र्थसंकल्प हा सामान्यांपासून अगदी उद्योगपतींपर्यंत समाजातील प्रत्येक घटकाला स्पर्श करणारा असतो. त्याचा प्रभाव किंवा परिणाम प्रत्येक घटकांवर आपली छाप सोडून जातो. त्यामुळे अर्थसंकल्प हा आपल्या सर्वांसाठीच औत्सुक्याचा विषय आहे. मात्र या अर्थसंकल्प मांडण्याआधी किंवा त्याची सुरुवात करण्यासाठी विविध प्रथा-परंपरा पार पदव्या लागतात, किंवा बऱ्याचदा इतिहसत असे प्रसंग आलेत की, अर्थसंकल्पाशी संबंधित प्रथा-परंपरांना बाजूला ठेवत सादर करावा लागला. यापैकी काही घटनांची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.

पंतप्रधानांकडून अर्थसंकल्प सादर

सर्वसाधारणपणे देशाचे अर्थमंत्री संसदेत अर्थसंकल्प सादर करतात, असा प्रघात आहे. पण हा प्रघात मोडून तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंतप्रधान पदावर असताना पहिल्यांदा अर्थसंकल्प सादर केला. भारताच्या इतिहासात असे प्रसंग तीनदा आले आहेत, जेव्हा पंतप्रधानांनी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना दोन वेळा देशाचे अर्थमंत्री झाले. पहिल्यांदा त्यांनी २४ जुलै १९५६ ते ३० ऑगस्ट १९५६ या काळात अर्थमंत्रालयाचा कार्यभार सांभाळला.

दुसऱ्यांदा, जवाहरलाल नेहरूंनी १३ फेब्रुवारी १९५८ ते १३ मार्च १९५८ या कालावधीत अर्थ मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला. या दरम्यान नेहरूंनी पहिल्यांदा अर्थसंकल्प सादर केला. देशाच्या पंतप्रधानांनी अर्थसंकल्प सादर करण्याची ही पहिलीच वेळ होती. या अर्थसंकल्पात जवाहरलाल नेहरूंनी संरक्षण क्षेत्रावरील तरतूद कमी करून २७८.१४ कोटी रुपये आणि नागरी खर्चासाठी ५१७.८७ कोटी रुपयांची तरतूद केली होती. नेहरूंनी केवळ 29 दिवस अर्थमंत्रिपद सांभाळले. त्यावेळी नेहरूंनी पहिल्यांदा गिफ्ट टॅक्स लागू केला होता.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे दुसरे नाव येते. मोरारजी देसाई यांच्या राजीनाम्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अर्थमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली आणि १९७०-७१ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात इंदिरा गांधींनी अप्रत्यक्ष कराचा मोठा निर्णय घेतला, ज्याअंतर्गत सिगारेटवरील शुल्क थेट ३ टक्क्यांवरून २२ टक्के करण्यात आले. २८ फेब्रुवारी १९७० रोजी अर्थसंकल्प सादर करताना इंदिरा गांधींनी त्यांच्या भाषणात सांगितले होते की, यातून सरकारला १३.५० कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळेल.

तत्कालीन अर्थमंत्री व्हीपी सिंग सरकारमधून बाहेर पडल्यानंतर राजीव गांधी यांनी अर्थमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली आणि 1987-88 चा अर्थसंकल्प सादर केला. राजीव यांनी या अर्थसंकल्पात प्रथमच कॉर्पोरेट कराचा प्रस्ताव मांडला. हा किमान पर्यायी कर म्हणून ओळखला जातो. या करांतर्गत कंपनीने घोषित केलेल्या नफ्याच्या 30 टक्के कर भरण्याची तरतूद करण्यात आली आहे. राजीव गांधींनी यातून 75 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळण्याचा अंदाज व्यक्त केला.

