सोन्याच्या वाढत्या किमती आणि आयात शुल्कात झालेली वाढ याचा फटका किरकोळ विक्रीला बसणार आहे. यामुळे देशातील संघटित सराफी क्षेत्रात चालू आर्थिक वर्षात किरकोळ सोने विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत १३ ते १५ टक्के टक्के घट होईल, असा अंदाज क्रिसिल रेटिंग्ज या पतमानांकन संस्थेने वर्तविला आहे.

क्रिसिलने आपल्या अहवालात म्हटले आहे की, देशात गेल्या वर्षी किरकोळ सोने विक्रीत ८ टक्के घट झाली होती. चालू आर्थिक वर्षात किरकोळ विक्रीतील घट ही १३ ते १५ टक्के असेल. असे असले तरी संघटित सराफी क्षेत्रात चालू वर्षात महसुलात २० ते २५ टक्के वाढ होईल. सोन्याच्या किमती वाढल्याने साठा ठेवण्याचा खर्च वाढला असून, बँकांकडून उसनवारीही वाढली आहे.

मात्र, महसूल आणि तरतला यात वाढ होणार असल्याने कर्जावरील अवंलबित्व कमी होईल. त्यातून नफा स्थिर होईल. भारताने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ७२० टन सोने आयात केले आणि त्यातून ७२ अब्ज डॉलरचे परकीय चलन देशातून बाहेर गेले. सोन्याच्या भावातील तेजी कायम असताना सरकारने व्यापारी तूट कमी करण्यासाठी आणि रुपयाला बळ देण्यासाठी सोन्यावरील आयात शुल्क ६ टक्क्यांवरून १५ टक्क्यांवर नेले. सोन्याची मागणी कमी होऊन आयातीला आळा बसावा, असा सरकारचा हेतू होता. यामुळे सोन्याची विक्री चालू आर्थिक वर्षात दशकभरातील नीचांकी पातळीवर येणार आहे. यात केवळ करोना संकट काळातील आर्थिक वर्ष २०२०-२१ अपवाद आहे, असे क्रिसिलने म्हटले आहे.

सोन्याच्या भावात ५५ टक्के वाढ

सरत्या आर्थिक वर्षात सोन्याच्या किमतीत ५५ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. यामागे भूराजकीय अनिश्चिततेमुळे जागतिक पातळीवर किमतीत झालेली वाढ आणि डॉलरच्या तुलनेत रूपयात झालेली घसरण कारणीभूत आहे. मागील दोन आर्थिक वर्षात गुंतवणूक पर्याय म्हणून सोन्याला पसंती वाढत असून, सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीत २५ टक्के घट झाली आहे. याचवेळी सोन्याच्या विटा आणि नाणी यांच्या विक्रीत ५० टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.

सरकारने सोन्यावरील आयात शुल्कात दुपटीहून अधिक वाढ केली आहे. यामुळे सोन्याच्या मागणीवर परिणाम होणार आहे. याचवेळी सोन्याला गुंतवणूक पर्याय म्हणून पसंती वाढत आहे. यातून सोन्याच्या विटा आणि नाण्यांना मागणी आहे. यामुळे सोन्याच्या एकूण मागणीत फार घट होणार नाही. मात्र, चालू आर्थिक वर्षात सोन्याच्या किरकोळ विक्रीत १३ ते १५ टक्के घट होऊन ती ६२० ते ६४० टनांवर येईल. – हिमांक शर्मा, संचालक, क्रिसिल रेटिंग्ज