Diwali Bonus Financial Planning : दिवाळी सण म्हणजे प्रकाश, आनंद आणि उत्साहाचा काळ असतो. त्यातच नोकरदारांना मिळणारा ‘दिवाळी बोनस’ या आनंदाला द्विगुणित करतो. सणासुदीला नवीन कपडे, भेटवस्तू किंवा कौटुंबिक सहलींसाठी हा बोनस खर्च केला जातो. मात्र, या खर्चाचे योग्य नियोजन केलं तर आनंदासोबत भविष्य सुरक्षित करण्याची संधीही तुम्हाला मिळू शकेल. बोनसच्या रकमेतून भविष्य कसे सुरक्षित करता येईळ? यासाठी कुठे गुतवणूक आणि कुठे खर्च करावा याचा हा सविस्तर आढावा.
१. आपत्कालीन निधी
सध्याच्या काळात कधी कोणतं आर्थिक संकट येईल काही सांगता येत नाही. वैद्यकीय आणीबाणी, नोकरी जाणे किंवा शैक्षणिक शुल्क यांसारखे अकल्पित खर्च कधीही समोर येऊ शकतात. जर तुम्ही अजूनपर्यंत ‘इमर्जन्सी फंड’ उभारला नसेल, तर बोनसचा काही भाग यासाठी नक्की बाजूला ठेवा. तुमच्या परिस्थितीनुसार किमान ३ ते ६ महिन्यांच्या आवश्यक खर्चांइतकी रक्कम अशा निधीमध्ये असावी. हा निधी बचत खाते किंवा सहज काढता येणाऱ्या पर्यायांमध्ये ठेवावा. म्हणजे गरेजाला लगेच उपलब्ध होतील.
२. महागड्या कर्जांतून मुक्ती
तुमच्यावर क्रेडिट कार्डचे थकीत बिल किंवा जास्त व्याजाचे वैयक्तिक कर्ज असल्यास, बोनसचा वापर करून ते हलकं करण्याचा प्रयत्न करा. अशा महागड्या कर्जांची परतफेड केल्याने भविष्यातील व्याजाचा खर्च वाचेल आणि इतर ध्येयांसाठी पैसे उपलब्ध होतील. मात्र, कर्जाची मुदतपूर्व परतफेड करताना बँकेचे काही अतिरिक्त शुल्क आहे का? हे नक्की तपासून घ्या.
३. दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी गुंतवणूक
तुमच्याकडे आपत्कालीन निधी असेल आणि कर्जे नियंत्रणात असतील, तर बोनसचा काही भाग सेवानिवृत्ती दीर्घकालीन पर्यात गुंतवू शकता. तुमच्या आर्थिक जोखीम क्षमतेनुसार तुम्ही म्युच्युअल फंड, प्रॉव्हिडंट फंड किंवा इतर योग्य पर्यायांचा विचार करू शकता. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी त्यातील जोखीम, खर्च आणि गुंतवणुकीचा कालावधी नीट समजून घेणे गरजेचे आहे.
४. सणानंतरचा ताण टाळा
दिवाळीनंतर लगेचच घरखर्च, विम्याचे हप्ते, मुलांची शाळा-कॉलेजची फी यांसारखे नियोजित खर्च येणार आहेत, हे लक्षात ठेवून नियोजन करा. बोनसपैकी काही रक्कम अशा आगामी खर्चांसाठी आधीच बाजूला ठेवली, तर सण संपल्यावर क्रेडिट कार्ड किंवा कर्जावर अवलंबून राहावे लागणार नाही.
५. सणाचा आनंदही महत्त्वाचा पण..
बोनस आला म्हणजे सर्व पैसे बचत किंवा भविष्यासाठी गुंतवणूक करायला हवे असं अजिबात नाही. पैसे कमावतो म्हणजे त्याचा उपभोगही नक्कीच घेतला पाहिजे. तुमच्या सर्व प्राथमिक आर्थिक गरजा पूर्ण झाल्यानंतर, उरलेले पैसे दिवाळीची खरेदी, भेटवस्तू, बाहेर जेवणे किंवा कौटुंबिक सहलीसाठी मोकळेपणाने खर्च करा. मात्र, प्रत्येक खर्च करताना एक मर्यादा ठेवून घेतली तर अनावश्यक पैसे जाणार नाहीत.
