Donald Trump US Dollar Coin : अमेरिकेच्या चलनांच्या इतिहासात तब्बल एका शतकानंतर एक अभूतपूर्व घटना घडली आहे. देशाच्या २५०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त १ डॉलर मूल्याचे सोनेरी रंगातील नाणे चलनात आणले असून यावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिमा कोरण्यात आली आहे. मात्र, असं करुन ट्रम्प यांनी मोठा नियम मोडला असल्याची टीका त्यांच्यावर करण्यात येत आहे. ‘यूएस मिंट’च्या या अमेरिकन टांकसाळीने दिलेल्या माहितीनुसार, या १ डॉलरच्या नाण्याची अधिकृत विक्री त्यांच्या संकेतस्थळावर सुरू झाली आहे.
कशी आहे नाण्याची रचना?
- पुढील बाजू : नाण्याच्या पृष्ठभागावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे छायाचित्र असून, त्याच्या बाजूला LIBERTY, IN GOD WE TRUST आणि “१७७६~२०२६” हे शब्द कोरलेले आहेत.
- मागील बाजू : नाण्याच्या मागील बाजूस अमेरिकेच्या राष्ट्रीय चिन्हातील ‘बाल्ड ईगल’ (गरुड) दाखवण्यात आला, असून त्यातील ढालीवर ‘२५०’ हा विशेष अंक रेखाटण्यात आला आहे.
- हे नाणे दिसायला सोन्यासारखे असले, तरी या नाण्यात सोन्याचा वापर केलेला नाही. हे नाणे प्रामुख्याने तांबे, जस्त, मँगनीज आणि निकेल यांच्या मिश्रधातूपासून तयार करण्यात आले आहे.
१०० वर्षांचा ऐतिहासिक संदर्भ
- अमेरिकन कायद्यानुसार जीवित व्यक्तीची प्रतिमा चलनी नोटा किंवा नाण्यांवर छापण्यावर बंदी आहे. यापूर्वी १९२६ मध्ये अमेरिकेच्या १५० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त तत्कालीन राष्ट्राध्यक्ष केल्व्हिन कुलिज यांचे छायाचित्र डॉलरवर छापण्यात आले होते. त्यानंतर एका शतकानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नाण्यावर झळकण्याचा सन्मान मिळाला आहे.
- तज्ज्ञांच्या मते, ट्रम्प यांनी २०२० मध्ये स्वाक्षरी केलेल्या ‘सर्क्युलेटिंग कलेक्टिबल कॉइन रीडिझाइन ॲक्ट’ अंतर्गत या विशेष नाण्याची निर्मिती कायदेशीर चौकटीत राहूनच करण्यात आली आहे.
नाण्याला वेगळ्याच कारणासाठी मागणी
ट्रम्प यांची प्रतिमा असलेले १ डॉलरचे नाणे हे व्यवहारात वापरण्यासाठी सुरू करण्यात आले आहे. असे असताना नाणेसंग्रहांकडून याला सर्वाधिक मागणी असल्याचे पाहायला मिळत आहे. यूएस मिंटने २५ नाण्यांचा रोल आणि १०० नाण्यांची बॅग या स्वरूपात याची विक्री सुरू केली आहे.
विरोधकांचा आक्षेप
या ऐतिहासिक नाण्यावरून अमेरिकेत कायदेशीर वाद पेटला आहे. देशातील १८६६ च्या जुन्या कायद्यानुसार, कोणत्याही जिवंत व्यक्तीचे चित्र किंवा नाव अमेरिकन चलनावर वापरण्यास सक्त मनाई आहे. पण, ट्रम्प प्रशासनाने हे आरोप फेटाळले असून कायद्याच्या चौकटीतच नाणे काढण्यात आल्याचे सांगितले. यासाठी समर्थक २०२० मध्ये संमत झालेल्या ‘सर्क्युलेटिंग कलेक्टिबल कॉइन रीडिझाइन कायद्या’चा दाखला देत आहेत.
भारतात शक्य आहे का?
भारतात जिवंत व्यक्तीचे छायाचित्र चलनी नोटा किंवा नियमित नाण्यांवर छापण्यास मनाई आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार, देशातील नियमित चलनी नोटा किंवा नाण्यांवर केवळ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचीच प्रतिमा छापली जाते. केंद्र सरकार विशेष प्रसंगी स्मारक नाणी जारी करते. मात्र, ही नाणीसुद्धा केवळ दिवंगत व्यक्तींच्या सन्मानार्थ बनवली जातात आणि ती दैनंदिन व्यवहारासाठी वापरली जात नाहीत.
