मुंबईः भारतातील इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिट्स (ईजीआर) बाजारपेठेच्या विस्तारात असणारा वस्तू आणि सेवा कराचा (जीएसटी) सर्वात मोठा अडथळा आता लवकरच दूर होणार आहे. या संदर्भात केंद्रीय अर्थमंत्रालयाबरोबरची चर्चा सकारात्मकरीत्या पूर्ण झाली असून, येत्या महिनाभरात यासंबंधीचे आवश्यक सुधारित नियम लागू होतील, अशी ग्वाही उद्योग क्षेत्रातील दिग्गजांनी बुधवारी दिली.राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) आणि ऑगमॉन्ट एंटरप्राइजेस यांच्या भागीदारी अंतर्गत आयोजित विशेष कार्यक्रमात ही महत्त्वाची माहिती समोर आली.
एनएसई आणि ऑगमॉन्टच्या भागीदारीमुळे ईजीआर परिसंस्था आणि बाजाराला गती दिली जाणार आहे.ईजीआरच्या खरेदी-विक्रीवर आणि त्यानंतर प्रत्यक्ष सोन्याची डिलिव्हरी घेताना लागू होणाऱ्या दुहेरी कर रचनेच्या भीतीमुळे गुंतवणूकदार आणि व्यापारी या व्यवहारांकडे वळण्यास कचरत होते. हा करविषयक अडथळा ईजीआरच्या संपूर्ण अनावरणावर आणि वाढीवर मर्यादा आणत होता.
या पार्श्वभूमीवर अर्थमंत्रालयाशी झालेल्या यशस्वी चर्चेतून महिनाभरात मार्ग निघेल, असा विश्वास ऑगमॉन्ट एंटरप्राइजेसचे पूर्णवेळ संचालक केतन कोठारी आणि ‘आयबीजेए’चे राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता यांनी व्यक्त केला. ‘सेबी’द्वारे नियामक मंजुरीनंतर, एनएसई’ने मे २०२६ मध्ये ‘ईजीआर’ हा नवीन गुंतवणूक पर्यायाचे अनावरण केले. तरी जीएसटीची गुंतागुंत आणि पायाभूत सुविधांची कमतरता यामुळे हा पर्याय प्रत्यक्षात अजून वेग घेऊ शकला नव्हता.
मात्र, आता ऑगमॉन्टशी भागीदारीतून हा मार्ग गुंतवणूकदारांसाठी खऱ्या अर्थाने मोकळा होईल.ईजीआर परिसंस्थेसाठी हे अत्यंत दिलासादायक वृत्त असल्याचे नमूद करत कोठारी म्हणाले, ईजीआर व्यापाराला भेडसावणाऱ्या जीएसटीच्या तांत्रिक अडचणींविषयी आमची अर्थमंत्रालयाशी सविस्तर आणि अंतिम फेरीची चर्चा पूर्ण झाली आहे. मंत्रालय या करविषयक त्रुटी दूर करण्यासाठी पूर्णपणे सकारात्मक आहे. येत्या महिनाभरात यासंबंधीच्या नियमांमध्ये आवश्यक त्या सुधारणा पाहायला मिळतील, ज्यामुळे ईजीआरच्या मार्गातील जीएसटीची सर्व अडथळे कायमची दूर होतील.
गुंतवणूकदार, सराफांना फायदा कसा?
या नव्या व्यवस्थेमुळे सोन्याच्या बाजारातील सहभाग वाढवण्याचा एनएसई आणि ऑगमॉन्ट या दोन्ही संस्थांचा मानस आहे. सामान्य गुंतवणूकदाराला अगदी छोट्या रकमेतूनही शुद्ध सोन्यात त्यांच्या डिमॅट खात्याद्वारे सुरक्षित गुंतवणूक करता येईल. संपूर्ण देशात सोन्याचा एकच, अचूक आणि पारदर्शक भाव ठरवण्यास या यंत्रणेमुळे मदत होईल.
यामुळे ग्राहकांची फसवणूक थांबेल, शिवाय खात्यातील ‘ईजीआर’चे विमोचन करून ते त्या बदल्यात अगदी सहजपणे प्रत्यक्ष शुद्ध सोने परत मिळवू शकतील. तर दुसरीकडे, सराफांना आपल्या व्यवसायासाठी लागणारे सोने आयात करण्याऐवजी, थेट स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून अत्यंत सुरक्षितपणे आणि योग्य दरात खरेदी करता येईल.
