मुंबई : येत्या काही तिमाहींमध्ये तांबे आणि ॲल्युमिनियम या औद्योगिक धातूंचे भाव प्रचंड भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मौल्यवान धातूंच्या (सोने-चांदी) तेजीनंतर आता बाजाराचे लक्ष या कमॉडिटी धातूंकडे वळले आहे. जागतिक पातळीवरील घडामोडी पाहता, भारतीय गुंतवणूकदारांनी यात गुंतवणूक करावी का? याविषयी घेतलेला हा सविस्तर आढावा

कमॉडिटी बाजारातील चक्रे सहसा एकाच वेळी तेजीत येत नाहीत. एका टप्प्यानंतर नेतृत्व बदलते आणि आता मौल्यवान धातूंनंतर औद्योगिक धातूंमध्ये मोठ्या तेजीची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः तांबे आणि अॅल्युमिनियम यांच्याकडे जागतिक गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले जात आहे.

गेल्या काही काळात सोने आणि चांदीने जोरदार परतावा दिला. सोन्याने ६० टक्क्यांहून अधिक तर चांदीने तब्बल १४८ टक्क्यांची झेप घेतली. मात्र आता या तेजीचा पुढचा टप्पा औद्योगिक धातूंमध्ये दिसू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

तांब्याला ‘AI आणि ऊर्जा क्रांती’चा आधार

तांबे हा आता केवळ औद्योगिक धातू राहिलेला नाही. इलेक्ट्रिक वाहनं, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डेटा सेंटर, सेमिकंडक्टर उद्योग, नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प आणि संरक्षण क्षेत्रात तांब्याची मोठ्या प्रमाणात गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे जागतिक मागणी वेगाने वाढत आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या अहवालानुसार २०११ ते २०२० या काळातील कमॉडिटी मंदीमुळे खाण क्षेत्रातील गुंतवणूक मोठ्या प्रमाणात घटली. नवीन तांबे खाणींचे शोध आणि उत्पादनवाढही मर्यादित राहिली. परिणामी आता पुरवठा आणि मागणीमध्ये मोठी तफावत निर्माण होत आहे.

विशेष म्हणजे नवीन तांबे खाण प्रकल्प सुरू होण्यासाठी अनेकदा १५ वर्षांहून अधिक कालावधी लागतो. त्यामुळे वाढती मागणी तात्काळ पूर्ण करणे कठीण ठरत आहे.

तांब्याची (Copper) मागणी का वाढतेय?

तांबे हा आता केवळ एक साधा औद्योगिक धातू राहिलेला नाही, तर तो भविष्यातील तंत्रज्ञानाचा कणा बनला आहे.

‘AI’ आणि डेटा सेंटर्स: प्रत्येक  कृत्रिम प्रज्ञा (AI) डेटा सेंटर, सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्प, आणि क्लाउड प्रकल्पांसाठी अवाढव्य प्रमाणात तांब्याची गरज भासत आहे.

ऊर्जा संक्रमण : इलेक्ट्रिक वाहने (EVs) आणि नूतनीकरणक्षम ऊर्जा प्रकल्पांमुळे तांब्याची जागतिक मागणी वेगाने वाढत आहे.

इराण संघर्षामुळे पुरवठा साखळीवर दबाव

पश्चिम आशियातील तणावामुळे तांबे उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या सल्फ्युरिक अॅसिडच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. जगातील जवळपास निम्मा समुद्री सल्फर पुरवठा मध्यपूर्वेतून होतो. होर्मूझ सामुद्रधुनीतील अडथळ्यांमुळे जागतिक पुरवठा आणखी ताणला गेला आहे. त्याचबरोबर जगातील सर्वात मोठा तांबे उत्पादक असलेल्या चिलीमध्ये पाण्याची टंचाई, उत्पादनातील अडथळे आणि नवीन उच्च दर्जाच्या खाणींचा अभाव यामुळेही पुरवठा मर्यादित राहिला आहे.

ॲल्युमिनियममध्येही तेजीचे संकेत

तांब्यासोबत ॲल्युमिनियममध्येही मोठ्या तेजीची चिन्हे दिसत आहेत. लंडन मेटल एक्स्चेंजवर (LME) अॅल्युमिनियमचे दर चार वर्षांच्या उच्चांकावर पोहोचले आहेत. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार चीनमधील स्मेल्टर्सवर ऊर्जा वापर आणि प्रदूषण नियंत्रणासाठी उत्पादन कपातीचा दबाव वाढत आहे. चीन हा जगातील सर्वात मोठा ॲल्युमिनियम उत्पादक असल्याने त्याचा जागतिक पुरवठ्यावर थेट परिणाम होऊ शकतो.

मॉर्गन स्टॅन्लेच्या मते, स्वच्छ ऊर्जा आणि टिकाऊ विकासाशी संबंधित मागणी वाढत असताना पुरवठा मर्यादित राहणार असल्याने अॅल्युमिनियमच्या किंमतींना मध्यम कालावधीत चांगला आधार मिळू शकतो.

भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावे?

भारतीय गुंतवणूकदारांचे लक्ष आता एमसीएक्सवरील (MCX) औद्योगिक धातूंवर वाढत आहे. एनरिच मनीचे सीईओ पोनमुडी आर यांच्या मते, एमसीएक्स अॅल्युमिनियममध्ये मजबूत तेजी कायम आहे. दैनंदिन चार्टवर “Higher High-Higher Low” रचना दिसत असून तेजीचा कल मजबूत असल्याचे संकेत मिळत आहेत. सध्या किंमती उच्च स्तरांजवळ स्थिरावत असल्याने ही नफा-वसुलीची प्रक्रिया असून कमजोरीचे संकेत नाहीत, असे ते म्हणाले.

त्यांच्या मते :

३९१ रुपये हा महत्त्वाचा ब्रेकआउट स्तर आहे
या पातळीवरील मजबूत बंदी मिळाल्यास नव्या तेजीची शक्यता
३८० ते ३७५ रुपये हा महत्त्वाचा सपोर्ट झोन
३७५ रुपयांखाली घसरण झाल्यास ३६५-३६० पर्यंत दुरुस्ती होऊ शकते

गुंतवणूकदारांनी “Buy on Dips” म्हणजेच घसरणीत खरेदीची रणनीती ठेवावी, असा सल्लाही त्यांनी दिला.

कमॉडिटी सुपर-सायकलची सुरुवात?

विशेष म्हणजे सध्या कमॉडिटी आणि अमेरिकी शेअर बाजारातील मूल्यांकन गुणोत्तर ऐतिहासिक नीचांकी पातळीवर आहे. इतिहासात अशा परिस्थितीनंतर अनेकदा दीर्घकालीन कमॉडिटी तेजी दिसून आली आहे. त्यामुळे तांबे आणि अॅल्युमिनियम हे पुढील काही वर्षांत गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी ठरू शकतात, असे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे.

(डिस्क्लेमर : कमॉडिटी बाजारातील गुंतवणूक जोखमीची असते. तज्ज्ञांचे मत हे त्यांचे वैयक्तिक मत असून गुंतवणुकीपूर्वी आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा.)