मुंबई : भारतातील शीतपेय बाजारपेठेतील स्पर्धा अधिक तीव्र होत असताना अमेरिकेतील पेय क्षेत्रातील दिग्गज कंपनी कोका-कोलाने भारतीय बॉटलिंग व्यवसायाच्या संभाव्य प्रारंभिक समभाग विक्रीचा (आयपीओ) विचार सुरू केला आहे. कंपनीने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, तिची प्रमुख भारतीय बॉटलिंग कंपनी असलेल्या हिंदुस्तान कोका-कोला होल्डिंग्जला २०२७ मध्ये भांडवली बाजारात सूचिबद्ध करण्याची तयारी सुरू आहे.
या प्रस्तावित आयपीओअंतर्गत कंपनी भारतीय शेअर बाजारातील बीएसई आणि एनएसईवर सूचिबद्ध होण्याचा विचार करत असून, त्याचबरोबर बॉटलिंग व्यवसायातील काही हिस्सा विक्रीचाही पर्याय तपासला जात आहे. सध्या हिंदुस्तान कोका-कोला होल्डिंग्जमध्ये कोका-कोलाची ६० टक्के हिस्सेदारी आहे. २०२५ मध्ये भारतीय समूह ज्यूबिलंट भारती समूहाने कंपनीतील ४० टक्के हिस्सा विकत घेतल्यानंतर ही भागीदारी रचना अस्तित्वात आली.
१४ प्रकल्पांद्वारे देशभर व्यवसाय
वर्ष १९९७ मध्ये स्थापन झालेली हिंदुस्तान कोका-कोला होल्डिंग्ज ही कंपनी देशातील १० राज्यांमध्ये १४ बॉटलिंग प्रकल्प चालवते. कंपनीकडून कोका-कोला, थम्स अप, स्प्राईट, फँटा यांसारख्या लोकप्रिय शीतपेयांचे उत्पादन, पॅकेजिंग, वितरण आणि विक्री केली जाते. भारत ही कोका-कोलासाठी वेगाने वाढणाऱ्या प्रमुख बाजारपेठांपैकी एक मानली जाते. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये कंपनीने ५० अब्ज रुपये (सुमारे ५,००० कोटी रुपये) विक्री महसूल नोंदवला असून, किमान २०२१ नंतरची ही सर्वोच्च कामगिरी ठरली आहे.
अंबानींच्या ‘कॅम्प कोला’मुळे बाजारपेठ तापली; ‘रोथस्चाइल्ड’वर मोठी जबाबदारी
मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्सने ‘कॅम्प कोला’ बाजारात उतरवून अत्यंत आक्रमक किंमत धोरण राबवले आहे. यामुळे कोका कोला आणि पेप्सिको सारख्या प्रस्थापित ब्रँड्सना थेट आव्हान मिळाले आहे. रिलायन्सच्या याच आव्हानाला तोंड देण्यासाठी आणि भारतीय बाजारपेठेवर आपली पकड अधिक मजबूत करण्यासाठी कोका कोलाने हा मास्टरस्ट्रोक खेळल्याचे बोलले जात आहे.
या ऐतिहासिक आयपीओ प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी आणि योग्य सल्ला देण्यासाठी कोका कोलाने जागतिक वित्तीय सल्लागार संस्था ‘रोथस्चाइल्ड’ ची नियुक्ती केली आहे. पुढील काही महिन्यांत प्रक्रियेला वेग मिळण्याची अपेक्षा आहे.
कॅम्पा कोलामुळे स्पर्धा वाढली
दरम्यान, भारतीय शीतपेय बाजारपेठेत रिलायन्स समूहाच्या कॅम्पा कोलाच्या पुनरागमनामुळे स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे. आक्रमक किंमत धोरण आणि वितरण जाळ्याच्या जोरावर कॅम्पा कोला बाजारातील हिस्सा वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याने कोका-कोला आणि पेप्सीकोसारख्या कंपन्यांसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर कोका-कोलाच्या भारतीय बॉटलिंग व्यवसायाच्या सूचिबद्धतेकडे उद्योग क्षेत्राचे लक्ष लागले आहे. वृत्तसंस्था ब्लूमबर्गने यापूर्वी दिलेल्या वृत्तानुसार, या आयपीओमुळे कंपनीचे मूल्यांकन सुमारे १० अब्ज डॉलरपर्यंत जाऊ शकते.
बाजाराचे लक्ष आयपीओकडे
भारतातील ग्राहक वस्तू आणि शीतपेय क्षेत्रातील हा सर्वात मोठ्या आयपीओंपैकी एक ठरू शकतो. वाढती ग्राहक मागणी, ग्रामीण बाजारपेठेतील विस्तार आणि शीतपेय क्षेत्रातील स्पर्धा या घटकांच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांचे लक्ष आता कोका-कोलाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेकडे लागले आहे.
