Coversure Insurance Gift Cards Launch : दिवसेंदिवस वाढत असलेला वैद्यकीय आणि बदलती जीवनशैली यामुळे प्रत्येकाकडे विमा संरक्षण असणे ही काळाची गरज बनली आहे. अनेकदा आपल्याला वाटतं की आपल्या प्रियजनांकडे विमा कवच असावं. पण, काही कारणास्तव ते घेऊ शकत नाही. यापुढे ही समस्या कायमची संपणार आहे. आता लग्नकार्य, सण-समारंभात किंवा कॉर्पोरेट कार्यक्रमांमध्ये भेट म्हणून विमा कव्हर देता येणार आहे. ‘कव्हरशुअर’ या ‘इर्डा’ परवानाधारक वितरण कंपनीने पुढाकार घेतला आहे. तिने ‘ऑक्सिमनी’ या रिझर्व्ह बँकेचा परवाना असलेल्या पीपीआय संस्थेच्या सहकार्याने विशेष ‘इन्शुरन्स गिफ्ट कार्ड्स’ बाजारात आणले असून, त्यायोगे भेटवस्तू म्हणून विम्याचे कवच बहाल करणे शक्य बनले आहे.
देशातील १० लाख कुटुंबांना मिळणार विमा संरक्षण
भारतातील ७,५०० कोटी डॉलरच्या भेटवस्तू (गिफ्टिंग) बाजाराचा वापर विमा वितरणासाठी करण्याचा कंपनीचा हा प्रयत्न आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आगामी १२ महिन्यांत १०० कोटी रुपयांच्या विमा भेटवस्तूंचे मूल्य गाठण्याचे आणि देशातील १० लाख कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचे कव्हरशुअरचे लक्ष्य आहे.
विमा निवडीचे पूर्ण स्वातंत्र्य
‘विमा हे नेहमी विकला गेला आहे, कधीही भेट म्हणून दिला गेलेला नाही. आम्हाला हे चित्र बदलायचे आहे,’ असे कव्हरशुअरचे संस्थापक आणि सीईओ सौरभ विजयवर्गिया यांनी नवीन उपक्रमाचे अनावरण करताना सांगितले. कंपनीकडून प्रस्तुत गिफ्ट कार्डची रचना ‘स्टोअर्ड व्हॅल्यू कार्ड’सारखी (प्रीपेड कार्ड) असून, प्राप्तकर्ता आपल्या गरजेनुसार मुदत विमा म्हणजेच टर्म इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, मोटर इन्शुरन्स, ट्रॅव्हल किंवा पर्सनल ॲक्सिडेंट अशा कोणत्याही विम्याची निवड करून इच्छित सर्वेक्षण मिळवू शकतो. तसेच, या रकमेचा वापर नवीन पॉलिसी खरेदीसाठी किंवा विद्यमान पॉलिसीच्या नूतनीकरणासाठी करता येईल.
गिफ्ट कार्ड्स चार स्वरूपांत उपलब्ध होणार
भेट देणाऱ्या व्यक्तीला प्राप्तकर्त्याच्या जुन्या पॉलिसी किंवा वैद्यकीय गरजा माहित असण्याची आवश्यकता नाही. सध्या हे गिफ्ट कार्ड्स चार स्वरूपांत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये, कर्मचाऱ्यांचे रिवॉर्ड्स व सणासुदीच्या भेटवस्तूंसाठी – ‘कॉर्पोरेट क्लोज्ड-लूप गिफ्ट कार्ड’, वैयक्तिक आणि कर्मचाऱ्यांच्या कौतुकासाठी देता येणारे – ‘ओपन-एंडेड गिफ्ट कार्ड’ (१,००० रुपयांपर्यंत), कौटुंबिक व विशेष प्रसंगांसाठी – ‘ओपन-एंडेड गिफ्ट कार्ड (१,००० रुपयांपेक्षा जास्त)’ आणि प्रसंगांनुसार संदेश आणि विम्याचा प्रकार निवडण्याची सुविधा असलेले ‘डीआयवाय इन्शुरन्स गिफ्ट कार्ड’ यांचा समावेश आहे.कव्हरशुअरने यापूर्वी भारतीय टपाल विभागाच्या (इंडिया पोस्ट) सहकार्याने देशातील १५ शहरांमध्ये १०,००० हून अधिक बारकोड-सक्षम अंतर्देशीय पत्रांद्वारे #ChitthiAayiHai (चिठ्ठी आयी है) ही विमा जनजागृती मोहीम राबवली होती. नवीन इन्शुरन्स गिफ्ट कार्ड्स हा त्याच मोहिमेचा एक भाग असून, कॉर्पोरेट संस्था, कुटुंबे आणि मित्रांद्वारे विम्याचा प्रसार वाढवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