अन् अर्थसंकल्पाची वेळ बदलली

स्वातंत्र्यपूर्व काळापासून म्हणजे १९२४ पासून भारताचा अर्थसंकल्प सादर केला जातो. तो फेब्रुवारी महिन्यातील शेवटच्या कार्यकारी दिवशी संध्याकाळी पाच वाजता अर्थसंकल्प सादर करण्यात आला, ही प्रथा सर बासिल ब्लॅकॅट यांनी १९२४ मध्ये सुरू केली होती. ती प्रथा १९९९ पर्यंत कायम होती. मात्र २००० मध्ये प्रथमच सकाळी ११ वाजता यशवंत सिन्हा यांनी अर्थसंकल्प सादर केले.तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात अर्थमंत्री असलेले यशवंत सिन्हा यांनी ही परंपरा बदलली आणि सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर केला.
एनडीए सरकारच्या काळात अर्थसंकल्पाबद्दल आणखी एक महत्त्वाचा बदल करण्यात आला. तो म्हणजे २०१७ पर्यंत फेब्रुवारी महिन्यातील शेवटच्या कार्यकारी दिवशी अर्थसंकल्प संसदेत मांडला जायचा. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात असलेले तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१७ पासून तो १ फेब्रुवारी रोजी मांडण्यास सुरुवात केली. यंदा १ फेब्रुवारीला रविवार असून देखील त्यादिवशी अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. शिवाय त्यादिवशी भांडवली बाजरातील व्यवहार देखील सुरू ठेवण्यात आले आहे.

‘हलवा’ समारंभ ते डिजिटल अर्थसंकल्प

अर्थसंकल्प तयार करण्यासाठी अर्थमंत्रालयातील अधिकारी जवळपास महिनाभर त्याची तयारी करतात. भारतीय संस्कृतीप्रमाणे कोणत्याही कार्याचा शुभारंभ तोंड गोड करून करण्यात येतो. आजपर्यंत प्रत्येक अर्थमंत्र्यांनी अर्थमंत्रालयातील नॉर्थ ब्लॉकमध्ये ‘हलवा’ समारंभ’ आयोजित करून मंत्रालयातील सर्व कर्मचा-यांना हलवा खाऊ घालण्याची परंपरा आहे. यांनतर अर्थसंकल्पाच्या छपाईला सुरुवात केली जात होती. मात्र २०२१ मध्ये करोना महामारीमुळे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच अर्थसंकल्प छपाई बंद करण्यात आली आणि त्याला डिजीटल स्वरुप देण्यात आले. केंद्रीय अर्थमंत्री निर्माला सीतारामन यांनी ‘युनियन बजेट मोबाइल अॅप’ सादर केले. सर्व खासदारांना डिजिटल स्वरूपात अर्थसंकल्पाची प्रत त्यावेळी देण्यात आली.

अर्थसंकल्प मोबाइल ॲपवर

मागील पाच अर्थसंकल्पाप्रमाणेच, २०२६-२७ चा केंद्रीय अर्थसंकल्प देखील कागदविरहित स्वरूपात सादर केला जाईल. सर्व केंद्रीय अर्थसंकल्पीय दस्तऐवज, खासदारांना आणि सामान्य जनतेला डिजिटल पद्धतीने ‘केंद्रीय अर्थसंकल्प मोबाइल ॲप’वर (युनियन बजेट मोबाइल ॲप) उपलब्ध होतील. हे ॲप द्विभाषिक (इंग्रजी आणि हिंदी) असून ते अँड्रॉइड आणि आयओएस अशा दोन्ही मंचावर उपलब्ध असेल. रविवारी संसदेत अर्थमंत्र्यांचे अर्थसंकल्पीय भाषण पूर्ण झाल्यानंतर, अर्थसंकल्पीय दस्तऐवज मोबाइल ॲप आणि वेबसाइटवर उपलब्ध होतील.

महिला अर्थमंत्री

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी मोरारजी देसाई यांच्या राजीनाम्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अर्थमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली आणि १९७०-७१ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकलप सादर करणाऱ्या त्या पहिल्या अर्थमंत्री होत्या. इंदिरा गांधी यांच्यानंतर स्वतंत्र महिला अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर करण्याची संधी निर्मला सीतारामन यांना मिळाली. ३१ मे २०१९ रोजी सीतारामन यांनी अर्थमंत्री म्हणून पदभार स्वीकारला.

सर्वाधिक अर्थसंकल्प मांडण्याचा मान

स्वतंत्र भारताच्या इतिहासात अर्थमंत्री म्हणून मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक अर्थसंकल्प सादर केले आहेत. देसाई यांनी १० अर्थसंकल्प सादर केले. त्यापाठोपाठ नऊ वेळा तत्कालीन पी.चिदंबरम (१९९६-९८, २००४-०९ व २०१३-१४) यांनी अर्थसंकल्प सादर केले आहेत. यशवंतराव चव्हाण, सीडी देशमुख आणि यशवंत सिन्हा (१९९८-२००३)यांनी प्रत्येकी सात वेळा अर्थसंकल्प सादर केला. डॉ. मनमोहनसिंग ((१९९१-९६) यांना सहा वेळा अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली. माजी अर्थमंत्री अरुण जेटली (२०१४-१९) यांनी पाच वेळा अर्थसंकल्प सादर केला. तर यंदा अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग नववा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

रेल्वे अर्थसंकल्पाचे एकत्रीकरण

संसदेत रेल्वेचा अर्थसंकल्प स्वतंत्रपणे मांडण्याची प्रथा १९२४ पासून सुरु होती. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे मांडला जाण्याची ९२ वर्षांची परंपरा रद्द केली. जेटली यांनी २०१७ मध्ये पहिल्यांदा अर्थसंकल्प आणि रेल्वेचा अर्थसंकल्प एकत्र सादर केला.अर्थसंकल्पात रेल्वे अर्थसंकल्प विलीनीकरणाच्या निर्णयानंतरही रेल्वे मंत्रालयाची व्यावहारिक स्वायत्तता कायम ठेवण्यात आली. त्यावेळी सुरेश प्रभू रेल्वेमंत्री म्हणून कार्यरत होते.

बजेट बॅगचा इतिहास आणि वर्तमान

ब्रिटीश चान्सलर विल्यम ग्लॅडस्टोन यांनी बजेट बॅगची परंपरा सुरु केली. बजेट हा शब्द ‘Bougette’ या फ्रेंच शब्दापासून तयार झाला आहे. या फ्रेंच शब्दाचा अर्थ होतो लेदर बॅग असा होतो. भारतात अर्थसंकल्प संसदेत अश्याच बॅग म्हणून आणण्याची परंपरा अव्याहतपणे सुरू होती. मात्र भारतात अर्थसंकल्पाची म्हणजेच बजेट बॅग एकाकडून दुसऱ्याकडे हस्तांतरित करण्याची प्रथा नाही. त्यामुळे प्रत्येक अर्थमंत्री वेगवगेळ्या प्रकारची लेदर बॅग घेऊन अर्थसंकल्प सादर करण्यास संसदेत पोहोचतो. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बॅगची प्रथा मोडीत काढून पहिल्या अर्थसंकल्पाच्यावेळी पोतडीत म्हणजेच लाल रंगाच्या कापडात अर्थसंकल्प घेऊन गेल्या. त्यांनतर सीतारामन यांनी करोनामुळे अर्थसंकल्पाची छपाई न करता डिजिटल स्वरूपात अर्थसंकल्प तयार केला, त्यामुळे त्यांनी लाल रंगाच्या कापडात अर्थसंकल्प न आणता त्यांनी करोनाकाळात राजमुद्रेचे चिन्ह आणि लाल रंगाचे कव्हर असणारी लॅपटॉप बॅग घेऊन अर्थसंकल्प सादर करण्यास पोहोचल्या होत्या.