European Central Bank : युरोपीय मध्यवर्ती बँकेच्या (ईसीबी) अध्यक्षा क्रिस्टिन लागार्ड यांनी निर्धारित मुदतीच्या नऊ महिने आधीच राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या येत्या ७ फेब्रुवारीला पद सोडणार असल्याचे ईसीबीने गुरुवारी जाहीर केले. लागार्ड यांचा आठ वर्षांचा कार्यकाळ ३१ ऑक्टोबर २०२७ रोजी संपणार होता.
लगार्ड यांच्या मुदतपूर्व राजीनाम्यामुळे त्यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या निवडीसाठी युरोपीय नेत्यांना लवकर प्रक्रिया सुरू करता येणार आहे. विशेषतः पुढील वर्षी फ्रान्समध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी ही नियुक्ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने या निर्णयाला महत्त्व प्राप्त झाले आहे. सध्या फ्रान्समध्ये इमॅन्युएल मॅक्रॉन अध्यक्षपदी आहेत. वर्ष २०२७ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत उजव्या विचारसरणीच्या नेत्या मरीन ले पेन यांचा प्रभाव वाढल्यास उत्तराधिकाऱ्याच्या निवडीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली आहे जात आहे.
तीन वरिष्ठ पदांसाठी नियुक्त्या
लगार्ड यांच्या उत्तराधिकाऱ्याबरोबरच ईसीबीतील अन्य दोन वरिष्ठ पदांवरील नियुक्त्यांचाही प्रश्न निर्माण झाला आहे. ईसीबीचे मुख्य अर्थतज्ज्ञ फिलिप लेन यांचा कार्यकाळ ३१ मे रोजी संपणार आहे. तसेच, ईसीबीच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्या इसाबेल श्नाबेल या वर्षअखेरीस पद सोडून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये (आयएमएफ) जाणार आहेत. या तीन पदांसाठी विविध सदस्य देशांमध्ये राजकीय सहमती घडवून आणण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. युरोपीय परिषदेचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा यांनी नियुक्तीची प्रक्रिया गुरुवारपासून सुरू करण्यात येईल आणि ती विलंब न करता पुढे नेली जाईल, असे सांगितले. विद्यमान वर्षात १७ आणि १८ डिसेंबर रोजी होणाऱ्या युरोपीय नेत्यांच्या शिखर परिषदेत या नियुक्त्यांबाबत सहमती घडवून आणण्याचा प्रयत्न होऊ शकतो.
कोणाची नावे चर्चेत?
ईसीबीच्या अध्यक्षपदासाठी नेदरलँड्सच्या मध्यवर्ती बँकेचे माजी प्रमुख क्लास नॉट आणि बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्सचे महाव्यवस्थापक पाब्लो हर्नांदेझ दे कोस यांची नावे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहे. लगार्ड यांनी यापूर्वी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळली होती. त्यांची २०१९ मध्ये ईसीबीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. त्यांनी मारिओ द्राघी यांच्यानंतर पदभार स्वीकारला.
करोना महामारीच्या काळात अर्थव्यवस्थेतील पतपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी ईसीबीने २०२० मध्ये रोखे खरेदीच्या माध्यमातून १.३५ लाख कोटी युरोंचे आपत्कालीन आर्थिक प्रोत्साहन पॅकेज राबवले होते. या काळातील बँकेच्या महत्त्वाच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती. युरो चलन वापरणाऱ्या २१ देशांच्या व्याजदरविषयक धोरणात ईसीबीची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे ईसीबीच्या अध्यक्षपदावरील बदलाचा परिणाम कर्जाचे व्याजदर, गृहकर्ज आणि उद्योगांच्या गुंतवणूक खर्चावर होऊ शकतो.
