मुंबई : सरकारी मालकीची कोल क्षेत्रातील दिग्गज कंपनी कोल इंडियाच्या ऑफर फॉर सेल (OFS) मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांना आज अखेरची संधी उपलब्ध आहे. केंद्र सरकारकडून कंपनीतील २ टक्क्यांपर्यंत हिस्सा विक्रीसाठी हा OFS आणण्यात आला असून, प्रति शेअर ४१२ अशी फ्लोअर प्राइस निश्चित करण्यात आली आहे. हा दर बाजारभावापेक्षा सुमारे १० टक्के कमी असल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष याकडे लागले आहे.

सरकारकडून सुरुवातीला १ टक्का हिस्सा विक्रीसाठी ठेवण्यात आला असून, अतिरिक्त मागणी आल्यास आणखी १ टक्का हिस्सा ‘ग्रीनशू ऑप्शन’द्वारे विकण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारला या व्यवहारातून सुमारे ५,००० कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे.

२७ मे रोजी संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी खुल्या झालेल्या या OFS ला चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्याच दिवशी जवळपास १९,००० कोटींच्या बोली प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे, कोल इंडियाने अलीकडील तिमाहीत मजबूत आर्थिक कामगिरी नोंदवली आहे. सातत्याने लाभांश देणारी सरकारी कंपनी (पीएसयू) म्हणूनही तिच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी हा OFS आकर्षक मानला जात आहे. मात्र, हरित ऊर्जा क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेमुळे भविष्यातील मागणीवर काहीसा दबाव येऊ शकतो, असे मत विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.

कोल इंडिया ही भारतातील एक अग्रगण्य सरकारी कंपनी असून सध्या तिचे एकूण मार्केट कॅप सुमारे २,८५,३६५ कोटी आहे, ज्यामुळे ती शेअर बाजारातील एक मोठी ‘लार्ज कॅप’ कंपनी म्हणून ओळखली जाते. परताव्याचा विचार केला तर या शेअरने वेगवेगळ्या कालावधीत गुंतवणूकदारांना संमिश्र ते उत्तम परतावा दिला आहे. गेल्या एका आठवड्यात कंपनीने सुमारे ०.९४% आणि एका महिन्यात २.३३% चा किरकोळ परतावा दिला असला, तरी गेल्या सहा महिन्यांत शेअरने २२.४८% ची चांगली झेप घेतली आहे. तसेच गेल्या एका वर्षाचा विचार केला तर गुंतवणूकदारांना सुमारे १५.७७% चा सकारात्मक परतावा मिळाला आहे आणि सध्या हा शेअर बाजारामध्ये साधारण ४६३ रुपयांच्या आसपास ट्रेड करत आहे.

विशेष म्हणजे, कोल इंडिया ही केवळ शेअरच्या वाढीसाठीच नाही, तर तिच्या उत्तम लाभांशासाठी (Dividend) ओळखली जाते. कंपनीचा डिव्हिडंड यील्ड सुमारे ५.७८% आहे, जो बँकेच्या एफडीपेक्षाही चांगला मानला जातो. त्यामुळे सातत्याने मिळणाऱ्या या लाभांशामुळे गुंतवणूकदारांचा एकूण परतावा आणखी मजबूत होतो.