पीटीआय, नवी दिल्ली : देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीने जुलै महिन्यात नवीन विक्रम नोंदविला. गेल्या महिन्यात ३ लाख २७ इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली असून, विक्री झालेले दर आठपैकी एक वाहन आता इलेक्ट्रिक असल्याचे फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल्स डिलर्स असोसिशएनने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीतून समोर आले.
इलेक्ट्रिक वाहनांच्या मासिक विक्रीचा विक्रम याआधी याच वर्षी जून महिन्यात नोंदविण्यात आला होता. गेल्या वर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत त्यात ६३ टक्के वाढ झाली होती. याचबरोबर एकूण वाहनांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचे प्रमाण १२ टक्क्यांवर पोहोचले होते. आता जुलैमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीने नवीन विक्रम नोंदविला आहे. गेल्या महिन्यात इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री २ लाख ४ हजार ३६२ झाली. गेल्या वर्षी याच महिन्यात ती १ लाख ८ हजार ५१६ होती आणि त्यात ८८ टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जुलैमध्ये इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांची विक्री ८३ टक्क्यांनी वाढून ३२ हजार ९२८ झाली आहे. याचवेळी इलेक्ट्रिक तीनचाकींच्या विक्रीत २५ टक्के वाढ होऊन ती ८७ हजार ५५ वर पोहोचली आहे. तसेच, इलेक्ट्रिक वाणिज्य वाहनांच्या विक्रीत १६८ टक्के वाढ होऊन ती ३ हजार ५५६ झाली आहे, असे फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल्स डिलर्स असोसिशएनने म्हटले आहे.
याबाबत असोसिएशनचे अध्यक्ष साई गिरीधर म्हणाले की, भारतीयांनी आतापर्यंतची उच्चांकी इलेक्ट्रिक वाहन खरेदी जुलै महिन्यात केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात ६६ टक्के वाढ झाली आहे. सध्या देशात विक्री होत असलेल्या दर आठ वाहनांमध्ये एक इलेक्ट्रिक आहे. इलेक्ट्रिक दुचाकीनी प्रथमच मासिक २ लाख विक्रीचा टप्पा गाठला आहे. चीनचाकींच्या एकूण विक्रीत इलेक्ट्रिकचे प्रमाण ६५.१ टक्क्यांवर पोहोचले आहे. याबरोबर वाणिज्य वाहनांच्या एकूण विक्रीत इलेक्ट्रिकचे प्रमाण ३.५७ टक्के झाले आहे.
देशात इलेक्ट्रिक वाहनांकडे होणारे स्थित्यंतर हे केवळ आता अंदाज वर्तविण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. ते वाहन विक्रीतून दिसणारे वास्तव बनले आहे. इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ८३ टक्के वाढ झाली असली तरी या वाहनांचा सध्या पुरेसा पुरवठा नाही. यामुळे विक्रीवर काही प्रमाणात मर्यादा येत आहेत. वाहन निर्मिती कंपन्यांनी सणासुदीच्या काळाआधी हा पुरवठा वाढवावा. – साई गिरीधर, फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल्स डिलर्स असोसिशएन
