वृत्तसंस्था, नवी दिल्ली – सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असलेल्या कोल इंडियाच्या संचालक मंडळाने तिच्या दोन उपकंपन्यांना भांडवली बाजारात सूचिबद्ध करण्याचा निर्णयावर मोहोर उमटवली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने महानदी कोलफिल्ड्स लिमिटेड (एमसीएल) आणि साउथ ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (एसईसीएल) या दोन कंपन्यांना सूचिबद्ध करण्यास तत्त्वतः मंजुरी दिली. त्यांनतर कोल इंडियाचा समभागाने ३ टक्क्यांची उसळी घेतली.

कोल इंडियाचा समभाग थेट ४१२.४० रुपयांपर्यंत वधारला होता. ही शेअरची सात महिन्यांतील सर्वोच्च पातळी आहे. १६ डिसेंबर रोजी कोळसा मंत्रालयाने कोल इंडियाला आगामी २०२७ या आर्थिक वर्षात दोन उपकंपन्यांच्या पुढील सूचीकरणासाठी ठोस पावले उचलण्याचा सल्ला दिल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. साउथ ईस्टर्न कोलफिल्ड्स ही मिनीरत्न कंपनी असून आजपर्यंत, एसईसीएलसाठी एकूण ३०.२८ कोटी टन प्रति वर्ष क्षमतेचे ७३ मोठे कोळसा प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत, ज्यासाठी ४४,५७१ कोटी रुपयांचे भांडवल मंजूर आहे.

या ७३ पैकी ३० प्रकल्प सध्या सुरू आहेत, तर ३८ प्रकल्प पूर्ण झाले आहेत. एसईसीएलने वर्ष २०२४-२५ मध्ये १६.७५ कोटी टन कोळशाचे उत्पादन केले. या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाचे कोळसा साठे छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये पसरलेले आहेत. तर दुसरी कंपनी असलेल्या महानदी कोलफिल्ड्स लिमिटेडची स्थापना १९९२ मध्ये साउथ ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडमधून करण्यात आली, ज्याचे मुख्यालय संबळपूर येथे आहे. त्याला २०१९ मध्ये मिनीरत्न दर्जा मिळाला.

भारत कोकिंग कोल लिमिटेड (बीसीसीएल) पुढील दोन आठवड्यांत १,३०० कोटी रुपयांची समभाग विक्री करण्याची शक्यता आहे, त्यामाध्यमातून कोल इंडिया बीसीसीएलमधील १० टक्के हिस्सा विक्री करणार आहे.

कोल इंडियाची कामगिरी कशी?

कोल इंडियाच्या समभागाने गेल्या एका आठवड्यात जवळपास ७ टक्के आणि गेल्या एका महिन्यात १० टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली आहे. तर गेल्या तीन वर्षांत ९१ टक्के वाढ वाढ झाली आहे.

GAURAV MUTHE
Voice : +91-77200 82845