पीटीआय, नवी दिल्ली
विद्यमान आर्थिक वर्षात १० ऑगस्टपर्यंत निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन वार्षिक तुलनेत २३.०९ टक्क्यांनी वाढून ८.११ लाख कोटी रुपयांपुढे गेले असल्याचे मंगळवारी अधिकृत आकडेवारीने स्पष्ट केले.
प्राप्तिकर विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, कंपनी कर आणि वैयक्तिक प्राप्तिकर संकलनातील वाढीमुळे तिजोरीत मोठी भर पडली आहे. निव्वळ कंपनी कर संकलन १९.८३ टक्क्यांनी वाढून सुमारे २.७० लाख कोटी रुपये झाले, तर वैयक्तिक प्राप्तिकर संकलन २३ टक्क्यांनी वाढून ५.०७ लाख कोटी रुपये झाले.
अर्थव्यवस्था आणि भांडवली बाजारातील सकारात्मक वातावरणामुळे महसूल संकलनाचा वेग मजबूत राहिला आहे, असे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) स्पष्ट केले. सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स (एसटीटी) अर्थात रोखे उलाढाल कराचे संकलन ५१ टक्क्यांनी वाढून ३३,८२४ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
१ एप्रिल ते १० ऑगस्ट या कालावधीत करदात्यांना १.४३ लाख कोटी रुपयांचा परतावा (रिफंड) देण्यात आला. मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यात ३.८ टक्क्यांची वाढ झाली आहे. एकूण प्रत्यक्ष कर संकलनात (ज्यामध्ये कंपनी कर, वैयक्तिक प्राप्तिकर आणि एसटीटी यांचा समावेश होतो) १० ऑगस्टपर्यंत १९.७५ टक्क्यांची वाढ होऊन सुमारे ९.५५ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. सरकारने चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष करांमधून २६.९७ लाख कोटी रुपये जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मागील आर्थिक वर्षात जमा झालेल्या २३.४० लाख कोटी रुपयांच्या तुलनेत ही १५ टक्क्यांची वाढ आहे.
