Diksha Jaiswal Piggy Bank Savings : पिगी बँक म्हणजे लहान मुलांना पैसे साठवण्यासाठी दिलेला गल्ला अशीच त्याची संकल्पना आहे. मात्र, एका २९ वर्षीय तरुणीने मातीच्या गल्ल्यात साठवलेल्या पैशातून चक्क जमिनिचा तुकडा खरेदी केला आहे. तिच्या बहिणीसोबत घडलेल्या एका घटनेनंतर तिने सलग ९ वर्षे १ सोपा नियम पाळत आपल्या हक्काची जागा मिळवली आहे. दीक्षा जयस्वाल असे २९ वर्षीय तरुणीने नाव असून ती उत्तर प्रदेशची रहिवासी आहे.

कोणतीही गुंतवणूक योजना किंवा शेअर बाजाराची जोखीम न उचलता, केवळ ९ वर्षे सातत्यपूर्ण आणि शिस्तबद्ध बचत करून दीक्षाने स्वतःच्या नावावर जमिनीचा तुकडा खरेदी केला आहे. ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ या प्लॅटफॉर्मवर तिने शेअर केलेली ही यशोगाथा सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

बहिणीच्या लग्नानंतर बदलला विचार

महिलेला स्वतःचे हक्काचे घर नसते. आधी ती वडिलांच्या घरी, तर नंतर नवऱ्याच्या घरात राहते, असाच विचार समाजात पाहायला मिळतो. २०१७ मध्ये दीक्षाच्या मोठ्या बहिणीचे लग्न झाले. त्यावेळी स्वतःचं अस्तित्त्व आणि घराचं महत्त्व याची प्रकर्षाने जाणीव झाली. पण, मनात विचार येणे आणि प्रत्यक्षात कृती ही दोन टोकं होती. २०१२ मध्ये वडिलांच्या अपघातानंतर कुटुंबावर मोठे आर्थिक संकट आले. त्यावेळी दीक्षाने स्वतःच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी गावातील मुलांना शिकवण्यास सुरुवात केली. क्रीडा शिक्षिका म्हणून काम करत तिने स्वतःच्या कमाईतून बी.कॉम, एम.कॉम आणि बी.पी.एडचे शिक्षण पूर्ण केले. एवढेच नव्हे तर हॉकी खेळाडू आणि कराटे प्रशिक्षक म्हणून काम करत तिने आपल्या पायावर उभे राहण्याचे सामर्थ्य मिळवले.

एक मातीचा गल्ला अन् आर्थिक शिस्त

आजच्या आधुनिक काळात एसआयपी, म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा ट्रेंड असताना दीक्षाने पारंपरिक मार्ग स्वीकारला. “मला किचकट गुंतवणूक किंवा शेअर मार्केटबद्दल काहीच माहिती नव्हते. मला फक्त एकच गोष्ट ठाऊक होती, ती म्हणजे ‘शिस्त’. क्रीडा शिक्षिका म्हणून मिळणाऱ्या उत्पन्नातून मी नियमितपणे काही भाग मातीच्या गल्ल्यांमध्ये, कापडी पिशव्यात आणि छोट्या सोन्याच्या नाण्यांच्या रूपात जमा करत गेले. सलग ९ वर्षे मी या पैशांना हात लावला नाही,” असे दीक्षा सांगते.

जुलै २०२६ मध्ये, वयाच्या २९ व्या वर्षी तिने अखेर ते सगळे गल्ले आणि साठवलेले पैसे बाहेर काढले. ९ वर्षांच्या या जमा पुंजीच्या जोरावर तिने स्वतःच्या नावे जमिनीचा तुकडा खरेदी केला.

सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

दीक्षाच्या या कष्टाचे आणि आर्थिक शिस्तीचे नेटकरी कौतुक करत आहेत. एकजण म्हणतोय, खरच ही प्रेरणादायी गोष्ट आहे, जमिनीचा आकार किंवा तिची किंमत कितीही असो, ती तुम्ही स्वतःच्या कमाईतून घेतली आहे हे सर्वात मोठे यश आहे. दुसऱ्या एकाने लिहिलंय की, प्रत्येक मुलीला या आर्थिक स्वातंत्र्याचे धडे दिले पाहिजेत. स्वतःच्या कमाईतून निर्माण केलेल्या गोष्टीची मजा काही वेगळीच असते.