मुंबई : भारतीय शेअर बाजारातील तेजी, वाढती आर्थिक संपन्नता आणि पारंपरिक म्युच्युअल फंडांच्या पलीकडे जाऊन अधिक ‘कस्टमाइज्ड’ गुंतवणूक पर्याय शोधणाऱ्या श्रीमंत गुंतवणूकदारांमुळे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस (पीएमएस) उद्योगाने नव्या आर्थिक वर्षात दमदार झेप घेतली आहे. असोसिएशन ऑफ पोर्टफोलिओ मॅनेजर्स इन इंडियाच्या (एपीएमआय) एप्रिल २०२६ अहवालानुसार, पीएमएस उद्योगाच्या व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता ४२.२ लाख कोटी रुपयांवर पोहोचली असून, महिनाभरात त्यात २.१ टक्क्यांची वाढ झाली आहे.

‘कस्टमाइज्ड’ गुंतवणूक म्हणजे गुंतवणूकदाराच्या गरजा, उद्दिष्टे, जोखीम क्षमता आणि आर्थिक परिस्थितीनुसार खास त्याच्यासाठी तयार केलेली गुंतवणूक योजना असते. विशेष म्हणजे, मार्च महिन्यातील गुंतवणूक बाहेर पडण्याच्या ट्रेंडला एप्रिलमध्ये पूर्णपणे ब्रेक लागला. मार्चमध्ये ६४८ कोटी रुपयांची निव्वळ माघार झाली होती, तर एप्रिलमध्ये PMS उद्योगात तब्बल २५,०८८ कोटी रुपयांचा निव्वळ निधी ओघ दिसून आला. नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच उच्च उत्पन्न गटातील गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात बाजारात पुनरागमन केल्याचे हे संकेत मानले जात आहेत.

पीएमएस आता ‘लक्झरी गुंतवणूक’ नव्हे, तर संपत्ती नियोजनाचे साधन

एकेकाळी पीएमएस हा केवळ अतिश्रीमंत गुंतवणूकदारांचा पर्याय मानला जात होता. मात्र, गेल्या काही वर्षांत भारतीय गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन झपाट्याने बदलताना दिसत आहे. मोठ्या प्रमाणावर संपत्ती निर्माण झाल्यानंतर गुंतवणूकदार आता केवळ म्युच्युअल फंडांपुरते मर्यादित न राहता, वैयक्तिक पोर्टफोलिओ स्ट्रॅटेजी, अनलिस्टेड गुंतवणूक, थीमॅटिक इक्विटी आणि पर्यायी मालमत्ता वर्गांकडे वळत आहेत. याच पार्श्वभूमीवर पीएमएस उद्योग आता “वेल्थ मॅनेजमेंट” क्षेत्रातील महत्त्वाचा आधार बनत चालल्याचे एपीएमआयच्या आकडेवारीतून स्पष्ट होते.

एप्रिलमध्ये सूचिबद्ध इक्विटी मालमत्तेत १३.६ टक्क्यांची वाढ झाली, तर अनलिस्टेड अर्थात असूचिबद्ध इक्विटी गुंतवणुकीत तब्बल ३८.८ टक्क्यांची झेप दिसून आली. त्याहून महत्त्वाचे म्हणजे, अनलिस्टेड डेट गुंतवणुकीत १५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. यामुळे श्रीमंत गुंतवणूकदार आता खासगी बाजारपेठा, प्री-आयपीओ गुंतवणूक आणि पर्यायी मालमत्ता वर्गांमध्ये मोठ्या प्रमाणात रस दाखवत असल्याचे स्पष्ट होत आहे.

इक्विटीवरील विश्वास कायम

भारतीय शेअर बाजारातील जोरदार तेजीचा पीएमएस उद्योगाला मोठा फायदा झाला. एप्रिलमध्ये सेन्सेक्स ६.९ टक्क्यांनी वधारला, तर निफ्टी ५० निर्देशांकाने ७.५ टक्क्यांची झेप घेतली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांनी अनुक्रमे १३.८ टक्के आणि १९.६ टक्के वाढ नोंदवली. पॉवर, इन्फ्रास्ट्रक्चर, रिअल्टी, कॅपिटल गुड्स आणि मेटल क्षेत्रातील शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली. याच तेजीचा परिणाम पीएमएस योजनांमधील इक्विटी मालमत्तेवर झाला. उच्च जोखीम स्वीकारण्यास तयार असलेले गुंतवणूकदार अधिक परताव्यासाठी पीएमएस व्यवस्थापकांकडे वळताना दिसत आहेत.

