मुंबई : देशातील सर्वात मोठी नॉन-फेरस (अलोह) धातू रिसायकलिंग करणारी कंपनी ‘सीएमआर ग्रीन टेक्नॉलॉजीज’चा प्रारंभिक समभाग विक्री आज, बुधवार ३ जूनपासून गुंतवणूकदारांसाठी खुला झाला आहे. ६३०.८८ कोटी रुपयांचा हा आयपीओ पूर्णपणे ‘ऑफर फॉर सेल’ प्रकारातील असून, गुंतवणूकदारांना ५ जून २०२६ पर्यंत यामध्ये पैसे गुंतवण्याची संधी असेल. दरम्यान, कंपनीने आयपीओ उघडण्यापूर्वीच ‘अँकर गुंतवणूकदारांकडून’ १८८.४ कोटी रुपये उभे केले आहेत.
ग्रे-मार्केटमध्ये ३२ टक्क्यांहून अधिक प्रिमियम
शेअर बाजारातील अनधिकृत ग्रे-मार्केटमधील संकेतानुसार, सीएमआर ग्रीनच्या शेअर्सना सध्या चांगली मागणी आहे. कंपनीचा शेअर अप्पर प्राईस बँडच्या (₹१९२) तुलनेत तब्बल ३२.८१ टक्के प्रिमियमसह (अंदाजे ₹२५५ वर) ट्रेड करत आहे. यामुळे लिस्टिंगच्या दिवशी गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कंपनीची आर्थिक कामगिरी आणि नफ्यात मोठी झेप
वर्ष २००६ मध्ये स्थापन झालेली ही कंपनी प्रामुख्याने ऑटोमोबाईल क्षेत्रातील बड्या कंपन्यांना रिसायकल केलेले अॅल्युमिनियम आणि झिंक अलॉयचा पुरवठा करते. कंपनीच्या आर्थिक अहवालानुसार, आर्थिक वर्ष २०२४ मधील ८३९ कोटी रुपयांच्या मोठ्या तोट्यातून बाहेर पडत कंपनीने मार्च २०२५ ला संपलेल्या आर्थिक वर्षात १५५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा (PAT) कमावला आहे. तसेच या काळात कंपनीचा एकूण महसूल ५,९६८ कोटींवरून वाढून ६,६९६.६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
ब्रोकरेज हाऊसेसचा काय आहे सल्ला?
एसबीआय सिक्युरिटीज – ‘सबस्क्राईब’ (खरेदी करा)
“सीएमआर ग्रीन ही भारतातील स्क्रॅप रिसायकलिंग क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे. तिची उत्पादन क्षमता (४.७ लाख MTPA) तिच्या सर्वात जवळच्या प्रतिस्पर्धी कंपनीपेक्षा तब्बल चार पटीने जास्त आहे. कंपनी आता ‘रॉट अॅल्युमिनियम’ आणि एक्सट्रूजन क्षेत्रात पाऊल टाकत असल्याने भविष्यात वाढीला मोठा वाव आहे. दीर्घकालीन फायद्यासाठी गुंतवणूकदारांनी या आयपीओमध्ये पैसे लावावेत. याशिवाय इतर प्रमुख ब्रोकरेज हाऊसेसच्या मते, कंपनी पूर्णपणे ‘ऑफर फॉर सेल’ आणत असल्याने आयपीओमधून मिळणारा सर्व पैसा सध्याच्या भागधारकांकडे जाईल, कंपनीच्या हातात नवीन भांडवल येणार नाही. परंतु, कंपनीचा व्यवसाय पर्यावरणपूरक असून वाहन उद्योगाकडून वाढत्या मागणीचा फायदा कंपनीला होत राहील.
ठळक मुद्दे : गुंतवणुकीचे गणित
आयपीओ कालावधी: ३ जून ते ५ जून २०२६
किंमत श्रेणी : ₹१८२ ते ₹१९२ प्रति शेअर
लॉट साईझ : किमान ७८ शेअर्स (एका लॉटसाठी ₹१४,९७६ ची गुंतवणूक आवश्यक)
एकूण आयपीओ आकार: ६३०.८८ कोटी (३.२८ कोटी शेअर्सची विक्री)
भागभांडवलाची बाजारातील नोंदणी (Listing): १० जून २०२६ (NSE आणि BSE वर)
नॉन-फेरस क्षेत्रातील आघाडीची कंपनी: अॅल्युमिनियम रिसायकलिंग बाजारात ४.७ लाख मेट्रिक टन क्षमतेसह देशात अव्वल.
तोट्यातून नफ्यात पुनरागमन: आर्थिक वर्ष २०२४ मधील तोटा पुसून २०२५ मध्ये १५५ कोटींचा नफा.
डिस्क्लेमर : आयपीओमध्ये गुंतवणूक करावी किंवा करू नये, अशी कोणतीही शिफारस लोकसत्ता करत नाही. समभाग बाजारातील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन असते. कोणताही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी कंपनीची आर्थिक स्थिती, जोखीम घटक, प्रॉस्पेक्टस तसेच आपल्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला अवश्य घ्यावा. आयपीओ किंवा समभागांच्या भविष्यातील कामगिरीची हमी देता येत नाही.
