मुंबई: केंद्र सरकारची ‘महारत्न’ आणि ‘फॉर्च्युन ग्लोबल ५००’ कंपनी असलेल्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या  अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी संजय खन्ना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या शोध-सह-निवड समितीच्या शिफारशीनुसार मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने या नियुक्तीला मान्यता दिली आहे. खन्ना हे पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून ३१ मे २०२९ पर्यंत (त्यांच्या सेवानिवृत्तीपर्यंत) किंवा पुढील आदेश येईपर्यंत या पदावर कार्यरत राहतील.

तेल शुद्धीकरण प्रकल्पांमधील कामकाज आणि प्रकल्प अंमलबजावणीचा प्रदीर्घ अनुभव असलेले खन्ना हे मूल्यवर्धित उत्पादने, पेट्रोकेमिकल एकात्मीकरण, कार्यात्मक कार्यक्षमता आणि दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षा यावर कंपनीचे धोरणात्मक लक्ष अधिक दृढ करतील, तसेच बदलत्या ऊर्जा क्षेत्रात शाश्वत वाढीसाठी कंपनीला दिशा देतील, अशी अपेक्षा आहे. खन्ना यांना तेल शुद्धीकरण आणि तांत्रिक सेवा क्षेत्रातील तीन दशकांहून अधिक अनुभव आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तिरुचिरापल्ली येथून केमिकल इंजिनीअरिंगची पदवी आणि मुंबई विद्यापीठातून वित्त व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी संपादन केलेले खन्ना यांनी बीपीसीएलची शुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल क्षमता मजबूत करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.

अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी त्यांनी संचालक (रिफायनरीज) म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी यापूर्वी बीपीसीएलच्या मुंबई आणि कोची येथील तेल शुद्धीकरण प्रकल्पांचे प्रमुख म्हणून कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि क्षमता विस्तारासाठी नेतृत्व केले आहे. कोची रिफायनरीचे कार्यकारी संचालक असताना त्यांनी करोना महामारीच्या आव्हानात्मक काळात बीपीसीएलच्या पहिल्या वैशिष्ट्यपूर्ण पेट्रोकेमिकल प्रकल्पाचे (प्रोपीलीन डेरिव्हेटिव्ह पेट्रोकेमिकल प्रकल्प) यशस्वी कार्यान्वयन केले, जो बीपीसीएलच्या पेट्रोकेमिकल प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला.गेल्या अनेक वर्षां बीपीसीएलच्या विविध तेल शुद्धीकरण प्रकल्पांमध्ये नवीन प्रक्रिया संच स्थापित करणाऱ्या अनेक प्रतिष्ठित प्रकल्पांचे नेतृत्व केले आहे,  

समूहातील इतर कंपन्यांच्या संचालक मंडळावर कार्यरत

भारत पेट्रो रिसोर्सेस लिमिटेड, पेट्रोनेट एलएनजी लिमिटेड आणि रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेडच्या संचालक मंडळावर कार्यरत असून ऊर्जा साखळीत बीपीसीएलचे स्थान अधिक मजबूत करत आहेत. याव्यतिरिक्त पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अंतर्गत तेल शुद्धीकरण केंद्रांच्या तांत्रिक समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहत असून भारताच्या तेल शुद्धीकरण क्षेत्रातील धोरणात्मक आणि तांत्रिक प्रगतीमध्ये योगदान देत आहेत.

बीपीसीएल ही फॉर्च्युन ग्लोबल ५०० यादीतील दुसऱ्या क्रमांकाची भारतीय तेल विपणन कंपनी असून, खनिज तेलाचे शुद्धीकरण व पेट्रोलियम उत्पादनांचे विपणन या क्षेत्रात कार्यरत असलेली एक एकात्मिक ऊर्जा कंपनी आहे. कंपनीला ‘महारत्न’ दर्जा प्राप्त झाला असून, यामुळे अधिक कार्यकारी व आर्थिक स्वायत्तता मिळाली आहे.