Couple Earning 4 Lakh Delays Baby Home Loan : महिन्याला जवळपास ४ लाख रुपयांची कमाई, तरीही अपत्य जन्माला घालण्याचा निर्णय पुढे ढकलला! वाचायला विचित्र वाटतंय ना? पण, एका जोडप्याने घरखरेदीसाठी घेतलेल्या अवाढव्य कर्जामुळे थेट मुल जन्माला न घालण्याचा मार्ग निवडला आहे. एका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागाराने सोशल मीडियावर मांडलेल्या या आर्थिक स्थितीनंतर एका वेगळ्या चर्चेला तोंड फुटले आहे. दिवसेंदिवस गगनाला भिडत असलेल्या घरांच्या किमती, लाइफस्टाइल इन्फ्लेशन आणि कर्जाच्या हप्त्यांचा व्यक्तिगत आयुष्यावर होणारा ताण यावर लोक बोलू लागले आहेत.

४ लाखांचे उत्पन्न आणि हातात उरतात केवळ ४२ हजार

एक्स (पूर्वीचे ट्विटर) या प्लॅटफॉर्मवर कानन बहल या युजरने ही पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये सेबी नोंदणीकृत वित्तीय सल्लागार विवेक एस. जी. यांनी आपल्या एका क्लायंटच्या आर्थिक नियोजनचा हिशोब मांडला. या जोडप्याची महिन्याची सर्व कर कापून निव्वळ कमाई ३.९६ लाख रुपये आहे. पण,, त्यांनी घेतलेल्या एका मोठ्या आर्थिक निर्णयामुळे त्यांचे संपूर्ण आर्थिक नियोजन कोलमडले आहे. या जोडप्याने नुकतेच ४ कोटी रुपयांचे एक आलिशान घर खरेदी केले. यासाठी पतीच्या वडिलांनी २ कोटी रुपयांची मदत केली, तर उर्वरित २ कोटींचे गृहकर्ज घेण्यात आले आहे.

महिन्याच्या बजेटची सद्यस्थिती

  • एकूण मासिक उत्पन्न: ३.९६ लाख रुपये
  • दैनंदिन व नियमित खर्च: १.८१ लाख रुपये
  • गृहकर्जाचा मासिक हप्ता : १.७३ लाख रुपये
  • हातात उरणारी मासिक बचत: ४२,००० रुपये

या ४२,००० रुपयांच्या बचतीलाही ‘मोकळा निधी’ म्हणता येत नाही. घरात नूतनीकरण आणि फर्निचरसाठी पुढील दोन वर्षांत तब्बल ७० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी ही ४२ हजार रुपयांची रक्कम ‘डेट म्युच्युअल फंड’मध्ये गुंतवली जात आहे. तरीही दोन वर्षांनंतर त्यांच्याकडे ६५ लाख रुपयेच जमतील, म्हणजे ५ लाख कमी पडतील. कदाचित त्यासाठीही वैयक्तिक कर्ज काढण्याची वेळ येऊ शकते.

मुल जन्माला घालणे परवडेल का?

दरमहा ४ लाख रुपयांची कमाई असूनही जोडप्याने मुलाला जन्म न देण्याचा निर्णय घेतला आहे. “मुलाच्या संगोपनाचा आणि शिक्षणाचा अतिरिक्त खर्च पेलणे सध्याच्या स्थितीत शक्य नसल्याने आम्ही निर्णय पुढे ढकलल्याचं” या जोडप्याचे म्हणणे आहे. या परिस्थितीवर बोलताना वित्तीय सल्लागार विवेक म्हणतात, “लोकसंख्या टिकवून ठेवण्यासाठी दोन मुले असण्याचा विचार तर सोडाच, लोक आता एकही मूल होऊ देत नाहीत. असे का? उद्या दोघांपैकी एकाची नोकरी गेली तर दुसऱ्याच्या उत्पन्नामध्ये ईएमआय परवडणार आहे का? एवढा प्रचंड हप्ता भरताना भविष्यासाठी आर्थिक सुरक्षा राहील का?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

विषयावरुन टेकऱ्यांमध्ये २ गट

  • या परिस्थितीवर नेटकऱ्यांमध्ये दोन गट पडल्याचे पाहायला मिळाले. एका युजरने लिहिले, “महिन्याला ४ लाख कमावणारे लोक मुलाचा खर्च पेलू शकतो की नाही याचे एक्सेल शीटवर गणित मांडत आहेत.” तर दुसऱ्या एकाने म्हटलं, की “४ लाख कमावून हातात ४२ हजार उरत असतील तर गृहकर्ज फक्त तुमचे पैसेच नाही, तर तुमचे अस्तित्व आणि आयुष्य बदलून टाकत आहे.”
  • अनेकांनी या जोडप्यावर टीकाही केली. एकाने म्हटलंय, “जर एखाद्या जोडप्यासाठी मुलांपेक्षा ‘घराचे फर्निचर’ जास्त महत्त्वाचे असेल, तर त्यांनी मूल न जन्माला घातलेलेच बरे. स्वतःच्या चकचकीत जीवनशैलीचा दोष महागाईवर ढकलणे चुकीचे आहे.”