Delhi Astrologer Annual Income 2.5 Crore : आजही अनेक लोकांची सकाळ वर्तमान पत्रातील भविष्य वाचून होते. करिअर, लग्न, नातेसंबंध किंवा आयुष्यातील इतर महत्त्वाचे निर्णय घेताना अनेक नागरिक ज्योतिषांचा सल्ला घेतात. मात्र, या मार्गदर्शनासाठी लोक नेमके किती पैसे मोजतात? असाच एक प्रश्न सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आला आहे. नीतू नावाच्या एका युजरने सोशल मीडियावर एका ज्योतिषाच्या वार्षिक कमाईचे गणित मांडले आहे. यातील कमाई पाहून भल्याभल्यांची डोळे पांढरे होतील.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर नीतू खंडेलवाल नावाच्या एका युजरने यासंदर्भातील माहिती शेअर केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत एक प्रसिद्ध ज्योतिषी आहेत. जे आपल्या ग्राहकांना २५,००० रुपयांचे वार्षिक पॅकेज ऑफर करतात. यामध्ये ३ वेळा प्रत्यक्ष ३० मिनिटे भेटण्याचा वेळ मिळतो. यामध्ये ते आयुष्यातील प्रत्येक समस्येवर मार्गदर्शन करतात.

वर्षाला २.५ कोटींचे उत्पन्न!

नीतू खंडेलवाल यांनी पुढे लिहिलंय, की त्यांच्या एका नातेवाईकाने या ज्योतिषाकडे नुकतीच नावनोंदणी केली आहे. “माझ्या नातेवाईकाने सांगितले की, सध्या या ज्योतिषाशी सुमारे १,००० ग्राहक जोडले गेले असून ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.” या आकडेवारीचा हिशोब लावल्यास, एका ३० मिनिटांच्या भेटीसाठी ग्राहकाला तब्बल ८,३३३ रुपये मोजावे लागतात. जर १,००० ग्राहकांनी हे वार्षिक शुल्क भरले, तर या ज्योतिषाची वार्षिक उलाढाल तब्बल २.५ कोटी रुपये इतकी होते!

पोस्टच्या शेवटी नीतू म्हणतात, की “हा ज्योतिषी फक्त लोकांचे ऐकून घेऊन आणि यशस्वी होण्यासाठी काहीही सामान्य सल्ले देऊन वर्षाला २.५ कोटी रुपये कमवतो. मला हे ‘बिजनेस मॉडेल’ खूप आवडले. तुमचा ज्योतिषावर विश्वास आहे का?”

सोशल मीडियावर ‘बिजनेस मॉडेल’चीच जास्त चर्चा

नीतू यांच्या या पोस्टवर अनेक प्रकारच्या कमेंट्स आल्या आहेत. नेटकऱ्यांनी जोतिषाशास्त्रापेक्षा कमाईवरच जास्त भाष्य केलं आहे. एकाने कमेंट केली, “मला ज्योतिषापेक्षा हे बिजनेस मॉडेल जास्त पटले आहे. १,००० ग्राहकांकडून २५,००० रुपये घेऊन २.५ कोटींचा महसूल मिळवणे ही मोठी गोष्ट आहे, भाकिते खरी ठरतात की नाही, हा पूर्णपणे वेगळा विषय आहे.”
दुसऱ्या एका युजरने लिहिले, “गुडगावमध्ये एका ऑनलाईन भेटीसाठी १०,००० रुपये घेणारे ज्योतिषी मी पाहिले आहेत. तो व्यक्ती दिवसाला २० ग्राहकांना मार्गदर्शन करतो. तसेच वैयक्तिक भेटी आणि वास्तू सल्ल्यासाठी तर अवाढव्य रक्कम आकारली जाते.”
तिसऱ्याने यात भर टाकत म्हटलंय, की “हा ज्योतिषी इतर अनेकांच्या तुलनेत स्वस्तच म्हणावा लागेल. मी काही ज्योतिषांना एकाच भेटीचे २५,००० रुपये आकारताना पाहिले आहे.”

अस्वीकरण : हा अहवाल सोशल मीडियावर शेअर केलेल्या आणि वापरकर्त्यांनी तयार केलेल्या मजकुरावर आधारित आहे. लोकसत्ताने या दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी केलेली नाही आणि संस्था त्यांचे समर्थन करत नाही.