वॉशिंग्टन / इस्लामाबाद: आर्थिक डबघाईला आलेल्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मदतीसाठी हात पसरणाऱ्या पाकिस्तानने आता थेट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबाशी एक मोठी ‘क्रिप्टो डील’ केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या गुप्त करारामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या क्रिप्टो व्यवसायाला तब्बल २ अब्ज डॉलर्सचा (जवळपास २०,००० कोटी रुपये) अफाट फायदा झाल्याचे वृत्त आहे.

जागतिक राजकारणात आणि आर्थिक जगतात या कराराची जोरदार चर्चा सुरू असून, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या वैयक्तिक व्यावसायिक फायद्यासाठी पाकिस्तानने टाकलेले हे ‘क्रिप्टो पाऊल’ अत्यंत संशयास्पद मानले जात आहे.

काय आहे ट्रम्प यांचे क्रिप्टो साम्राज्य?

डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबाचा ‘वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियल’ नावाने मोठा क्रिप्टो व्यवसाय आहे. या कंपनीत ट्रम्प कुटुंबाची तब्बल ६० टक्के भागीदारी असल्याचे सांगितले जाते. या कंपनीने ‘USD1’ नावाचे एक स्टेबलकॉइन (Stablecoin – डॉलरच्या मूल्यानुसार चालणारे डिजिटल चलन) बाजारात आणले आहे. याच कंपनीसोबत पाकिस्तानच्या मध्यवर्ती बँकेने आणि नव्याने स्थापन झालेल्या ‘क्रिप्टो काउन्सिल’ने गुपचूप हातमिळवणी केली आहे.

पाकिस्तानने नेमकी काय खेळी केली?

डिजिटल पेमेंटमध्ये ट्रम्प यांच्या कॉइनचा वापर: पाकिस्तान आपल्या देशातील आंतरराष्ट्रीय व्यवहार, परदेशातून येणारा पैसा आणि क्रॉस-बॉर्डर पेमेंट्ससाठी ट्रम्प यांच्या कंपनीचे ‘USD1’ हे स्टेबलकॉइन अधिकृतपणे आपल्या डिजिटल पेमेंट सिस्टीममध्ये समाविष्ट करणार आहे. अहवालानुसार, ट्रम्प यांचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि ‘वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियल’च्या उच्चपदस्थांनी इस्लामाबादमध्ये जाऊन थेट पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर आणि पंतप्रधान यांची भेट घेतली होती. या उच्चस्तरीय बैठकीनंतरच या करारावर शिक्कामोर्तब झाले.

पाकिस्तानवर सध्या प्रचंड जागतिक कर्ज आहे. ट्रम्प प्रशासनाकडून अमेरिकेची मदत मिळवण्यासाठी आणि त्यांचे हितसंबंध जपण्यासाठी पाकिस्तानने थेट ट्रम्प यांच्या वैयक्तिक व्यवसायाला अब्जावधी डॉलर्सचा फायदा करून देणारा हा मार्ग निवडल्याचे भू-राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.

भारतासाठी चिंतेची बाब; वादाची वेळ संशयास्पद!

भारतीय सुरक्षा यंत्रणा आणि जागतिक पातळीवर या कराराबाबत तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, हा करार ज्या काळात अंतिम टप्प्यात आला, त्याच दरम्यान जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता. एकीकडे ट्रम्प भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे दावे करत असताना, दुसरीकडे त्यांच्या कुटुंबाची मालकी असलेली कंपनी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांसोबत अब्जावधी डॉलर्सचे व्यावसायिक करार करत होती, हे आता उघड झाले आहे.

नियम नसतानाही पाकिस्तानचा जुगार!

विशेष म्हणजे, पाकिस्तानमध्ये सध्या क्रिप्टोकरन्सी संदर्भात कोणतेही ठोस कायदे अस्तित्वात नाहीत. तेथील मोठी लोकसंख्या अजूनही बँकिंग क्षेत्राबाहेर आहे आणि देशात काळ्या पैशांचे साम्राज्य मोठे आहे. तरीही कोणतीही पूर्वतयारी नसताना पाकिस्तानने ट्रम्प यांच्या कंपनीला फायदा पोहोचवण्यासाठी हा मोठा क्रिप्टो जुगार खेळला आहे. पाकिस्तानने ट्रम्प यांच्या ‘वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियल’च्या माध्यमातून अमेरिकेच्या मुख्य सत्तेत थेट इनरोड्स (प्रवेश) मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. या बदल्यात ट्रम्प यांना २ अब्ज डॉलर्सची मोठी लॉटरी लागली असली, तरी या ‘क्रिप्टो डिप्लोमसी’मुळे जागतिक राजकारणात नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

“पाकिस्तान हा ट्रम्प यांच्या वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियलसोबत जाहीरपणे करार करणारा जगातील पहिला सार्वभौम देश ठरला आहे. यावरून पाकिस्तान ट्रम्प यांच्या जवळ जाण्यासाठी त्यांच्या व्यावसायिक हितसंबंधांचा कसा वापर करत आहे, हे स्पष्ट होते.” — आंतरराष्ट्रीय राजकीय विश्लेषक