East India Company Bankruptcy 2026 News: एकेकाळी बलाढ्य असलेली आणि भारतावर राज्य करणारी ब्रिटिश ‘ईस्ट इंडिया कंपनी’ दिवाळखोरीत निघाल्याने पुन्हा एकदा बंद झाली आहे. यावेळी लंडनमधील एक लक्झरी रिटेलर (प्रीमियम वस्तूंचे दुकान) म्हणून या कंपनीने गाशा गुंडाळला आहे.

मूळ ईस्ट इंडिया कंपनी सुमारे १५२ वर्षांपूर्वी बंद पडली होती, परंतु २०१० मध्ये एका ब्रिटिश-भारतीय उद्योगपतीने या नावाचे अधिकार विकत घेऊन ती पुनरुज्जीवित केली होती. मात्र, आता हा ईस्ट इंडिया कंपनीचा प्रकल्प दिवाळखोर झाल्यामुळे बंद पडला आहे.

१८५७ च्या भारतीय उठावानंतर ब्रिटिश सरकारने भारतातील ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता आपल्या हाती घेतली होती, ज्यामुळे भारतात थेट ब्रिटिश राजवटीची सुरुवात झाली होती.

भारत आणि उर्वरित आशियामध्ये मोठ्या प्रमाणात शोषण केल्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीचा वारसा बहुतेकदा नकारात्मक अर्थाने पाहिला जातो. या कंपनीने जागतिक व्यापारात मोठे बदल घडवून आणले खरे, परंतु त्यांच्या कार्यकाळात हिंसाचार आणि बंगालच्या भीषण दुष्काळामुळे भारतीयांचे प्रचंड हाल झाले होते, ज्यामध्ये ३ कोटी लोकांचा मृत्यू झाला होता.

२०१० मध्ये जेव्हा भारतीय उद्योजक संजीव मेहता यांनी ईस्ट इंडिया कंपनीचे हक्क विकत घेतले, तेव्हा याकडे वसाहतवाद्यांवरच्या बदल्याच्या दृष्टिकोनातून पाहिले गेले. भारतावर राज्य करणारी कंपनी आता एका भारतीयाच्या ताब्यात आहे, ही बातमी जगभरात चर्चेचा विषय ठरली होती. पण कंपनीचे आधुनिक रूप लिक्विडेशनमध्ये गेले आहे.

द संडे टाइम्स या ब्रिटिश वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, या कंपनीवर ब्रिटिश व्हर्जिन आयलंडमध्ये नोंदणीकृत असलेल्या आपल्या मूळ समूहाचे सुमारे ६.३ कोटी रुपयांपेक्षा जास्त, करापोटी २.०३ कोटी रुपये आणि कर्मचाऱ्यांचे १.७१ कोटी रुपये देणे बाकी होते.

मालक संजीव मेहता यांच्याशी संबंधित आणि नावामध्ये “ईस्ट इंडिया” असलेल्या इतर अनेक कंपन्यादेखील बरखास्त करण्यात आल्या आहेत, असेही या वृत्तात म्हटले आहे.

कंपनीची वेबसाइट बंद करण्यात आली आहे. याचबरोबर लंडनमधील मेफेअरमधील ९७ न्यू बाँड स्ट्रीट येथील दुकान रिकामे करण्यात आले असून, एजंट्सद्वारे ते भाड्याने देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.