Elon Musk AI Future Currency and Financial Impact Analysis: भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्सच्या प्रभावामुळे सर्वच वस्तू व सेवांची मुबलक उपलब्धता असेल. त्यामुळे येत्या काळात चलनाचे महत्त्व संपुष्टात येईल, असा दावा अब्जाधीश उद्योगपती एलॉन मस्क यांनी पुन्हा एकदा केला आहे. ‘एआय’च्या जोरावर निर्माण होणाऱ्या या अफाट समृद्धीच्या काळात भविष्याचा विचार करून पैशांची बचत करत बसणे निरर्थक ठरेल, असे मत त्यांनी एक्स पोस्टद्वारे मांडले आहे.

एका युझरने केलेल्या विनोदी पोस्टवर प्रतिक्रिया देताना मस्क यांनी हे भाष्य केले. संबंधित युझरने भविष्यातील समृद्धीचे कारण देत स्वतःच्या आर्थिक उधळपट्टीचे समर्थन केले होते. “पूर्णपणे बेजबाबदार वागू नका, पण काही वर्षांत यातील बहुतांश गोष्टींना महत्त्व उरणार नाही,” असे त्या युझरने म्हटले होते.

त्यावर सहमती दर्शवत मस्क यांनी प्रचंड समृद्धीच्या काळात दीर्घकालीन बचतीचा फारसा उपयोग राहणार नाही, असे नमूद केले.

मानवी श्रमांना पर्याय आणि चलनविरहित जग

मस्क यांनी अशा प्रकारे पैसा निरुपयोगी ठरण्याचे भाकीत करण्याची ही पहिलीच वेळ नाही. ‘एक्सप्राईज फाउंडेशन’चे अध्यक्ष पीटर डायमंडिस यांच्याशी संवाद साधताना त्यांनी यापूर्वीही असाच दृष्टिकोन मांडला होता. भविष्यात मानवी श्रम ऐच्छिक असतील आणि चलनाला कोणतेही स्थान नसेल, असा दावा त्यांनी केला होता.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार मस्क यांच्या मते, एआय आणि रोबोट्स जागतिक अर्थकारणाचा पायाच बदलून टाकतील. रोबोट्स इतक्या मोठ्या प्रमाणावर वस्तू आणि सेवांची निर्मिती करतील की मानवासाठी कामाची गरजच उरणार नाही. वस्तूंचे उत्पादन बाजारातील पैशांच्या पुरवठ्यापेक्षा प्रचंड वेगाने वाढेल, ज्यामुळे किरकोळ बाजारातील वस्तूंचे भाव शून्यावर येतील.

रोबोट्सकडून मिळणारे श्रम स्वस्त आणि अविरत असल्याने उत्पादन खर्च नगण्य राहील. परिणामी, मानवी मजुरीची गरज संपल्याने पारंपारिक चलनाची चौकटच मोडीत निघेल, असे मस्क यांनी सांगितले होते.

या चर्चेदरम्यान डायमंडिस यांनी मस्क यांच्या अवाढव्य संपत्तीवरून एक मिश्कील प्रश्न विचारला होता. “तुम्ही अब्जाधीश होण्याच्या उंबरठ्यावर असतानाच पैशांचे मूल्य कमी होणार का?” त्यावर मस्क यांनी थेट, “होय, बहुतेक तसेच घडेल,” असे उत्तर दिले.

‘युनिव्हर्सल हाय इन्कम’चा पर्याय

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्समुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य बेरोजगारीवर उपाय म्हणून मस्क यांनी ‘युनिव्हर्सल हाय इन्कम’ या संकल्पनेचा पुरस्कार केला. केंद्र सरकारने नागरिकांना थेट आर्थिक साहाय्य उपलब्ध करून दिल्यास बेरोजगारीच्या संकटाला तोंड देता येईल, असा त्यांचा दावा आहे. एआयमुळे उत्पादनात अफाट वाढ होणार असल्याने चलनाचा पुरवठा वाढला तरी महागाई वाढणार नाही; उलट यामुळे अर्थव्यवस्था स्थिर राहून लोकांना आवश्यक त्या सर्व सुविधा सहज उपलब्ध होतील, असा विश्वास मस्क यांनी व्यक्त केला आहे.