पीटीआय, नवी दिल्ली
पश्चिम आशियातील संघर्षामुळे खनिज तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ झाल्याचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसणार आहे. यामुळे आशियाई विकास बँकेने (एडीबी) चालू आर्थिक वर्षात भारताच्या विकास दराचा अंदाज पूर्वअंदाजित ६.९ टक्क्यांवरून कमी करून, गुरुवारी ६.६ टक्क्यांवर आणला.
आशियाई विकास बँकेने चालू आर्थिक वर्षात भारताचा विकास दर ६.९ टक्के राहील, असा अंदाज एप्रिलमध्ये वर्तविला होता. आता बँकेने हा अंदाज कमी करून ६.६ टक्के केला आहे. बँकेने म्हटले आहे की, इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे उत्पन्नावर परिणाम होणार आहे. परकीय भांडवल आकर्षित करण्यासाठी सरकारचा धोरणात्मक हस्तक्षेप आणि इंधन कर कपात, लक्ष्याधारित अर्थसाहाय्य, भक्कम सेवा निर्यात आणि सार्वजनिक भांडवली खर्च यामुळे विकासाला पाठबळ मिळेल.
पुढील आर्थिक वर्षातील विकास दराचा ७.३ टक्के अंदाज मात्र बँकेने कायम ठेवला आहे. बँकेने म्हटले आहे की, जागतिक पातळीवर परिस्थिती सुधारत असून, व्यापार कररांमुळे निर्यातीत स्पर्धात्मकता वाढली आहे. मात्र, वाढते भूराजकीय तणाव आणि प्रतिकूल हवामानाचा कृषी क्षेत्रावर होणाऱा परिणाम या दोन बाबी चिंताजनक आहेत.
महागाईतही वाढ होणार
पश्चिम आशियातील युद्धामुळे जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या किमती वाढल्या आहेत. त्यातून इंधन, वाहतूक आणि खाद्यवस्तूंच्या किमती वाढणार आहेत. भारतात किरकोळ महागाईचा दर चालू आर्थिक वर्षात ५.२ टक्क्यांवर जाण्याचा अंदाज आहे. खनिज तेलाच्या वाढत्या किमती आणि कमकुवत रुपया या दोन गोष्टी महागाईतील वाढीला कारणीभूत ठरतील, असे बँकेने नमूद केले आहे.
सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था
भारताचा विकास दर चालू आर्थिक वर्षात ६.४ टक्के राहणे अपेक्षित आहे. यामुळे भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान कायम राखेल. खासगी क्रयशक्ती आणि सेवा क्षेत्राची सक्रियतेला गती मिळाल्याने अर्थव्यवस्थेला बळ मिळेल, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे.
