मुंबई : प्राथमिक बाजारातील प्रारंभिक समभाग विक्रीच्या अर्थात ‘आयपीओ’च्या वाढत्या आकर्षणामुळे शेअर बाजारात नव्याने प्रवेश करणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या वाढत असून, ऑगस्टमध्ये देशातील नव्या ‘डिमॅट’ खात्यांच्या संख्येने सात महिन्यांतील उच्चांक गाठला. आघाडीचे रोखे आगार असलेल्या नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी (एनएसडीएल) आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (सीडीएसएल) या दोन्हीमध्ये मिळून ऑगस्टमध्ये सुमारे ३२.७ लाख नवीन ‘डीमॅट’ खाती उघडण्यात आली. जानेवारी २०२६ नंतरची ही सर्वाधिक मासिक वाढ आहे.

मे २०२६पर्यंत नव्या ‘डीमॅट’ खात्यांच्या संख्येत काहीशी मरगळ दिसून आली होती. मात्र, त्यानंतर सलग तिसऱ्या महिन्यात खात्यांची संख्या वाढली आहे. ऑगस्टअखेर देशातील एकूण ‘डीमॅट’ खात्यांची संख्या २३.७७ कोटींवर पोहोचली. मात्र, ही संख्या गुंतवणूकदारांची नसून खात्यांची आहे. एका व्यक्तीकडे एकापेक्षा अधिक ‘डीमॅट’ खाती असू शकतात. देशातील प्रत्यक्ष गुंतवणूकदारांची संख्या सुमारे १३.५ कोटींच्या घरात आहे.

आयपीओमधील तेजीचा मोठा वाटा

ऑगस्टमध्ये ‘आयपीओ’ आणि ‘ओएफएस’च्या माध्यमातून भांडवली बाजारात मोठ्या प्रमाणावर निधी उभारण्यात आला. महिनाभरात २३ आयपीओंमधून २२,४४८ कोटी रुपये, तर दोन ‘ओएफएस’च्या माध्यमातून भाग विक्रीकरून ३१,६६० कोटी रुपये उभारण्यात आले. प्राथमिक बाजारातील या वाढत्या हालचालीमुळे मोठ्या संख्येने नवीन गुंतवणूकदार बाजाराकडे वळल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

आयपीओमधील उत्साहाबरोबरच ‘मिडकॅप’ आणि ‘स्मॉलकॅप’ समभागांच्या चांगल्या कामगिरीमुळेही किरकोळ गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला. व्यापक बाजारातील अभूतपूर्व तेजी देखील खाते वाढीस कारणीभूत ठरली आहेत. ऑगस्टमध्ये ‘बीएसई मिडकॅप १५०’ निर्देशांक १.६ टक्के, ‘स्मॉलकॅप २५०’ २.४ टक्के, तर ‘मायक्रोकॅप २५०’ निर्देशांक ६.२ टक्क्यांनी वाढला. याउलट याच काळात सेन्सेक्स १.५ टक्के आणि निफ्टी १.२ टक्क्यांनी घसरला.

एनएसई, जिओच्या आयपीओकडे लक्ष आगामी काळात राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) आणि जिओसारख्या मोठ्या कंपन्यांचे प्रस्तावित आयपीओ बाजारात येण्याची शक्यता असल्याने ‘डीमॅट’ खात्यांची वाढ आणखी वेग घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्राथमिक बाजारातील तेजीचा परिणाम दुय्यम बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या सहभागावरही होण्याची शक्यता आहे.