परदेशी विक्री, पण भारतीय गुंतवणूकदारांचा मजबूत आधार

एप्रिलमध्ये परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी तब्बल ४१ हजार कोटी रुपयांची विक्री केली. जागतिक व्याजदर, अमेरिकन बाँड यिल्ड्स आणि भूराजकीय अनिश्चितता यामुळे विदेशी गुंतवणूकदार सावध भूमिका घेत असल्याचे दिसले. मात्र, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बाजाराला मजबूत आधार दिला. एसआयपीमधून येणारा सातत्यपूर्ण निधी, वाढते रिटेल गुंतवणूकदार आणि PF/EPFO सारख्या दीर्घकालीन संस्थात्मक गुंतवणुकीमुळे भारतीय बाजाराची अंतर्गत ताकद कायम असल्याचे चित्र दिसले. एपीएमआयच्या अहवालानुसार, देशांतर्गत गुंतवणूकदारांचा पीएमएस उद्योगातील हिस्सा ९५ टक्क्यांवर असून, PF/EPFO संस्थांचा मोठा वाटा अजूनही कायम आहे.

‘संपत्तीचे व्यावसायिक व्यवस्थापन’ ही नवी मानसिकता

भारतीय गुंतवणूकदार आता फक्त शेअर खरेदी-विक्रीच्या मानसिकतेतून बाहेर पडून “स्ट्रॅटेजिक वेल्थ अलोकेशन”कडे वळत आहेत. याचाच अर्थ पीएमएस उद्योग आता केवळ उच्च परताव्यासाठी घेतलेला जोखीमपूर्ण पर्याय नसून, संपत्तीचे व्यावसायिक आणि दीर्घकालीन व्यवस्थापन करणारे व्यासपीठ बनत आहे, असे एपीएमआयचे बोर्ड सदस्य विकास खेमाणी म्हणाले.

पुढील काळात मोठी संधी?

भारतामध्ये उच्च उत्पन्न गटाचा विस्तार, स्टार्टअप इकॉनॉमीमुळे निर्माण होणारी नवी संपत्ती आणि पर्यायी गुंतवणूक साधनांची वाढती लोकप्रियता पाहता पीएमएस उद्योगासाठी आगामी दशक अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते. विशेषतः, म्युच्युअल फंडांच्या तुलनेत अधिक वैयक्तिकृत गुंतवणूक धोरणे, अनलिस्टेड गुंतवणूक आणि थीम-आधारित पोर्टफोलिओ तयार करण्याची क्षमता पीएमएस उद्योगाला वेगळी ओळख देत आहे. त्यामुळे, एप्रिलमधील आकडे हे केवळ मासिक वाढीचे संकेत नसून, भारतीय संपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात सुरू झालेल्या मोठ्या संरचनात्मक बदलाचे प्रतिबिंब मानले जात आहे.

पीएमएस म्हणजे Portfolio Management Services अर्थात “पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवा”. ही अशी गुंतवणूक सेवा आहे ज्यामध्ये तज्ज्ञ फंड मॅनेजर एखाद्या गुंतवणूकदाराच्या वतीने शेअर्स, बाँड्स, डेट इन्स्ट्रुमेंट्स किंवा इतर मालमत्तेमध्ये थेट गुंतवणूक व्यवस्थापित करतात. म्युच्युअल फंडात अनेक गुंतवणूकदारांचा पैसा एकत्र गुंतवला जातो; पण PMS मध्ये तुमच्यासाठी स्वतंत्र पोर्टफोलिओ तयार केला जातो.

पीएमएस कसे काम करते?

  • गुंतवणूकदार PMS कंपनीकडे ठरावीक रक्कम गुंतवतो.
  • त्यानंतर प्रोफेशनल फंड मॅनेजर बाजारातील संधी पाहून गुंतवणूक करतो.
  • शेअर्स थेट गुंतवणूकदाराच्या डीमॅट खात्यात ठेवले जातात.
  • पोर्टफोलिओ गुंतवणूकदाराच्या जोखीम क्षमता आणि उद्दिष्टांनुसार तयार केला जातो.