नवी दिल्ली: E20 (२० टक्के इथेनॉल आणि ८० टक्के पेट्रोल यांचे मिश्रण) इंधनामुळे वाहनांचे इंजिन खराब होते किंवा फेल होते, असा कोणताही सिद्ध झालेला वैज्ञानिक किंवा तांत्रिक पुरावा नाही, पेट्रोलच्या वापरामुळे इंजिन निकामी होणे, असामान्य गंज लागणे किंवा वाहनांचे आयुष्य कमी होणे यांसारख्या समस्यांचा कोणताही अधिकृत पुरावा आढळलेला नाही. व्यापक चाचण्या आणि प्रत्यक्ष वापराच्या अनुभवावरून इथेनॉल-मिश्रित इंधनाची उपयुक्तता सिद्ध झाली आहे, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ठामपणे सांगितले.

विविध वाहन उत्पादक आणि संशोधन संस्थांच्या अभ्यासानुसार E20 इंधनामुळे वाहनांच्या इंजिनचे नुकसान झाल्याची कोणतीही अधिकृत नोंद नाही, असे.संसदेत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना नितीन गडकरी यांनी सांगितले. पेट्रोलमध्ये इथेनॉलच्या मिश्रणामुळे भारताने आतापर्यंत सुमारे १,९८,००० कोटी रुपयांच्या परकीय चलनाची बचत केली आहे. या धोरणामुळे खनिज तेलाची आयात कमी करण्यास मोठी मदत झाली आहे. २० टक्के इथेनॉल-मिश्रित पेट्रोलकडे (E20) वळण्याचा निर्णय वाहन उत्पादक, चाचणी संस्था आणि तांत्रिक संस्थांशी (ज्यामध्ये ‘ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’, ‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स’ – सियाम आणि ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम’ – आयआयपी यांचा समावेश आहे) चर्चा केल्यानंतरच घेण्यात आला. मात्र वाहन चालवण्याची परिस्थिती, सवयी आणि देखभालीवर अवलंबून, ई १० साठी डिझाइन केलेल्या काही जुन्या वाहनांच्या इंधन कार्यक्षमतेत (मायलेजमध्ये) सुमारे २ ते ६ टक्क्यांनी घट होऊ शकते, असे सरकारने मान्य केले.

शेतकऱ्यांना थेट फायदा:

इथेनॉल उत्पादनामुळे देशातील ऊस उत्पादक आणि इतर धान्य उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा झाला आहे. आतापर्यंत १ लाख कोटींपेक्षा जास्त रक्कम इथेनॉल पुरवठ्यापोटी शेतकऱ्यांच्या खात्यात किंवा साखर कारखान्यांकडे वर्ग झाली आहे. एप्रिल २०२३ पासून भारतात उत्पादन होणारी सर्व नवीन वाहने E20 इंधनासाठी सुसज्ज आहेत. जुन्या वाहनांमध्ये E20 वापरल्यास किरकोळ रबर भाग किंवा मायलेजवर किंचित परिणाम होऊ शकतो, पण इंजिन पूर्णपणे फेल होत नाही, असेही स्पष्ट करण्यात आले. खनिज तेलाची आयात सुमारे ३१७ लाख मेट्रिक टनांनी कमी करण्यास, CO₂ उत्सर्जन सुमारे ९५२ लाख मेट्रिक टनांनी कमी करण्यास आणि शेतकऱ्यांसाठी १.६६ लाख कोटी रुपयांहून अधिक अतिरिक्त उत्पन्न निर्माण करण्यास मदत झाली आहे.

E20 इंधनाच्या वापरामुळे वाहनांतून होणारे कार्बन उत्सर्जन लक्षणीयरीत्या कमी झाले असून, देशाच्या शाश्वत ऊर्जा उद्दिष्टांना बळ मिळाले आहे. २०२५-२६ पर्यंत संपूर्ण देशात २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य गाठण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे गडकरी यांनी सांगितले.