Pranav Adani On Dharavi Redevelopment Project: अदाणी समूहातील कृषी आणि ऑयल व गॅस विभागाचे व्यवस्थापकीय संचालक प्रणव अदाणी यांनी महत्त्वाकांक्षी धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत महत्त्वाचे भाष्य केले आहे. आजतकला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्प सर्वात महत्त्वाच्या शहरी विकास प्रकल्पांपैकी एक असल्याचे म्हटले आहे.
प्रणव अदाणी यांनी यावेळी स्पष्ट केले की धारावीतील नागरिकांना नवीन घरांच्या चाव्या दिल्याशिवाय ते धारावीतील पुनर्विकासाचे काम सुरू करणार नाहीत. “प्रथम, आम्ही तुमचे घर बांधू, तुम्हाला नवीन घराच्या चाव्या देऊ, तुम्ही नव्या घरी स्थलांतरित झाल्यानंतरच आम्ही तुमची झोपडपट्टी तोडून पुनर्विकास करू”, असे प्रणव अदाणी म्हणाले.
गेल्या चार दशकांमध्ये अनेक प्रयत्न करूनही धारावीचा पुनर्विकास कधीच पुढे सरकला नाही. आता सुमारे दोन लाख नवीन घरे बांधण्याच्या ठोस योजनेसह प्रकल्प अखेर प्रगतीपथावर आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
सरकारच्या पुनर्वसन धोरणानुसार, २००० पूर्वीपासून धारावीत राहणाऱ्यांना धारावी पुनर्विकास परिसरातच नवीन घरे दिली जाणार आहेत. तर २००० नंतर धारावीत स्थलांतरित झालेल्यांना मुंबईत इतर ठिकाणी पर्यायी घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
यावेळी प्रणव अदाणी यांनी कबूल केले की, धारावीतील रहिवाशांमध्ये, त्यांनी आताची घरे रिकामी केली तर त्यांना खरोखरच नवीन घरे मिळतील का, अशी भीती आहे. त्यामुळे कोणत्याही रहिवाशाला त्याचे घर सोडण्यास सांगण्यापूर्वी नवीन घराच्या चाव्या त्यांच्याकडे सोपवल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
धारावी व्यतिरिक्त, प्रणव अदाणी मुंबईतील आवश्यक पायाभूत सुविधांबाबतही बोलले. त्यांनी मुंबईसाठी जागतिक दर्जाच्या आणखी एका विमानतळाची गरजही अधोरेखित केली.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विषयावर अदाणी यांनी भाकीत केले की, लवकरच सर्वांच्या जीवनात एआयचा वापर वाढेल. नोकऱ्या कमी करण्याऐवजी, एआय प्रामुख्याने नोकऱ्यांचे स्वरूप बदलेल. शेवटी, त्यांनी नमूद केले की भारतातील व्यवसाय करण्याचे सुलभ वातावरण नव्या उद्योग सुरू करण्यास सोपे बनवते.
