मुंबई: भारतातील बांधकाम आणि पायाभूत सुविधा क्षेत्राची वेगवान प्रगती पाहता, जगातील सर्वात किफायतशीर आणि अभियांत्रित सामग्री म्हणून पुढील ५० वर्षांत तरी सिमेंटला कोणताही सक्षम पर्याय पुढे येताना दिसत नाही, असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन नॅशनल कौन्सिल फॉर सिमेंट अँड बिल्डिंग मटेरियल्सचे (एनसीबी) महासंचालक डॉ. एल. पी. सिंग यांनी बुधवारी केले.
जागतिक स्तरावर कार्बन उत्सर्जनासाठी मोठ्या प्रमाणावर जबाबदार मानल्या जाणारा सिमेंट उद्योग हा पर्यावरणपूरक नसला तरी, किफायतशीरता तसे मजबुती व टिकाऊपणाची कामगिरी पाहता, बांधकामातील महत्त्वाचा घटक म्हणून सिमेंटची जागा अन्य कशानेही घेतली जाणार नाही. तथापि सध्याच्या ७०० दशलक्ष टनांवरून चार पटीने वाढून देशांतर्गत सिमेंट उत्पादन क्षमता २०७० पर्यंत २,८०० दशलक्ष टनांवर जाणे अंदाजित असताना, सिमेंट निर्मितीच्या पद्धती अधिकाधिक पर्यावरणपूरक बनवण्याचा प्रयत्न राहिल.
मात्र सिमेंटचा वापर पूर्णपणे बंद होणार नाही, असे डॉ. सिंग यांनी सूचित केले.गोरेगावस्थित नेस्को संकुलात बुधवारी उद्घाटन झालेल्या ‘वर्ल्ड ऑफ काँक्रिट’ प्रदर्शनाच्या १२ व्या आवृत्तीच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर मुंबई महानगरपालिकेचे सह-मुख्य अभियंता (रस्ते विभाग) डॉ. विशाल ठोंबरे, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्र त्यागी, तंत्र-सल्लागार सुयोग केळुस्कर उपस्थित होते.
इन्फॉर्मा मार्केट्स इन इंडियाद्वारे आयोजित प्रदर्शनांत काँक्रिट, सीमेंट, बांधकाम सामग्री आणि पायाभूत तंत्रज्ञान परिसंस्थेतील ३५० हून अधिक देशी-विदेशी नाममुद्रांची दालने थाटण्यात आली असून, ५ जूनपर्यंत तीन दिवसांत १८ हजारांहून अधिक व्यापार प्रतिनिधींनी प्रदर्शनाला भेट देणे अपेक्षित आहे.
प्रत्येक १ टन सिमेंट उत्पादन प्रक्रियेतून, १.१२ टन कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण हे नवतंत्रज्ञानाचा वापर करून, आता ०.५६ टनांपर्यंत खाली आले आहे. सिमेंटसाठी लागणाऱ्या चुनखडीचा साठा मर्यादित असल्याने, औष्णिक वीज केंद्रातील राख अर्थात फ्लाय ॲश आणि स्लॅग यांचा वापर करून ‘ब्लेंडेड सिमेंट’ किंवा हरित सिमेंट बनविले जात आहे. अशी सिमेंट उत्पादनांतील पर्यावरणपूरक उत्क्रांती हाच आगामी काळात आपल्यापुढे असलेला एकमेव मार्ग आहे.
१०० टक्के कार्बनमुक्त सिमेंट तयार करणे आणि ते बाजारात परवडणाऱ्या दरात आणणे हे मोठे आव्हान आहे, असे डॉ. सिंग यांनी नमूद केले. २०७० साली ‘नेट झिरो’ लक्ष्य गाठले जायचे तर, फार तर कार्बन कॅप्चर टेक्नॉलॉजीद्वारे प्रक्रियेत उत्सर्जित होणारा कार्बन हवेत जाण्यापूर्वीच शोषून घेऊन, त्याचे व्यापारीकरण करणे हा शाश्वत उपाय आपल्यापुढे असल्याचे ते म्हणाले.
