अब्जाधीश गौतम अदाणी यांच्या नेतृत्वाखालील अदाणी समूहाने शेअर्स तारण ठेवून मिळवलेल्या रकमेतून २.१५ अब्ज डॉलरच्या कर्जाची परतफेड केल्याचे सांगितले जात आहे. आता फक्त कंपनीकडे ऑपरेटिंग स्तरावरचे कर्ज शिल्लक असल्याचीही माहिती आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात अदाणी समूहाकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. त्यात कंपनी कर्जाची परतफेड करण्यास सक्षम असल्याचे गुंतवणूकदारांना आश्वासन देण्यात आले आहे. आता एका अहवालात दावा करण्यात आला आहे की, अदाणी समूहाने बँकांकडे शेअर्स गहाण ठेवून घेतलेले संपूर्ण कर्ज फेडलेले नाही. आता कर्जफेडीचा हा अहवालच अदाणी समूहाने फेटाळून लावला आहे.
कर्ज परतफेडीचा अहवाल नाकारला
२.१५ अब्ज डॉलर कर्ज न भरल्याचा अहवाल अदाणी समूहाने फेटाळून लावला आहे. त्या अहवालाला तथ्यहीन आणि बनावट असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या अहवालामुळे अदाणी ग्रीन, अदाणी पोर्ट्स, अदाणी ट्रान्समिशन आणि अदाणी एंटरप्रायझेसमधील तारण ठेवलेल्या शेअर्समध्ये लक्षणीय घट झाली. ऑपरेटिंग कंपनी (OpCo) सुविधांच्या कर्जासाठी तारण ठेवलेले शेअर्सच आता फक्त बाकी आहेत. ६ फेब्रुवारीपासून तारण ठेवलेल्या शेअर्सची पूर्तता सुरू झाली. तेव्हापासून पहिल्या टप्प्यात १.११४ अब्ज डॉलर किमतीचे तारण शेअर्स, दुसऱ्या टप्प्यात १३४ दशलक्ष किमतीचे शेअर्स आणि तिसऱ्या मार्चमध्ये ९०२ दशलक्ष किमतीचे शेअर्स खरेदी केले गेले आहेत.
समूहाचे मूल्य १३५ अब्ज डॉलरने कमी झाले
अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्गने अदाणी समूहाविरोधात अहवाल दिला होता. यानंतर समूह कंपन्यांचे मूल्य १३५ अब्ज डॉलरने कमी झाले. अदाणी समूहाच्या वतीने हिंडेनबर्गचा अहवाल फेटाळताना समूहाला हानी पोहोचवण्यासाठी हा अहवाल तयार करण्यात आला असून, तो पूर्णपणे निराधार असल्याचे अदाणी समूहाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे.