Devi Parikh On AI Career Without PhD: संशोधन, शैक्षणिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रात १५ वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या भारतीय वंशाच्या एआय तज्ज्ञ देवी पारीख यांनी एआयमध्ये कारकिर्द घडवू इच्छिणाऱ्या तरुणांना काही सल्ले दिले आहेत. बिझनेस इनसाइडरला दिलेल्या मुलाखतीत देवी पारीख यांनी, एआय क्षेत्रात कारकिर्द घडवण्यासाठी आता पीएचडीची गरज उरली नाही, असे म्हटले आहे.
देवी पारीख यांनी मार्क झुकेरबर्ग यांच्या मेटा कंपनीत जनरेटिव्ह एआयच्या माजी संचालिका म्हणून अनेक वर्षे काम केले आहे. त्या आता एका एआय स्टार्टअपच्या सह-संस्थापिका आहेत.
या मुलाखतीमध्ये एआयबद्दल बोलताना देवी पारीख म्हणाल्या, “एआयबद्दलचा सर्वात मोठा गैरसमज म्हणजे, एआयमध्ये कारकिर्द घडवण्यासाठी पीएचडी आवश्यक आहे. काही क्षेत्रांमध्ये कारकिर्द घडवण्यासाठी पदवी महत्त्वाची असली तरी, अनेक इच्छुक व्यावसायिकांना स्टार्टअप्स, मोठ्या टेक लॅबमध्ये किंवा ओपन-सोर्स टूल्स आणि व्यावहारिक ऑनलाइन प्रकल्पांद्वारे मौल्यवान अनुभव मिळू शकतो.”
देवी पारीख कोण आहेत?
देवी पारीख या एआय तज्ज्ञ आहेत. त्यांनी या क्षेत्रात १५ वर्षांपेक्षा जास्त काळ काम केले आहे. त्या संशोधन, शैक्षणिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या युटोरी नावाच्या एआय स्टार्टअपच्या सह-संस्थापिका आहेत.
देवी पारीख यांनी २००४ मध्ये आयआयटी दिल्ली येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक पूर्ण केले. त्यानंतर २००७ मध्ये त्यांनी मेरीलँड विद्यापीठातून एमएस केले. पुढे २००९ मध्ये त्यांनी कार्नेगी मेलॉन विद्यापीठातून इलेक्ट्रिकल आणि संगणक अभियांत्रिकीमध्ये पीएचडी केली.
एआय स्टार्टअपची स्थापना
पीएचडी नंतर देवी पारीख यांनी काही वर्षे प्राध्यापिका म्हणून कार्य केले. पुढे २०१६ मध्ये त्या मेटाच्या FAIR लॅबमध्ये संशोधन शास्त्रज्ञ म्हणून रुजू झाल्या. २०२४ पर्यंत त्यांनी जनरेटिव्ह एआयच्या संशोधन संचालक आणि ज्येष्ठ संचालकपदापर्यंत मजल मारली. त्यांनी ParlAI, डान्स-जनरेशन मॉडेल्स, Make-A-Video (टेक्स्ट-टू-व्हिडिओ) आणि Phenaki सारख्या प्रकल्पांचे नेतृत्त्व केले आहे.
देवी पारीख यांनी २०२४ मध्ये युटोरी नावाच्या एआय स्टार्टअपची स्थापना केली. त्यांच्या या स्टार्टअपमध्ये नोकरी देताना उमेदवाराच्या पदवीपेक्षा वास्तविक जगातील अनुभव, मॉडेल प्रशिक्षण कौशल्ये आणि तांत्रिक मुलाखतींमधील कामगिरी यांना अधिक महत्त्व दिले जाते.
