Union Budget 2026 Mutual Fund Expectations: आगामी अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये रोखेसंलग्न म्युच्युअल फंडासाठी ‘इंडेक्सेशन’चा लाभ पुन:स्थापित करण्याच्या मागणीसह म्युच्युअल फंडांना राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेप्रमाणेच (एनपीएस) कर लाभांसहित निवृत्ती केंद्रित योजना सादर करण्याची परवानगी देण्याची विंनती ‘ॲम्फी’ने मंगळवारी केली.

किरकोळ आणि दीर्घकालीन गुंतवणूकदारांना अधिक दिलासा देण्यासाठी समभागसंलग्न अर्थात इक्विटी गुंतवणुकीवरील दीर्घकालीन भांडवली नफ्यावरील (एलटीसीजी) करमुक्त सवलतीची मर्यादा वाढवण्याची मागणी केली आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या केंद्रीय अर्थसंकल्पासाठीच्या शिफारसींमध्ये, समभागसंलग्न एलटीसीजीची करमुक्ततेची मर्यादा सध्याच्या १.२५ लाख रुपयांवरून, २ लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची विनंती म्युच्युअल फंड घराण्यांची शिखर संस्था असलेल्या असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स ऑफ इंडियाने (ॲम्फी) केली आहे.

म्युच्युअल फंड उद्योगात स्थिर दीर्घकालीन भांडवलाला प्रोत्साहन देण्यासाठी, पाच वर्षांपेक्षा जास्त काळ ठेवलेल्या युनिट्सवरील दीर्घकालीन भांडवली नफ्यातून सूट देण्याची शिफारस केली जाते. यामुळे गुंतवणूकदार दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक कायम ठेवतील, असे ॲम्फी म्हटले आहे.

तसेच म्युच्युअल फंडांच्या डेट योजनांसाठी दीर्घकालीन इंडेक्सेशन लाभ पुन्हा सुरू करण्याची विनंती केली आहे, जो २०२४ च्या अर्थसंकल्पात काढून घेण्यात आला होता. यामुळे दीर्घकालीन निश्चित उत्पन्न बचतीला प्रोत्साहन मिळेल; इतर दीर्घकालीन मालमत्तांशी समानता पुनर्संचयित होईल.

रोखे संलग्न साधनांमधील किरकोळ गुंतवणुकीला चालना देण्यासाठी, ॲम्फीने इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम अर्थात ईएलएसएसच्या धर्तीवर ‘डेट लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम’ सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे. तसेच इक्विटी-आधारित फंडांच्या व्याख्येत सुधारणा करून त्यात इतर इक्विटी फंडांमध्ये, विशेषतः परदेशी फंडांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ‘फंड ऑफ फंड्स’चा समावेश करण्याची सूचना केली आहे.

सध्या म्युच्युअल फंड घराण्यांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) डिसेंबरअखेर ८०.२३ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. सध्या आघाडीचे ५ म्युच्युअल फंड घराणे एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्तेपैकी ५६टक्के मालमत्ता व्यवस्थापित करतात.

एसबीआय म्युच्युअल फंड १२,७६,७८८ कोटींसह आघाडीवर आहे, त्यानंतर आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड १०,७६,३८० कोटींसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला. एचडीएफसी म्युच्युअल फंड ९,२४,८५४ कोटींसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड आणि कोटक महिंद्रा म्युच्युअल फंडाने अनुक्रमे ७,००,९५८ कोटी आणि ५,७३,३०७ कोटींच्या मालमत्तेसह पहिल्या ५ कंपन्यांमध्ये स्थान मिळवले. आघाडीच्या ५ म्युच्युअल फंड घराण्यांकडील व्यवस्थापनाखालील मालमत्ता ५,००,००० कोटींपेक्षा अधिक आहे.