Best Budget EV Cars India Marathi : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य वाहनचालकांचे बजेट बिघडले आहे. अशातच इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे आणखी गोंधळ वाढला आहे. भविष्यातही इंधनाच्या किमती अशाच वाढत राहणार आहेत. अशा परिस्थितीत, ‘इलेक्ट्रिक वाहन’ (EV) हा एक किफायतशीर पर्याय म्हणून समोर येत आहे. ई-कार्स केवळ चालवण्यासाठीच स्वस्त पडत नाहीत, तर त्यांचा देखभाल खर्चही पारंपारिक गाड्यांपेक्षा खूपच कमी असतो. जर तुमचे बजेट मर्यादित असेल आणि तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर बाजारात आता अनेक उत्तम पर्याय उपलब्ध आहेत.

१. टाटा टियागो इव्ही
भारतातील सर्वात परवडणारी आणि लोकप्रिय इलेक्ट्रिक हॅचबॅक म्हणून ‘टाटा टियागो इव्ही’कडे पाहिले जाते. शहरात दैनंदिन वापरासाठी ही कार अत्यंत सुटसुटीत आहे. या गाडीची एक्स-शोरूम किंमत ६.९९ लाख रुपये आहे. यामध्ये उत्तम केबिन स्पेस, अनेक आधुनिक फीचर्स आणि विश्वासार्ह बॅटरी पॅक मिळतो. टाटाच्या मजबूत सर्व्हिस नेटवर्कमुळे ही गाडी मध्यमवर्गीयांची पहिली पसंती बनली आहे.

२. एमजी कॉमेट इव्ही
तुम्हाला शहरात चालवण्यासाठी एक कॉम्पॅक्ट कार हवी असेल तर एमजी कॉमेट इव्ही यापेक्षा सरस पर्याय नाही. ७.६० लाख रुपये या कारची सुरुवातीची किंमत आहे. छोट्या आकारामुळे ही कार कुठेही सहज पार्क करता येते. याचे आधुनिक इंटिरिअर आणि डिजिटल फीचर्स तरुण ग्राहकांना आकर्षित करत आहेत. कमी अंतराच्या प्रवासासाठी हा एक चांगला बजेट पर्याय आहे.

३. टाटा पंच इव्ही
ज्यांना हॅचबॅकऐवजी बोल्ड लूक आणि एसयूव्हीसारखी हाय-ड्रायव्हिंग पोझिशन हवी आहे, त्यांच्यासाठी ‘टाटा पंच इव्ही’ हा एक दमदार पर्याय आहे. यासाठी तुम्हाला थोडं बजेट वाढवून ९.६९ लाख रुपये करावे लागेल. यात उत्कृष्ट ग्राउंड क्लीयरन्स, प्रगत तंत्रज्ञान आणि मोठी ड्रायव्हिंग रेंज मिळते. शहरात चालवण्यासोबतच लांबच्या प्रवासासाठीही ही गाडी परफेक्ट आहे.
४. सिट्रोएन ईसी३
फ्रेंच ऑटोमेकर सिट्रोएनची ही इलेक्ट्रिक हॅचबॅक कौटुंबिक वापरासाठी आणि आरामदायी प्रवासासाठी ओळखली जाते. या गाडीची एक्स-शोरूम किंमत सुमारे ११.९९ लाख रुपये आहे. या कारची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे याचे मोठे केबिन आणि आरामदायी सीट्स. भारतीय रस्त्यांचे खड्डे लक्षात घेता या गाडीचे सस्पेन्शन अतिशय उत्तम दर्जाचे मानले जाते.
५. टाटा टिगोर इव्ही
जर तुमचे स्वप्न एक स्टायलिश आणि आरामदायक इलेक्ट्रिक ‘सेडान’ कार खरेदी करण्याचे असेल, तर टिगोर इव्ही हा उत्तम पर्याय ठरेल. यात मोठी डिक्की, अनेक सुरक्षा फीचर्स आणि संतुलित ड्रायव्हिंग रेंज मिळते. व्यावसायिक आणि कौटुंबिक अशा दोन्ही वापरासाठी ही सेडान योग्य आहे. ही कार तुम्हाला १२.५० लाख रुपयांमध्ये मिळेल.
ईव्ही कधी फायदेशीर ठरेल?
नियमित प्रवास किमान ५० किलोमीटरपेक्षा जास्त असलेल्या ग्राहकांना ईव्ही चांगला पर्याय आहे. पण, तुम्ही कधीतरीच गाडी वापरणार असाल तर ईव्हीपेक्षा पेट्रोल किंवा डिझेल गाडी घेतलेलीच परवडेल. जरी ई-कारची सुरुवातीची किंमत थोडी जास्त वाटत असली, तरी दीर्घकाळाचा विचार केल्यास इंधन आणि मेंटेनन्सच्या खर्चात होणारी मोठी बचत तुमची मूळ गुंतवणूक वसूल करून देते. त्यामुळे मर्यादित बजेट असणाऱ्यांनी आपल्या गरजेनुसार वरील पर्यायांचा नक्की विचार करावा.
