकत नाही,” असा खळबळजनक दावा टेक कर्मचारी अनमोल अगरवाल यांनी व्हिडीओद्वारे केला आहे. हा व्हिडीओनंतर सोशल मीडियावर ‘लाईफस्टाईल इन्फ्लेशन’ची चर्चा सुरू झाली आहे.
५० लाखांच्या पगाराचे ‘वास्तविक’ गणित
अनमोलने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओत ५० लाख रुपये कसे उडून जातात याचं वास्तवदर्शी चित्र मांडले आहे. तो म्हणतो, तुम्हाला ५० लाख रुपये पगार असला तरी कर, ईपीएफ कपातीनंतर वर्षाला सुमारे ३५ लाख रुपये प्रत्यक्षात हातात येतात. म्हणजेच महिन्याला ३ लाख इनहँड सॅलरी. बंगळुरूसारख्या शहरात चांगल्या भागात २बीएचके घराचे भाडे ६०,००० ते ७०,००० रुपये आहे. कामवाली मावशी आणि स्वयंपाकी यांच्यासाठी प्रत्येकी १०,००० रुपये. किराणा, जिम, खरेदी आणि प्रवासासह महिन्याचा खर्च १.२ ते १.३ लाख रुपयांपर्यंत पोहोचतो. कार घेतल्यास किमान ५०,००० रुपयांचा अतिरिक्त मासिक हप्ता. या सर्व खर्चांनंतर गुंतवणुकीसाठी महिन्याला फक्त १ लाख रुपयांच्या आसपास रक्कम शिल्लक राहते. मुलांचे शिक्षण आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या आल्यावर हा आकडा आणखी घसरतो, असा दावा अनमोलने केला आहे.
घरांच्या किमती आवाक्याबाहेर
५० लाखांचे पॅकेज म्हटल्यावर कुणीही स्वतःचे घर घेण्याचा सल्ला देईल. मात्र, तेही इथं सोपं नाही. अनमोल म्हणतात, “आज जे घर ३ कोटी रुपयांना मिळतेय, त्याची किंमत भविष्यात ६ ते ७ कोटी रुपये होईल. त्यामुळे पॅकेज वाढल्यानंतर घर घेऊ म्हणाऱ्यांच्याही ते आवाक्याबाहेरच राहील.” अशातच आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे (AI) नोकरीवर टांगती तलवार, रोज नवीन आव्हाने यामुळे वर्क लाईफ बॅलन्स बिघडत चालला आहे. अशा परिस्थितीत ‘टियर-३’ शहरांमधून ‘रिमोट वर्क’ करणे किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करणे हा अधिक फायदेशीर पर्याय ठरू शकतो, असा सल्लाही त्यांनी दिला.
दोष पगाराचा की जीवनशैलीचा?
अनमोल यांच्या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर दोन गट पडल्याचे कमेंटवरुन दिसत आहे. एक गट अमनोल यांच्या विचारांचे समर्थन करतोय, तर दुसऱ्या एका प्रवाहाचं म्हणणं आहे, की दोष पगाराचा नाही तर जीवनशैलीचा आहे. नेटकऱ्यांच्या मते, हा प्रश्न उत्पन्नाचा नसून ‘लाइफस्टाइल इन्फ्लेशन’चा आहे. एका युझरने लिहिले, “तुम्ही कितीही कमवा, जोपर्यंत योग्य बचत आणि गुंतवणुकीचे सूत्र शिकत नाही, तोपर्यंत श्रीमंत होऊ शकत नाही.” काही युझर्सनी अनमोलच्या लहान शहरांमधील राहण्याच्या कल्पनेचे समर्थन केले.
लाईफस्टाईल इन्फ्लेशन म्हणजे काय?
उत्पन्न वाढल्यावर आपला खर्चही त्याच प्रमाणात किंवा त्याहून अधिक वाढण्याच्या प्रवृत्तीला लाईफस्टाईल इन्फ्लेशन असे म्हणतात. उदा. पगार वाढला म्हणून १ बीएचके घरातून मोठ्या घरात शिफ्ट होणे. छोटी कारऐवजी एसयूव्ही खरेदी करणे. अशा परिस्थितीत उत्पन्न कितीही वाढले तरी बचत तेवढीच किंवा शून्य राहते. यामध्ये मोठी संपत्ती निर्माण करणे शक्य होणार नाही.
