Anand Mahindra Post On Dr. Janaki Ammal Contribution In Sugarcane Production: भारताने गेल्या काही दशकांमध्ये कृषी आणि विज्ञान क्षेत्रात अफाट प्रगती केली आहे. भारताच्या या यशामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अनेकांच्या योगदानाकडे आपण वारंवार दुर्लक्ष केले आहे. अशीच एक दुर्लक्षित व्यक्ती म्हणजे डॉ. जानकी अम्मल, ज्यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानामुळे भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा ऊस उत्पादक देश बनला आहे.
डॉ. जानकी अम्मल यांच्या महत्त्वपूर्ण योगदानानंतरही शाळांमध्ये किंवा पाठ्यपुस्तकांमध्ये त्यांचा उल्लेख क्वचितच आढळतो. यामुळे तरुण पिढीला त्यांच्या योगदानाबद्दल फारसे काही समजत नाही. दरम्यान, उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या एका पोस्टमध्ये त्यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानावर प्रकाश टाकला आणि त्या धैर्य, महत्त्वाकांक्षा आणि सेवेचे एक सर्वोत्तम उदाहरण असल्याचे म्हटले आहे.
आनंद महिंद्रा यांची पोस्ट
“भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा ऊस उत्पादक देश आहे. तरीही, ज्या महिलेने हे शक्य केले, त्या आपल्या इतिहासाच्या तळटीपांमध्ये हरवून गेल्या आहेत. त्यांची गोष्ट असामान्य धैर्य, महत्त्वाकांक्षा आणि सेवेची आहे. त्या तरुण भारतीय महिलांसाठी एक आदर्श आहेत. आज किती मुलांना सामान्य ज्ञानाच्या प्रश्नमंजुषेत त्यांचे नाव सांगता येईल? डॉ. जानकी अम्मल दुर्लक्षित नायिका आहेत. विशेषतः महिला शास्त्रज्ञांचे योगदान दुर्लक्षित राहू नये. डॉ. जानकी अम्मल माझी प्रेरणा आहेत”, असे आनंद महिंद्रा यांनी लिहिले आहे.
डॉ. जानकी अम्मल यांच्याविषयी
ज्या काळात समाज महिलांकडे केवळ लग्नापुरते पाहायचा, अशा काळात जन्मलेल्या जानकी अम्मल यांनी वेगळा मार्ग निवडला आणि १९३१ मध्ये वनस्पतीशास्त्रात (बॉटनी) डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. त्यांनी अविवाहीत राहून स्वतःला पूर्णपणे वैज्ञानिक संशोधनासाठी वाहून घेतले होते.
शिक्षणानंतर डॉ. जानकी अम्मल कोयंबतूर येथील ऊस शंशोधन संस्थेत अनुवंशशास्त्रज्ञ म्हणून रुजू झाल्या. त्या वेळी भारतीय उसात साखरेचे प्रमाण कमी होते. मात्र डॉ. जानकी यांच्या संशोधनामुळे भारतीय मातीला अनुकूल असा उच्च उत्पादन देणारा, अधिक गोड ऊस विकसित करण्यात यश आले. त्यांच्या या शोधामुळे भारत ऊस आयात करणाऱ्या देशापासून जगातील आघाडीच्या उत्पादकांपैकी एक बनला.
