EPF 3.0 ATM UPI Withdrawal Date : केंद्र सरकारने ‘ईपीएफ ३.०’ अंतर्गत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेत अनेक सुधारणा केल्या आहेत. यामध्ये पीएफ (PF) खात्यातून थेट एटीएम किंवा यूपीआयद्वारे पैसे काढण्याची सुविधा देण्यात आली आहे. मात्र, ही सुविधा कधी सुरू होणार, याकडे लाखो नोकरदार आणि निवृत्तीधारकांचे लक्ष लागले आहे. पूर्वी १ ऑगस्ट २०२६ पासून ही सुविधा सुरू होईल अशी चर्चा होती. मात्र, आता या संदर्भात केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त रमेश कृष्णमूर्ती यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुढील एका महिन्याच्या आत ही नवी सुविधा प्रत्यक्ष सुरू होण्याची शक्यता आहे. जरी अद्याप कोणतीही निश्चित तारीख जाहीर करण्यात आलेली नसली, तरी ही प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर ईपीएफओ सदस्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

नवीन सिस्टीम आणि तांत्रिक अडचणींचा सामना

एकीकडे एटीएम आणि यूपीआय सुविधेची प्रतीक्षा सुरू असतानाच, दुसरीकडे ईपीएफओच्या नव्या डिजिटल सिस्टीममध्येही सदस्यांना अनेक अडचणी येत आहेत. सदस्यांना पोर्टलवर लॉगिन करताना अडथळे येत आहेत. पीएफ क्लेम सेटलमेंटसाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ लागत आहे. ईपीएफओची अधिकृत वेबसाईट अत्यंत स्लो चालत असून बॅलन्स चेक करताना त्रुटी दाखवत आहे.

तुमचा PF क्लेम किंवा ट्रान्सफर कधी अडकू शकते?

  • मेंबर आयडी, सर्व्हिस हिस्टरी किंवा बँक खात्याचा तपशील चुकीचा असल्यास क्लेम नाकारला जातो.
  • आधार, पॅन आणि बँक खात्याचे केवायसी अपडेट नसेल, तर पैसे ट्रान्सफर होणार नाहीत.
  • तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पीएफ खाती असतील आणि ती मर्ज केलेली नसतील, तर ट्रान्सफरमध्ये समस्या उद्भवू शकते.
  • नोकरी सोडल्यानंतर पीएफ काढण्यासाठी पोर्टलवर ‘डेट ऑफ एक्झिट’ अपडेट असणे अनिवार्य आहे.
  • तुमच्या आधार/पॅन कार्डवरील नाव, जन्मतारीख आणि पीएफ खात्यातील नोंदी यामध्ये फरक असल्यास क्लेम रिजेक्ट होऊ शकतो.
  • ईपीएफओ सदस्यांनी आपला पीएफ क्लेम सबमिट करण्यापूर्वी आपली केवायसी (KYC) आणि वैयक्तिक माहिती पूर्णपणे बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी, जेणेकरून तांत्रिक अडचणींमुळे क्लेम फेटाळला जाणार नाही.

‘भविष्य निर्वाहा’ला धोका?

खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी ‘ईपीएफ’ ही भविष्यकाळाचे कवच आहे. दीर्घकाळात चक्रवाढ व्याजासह एक मोठी रक्कम कर्मचारी निवृत्तीसमयी यातून मिळवत आला आहे. नव्या ‘ईपीएफ ३.०’ नियमांमध्ये आजारपण, शिक्षण किंवा लग्नासाठी जमा रकमेच्या तब्बल ७५ टक्क्यांपर्यंतचा भाग थेट काढण्याची मुभा आहे. जुन्या नियमात संपूर्ण सेवाकाळात लग्न किंवा शिक्षणासाठी केवळ तीनदाच पैसे काढता येत होते, ती मर्यादा आता शिक्षणासाठी १० वेळा आणि लग्नासाठी ५ वेळा करण्यात आली आहे. शिवाय, हे पैसे काढणे अधिक सुलभ करण्यासाठी थेट एटीएम कार्ड आणि यूपीआयची सोय केली जाणार आहे.

ईपीएफचा मुख्य उद्देश ‘भविष्य निर्वाह’ हा आहे. जेव्हा पैसे काढणे बँकेइतकेच सोपे आणि झटपट होईल, तेव्हा कामगार दैनंदिन गरजा किंवा चैनीसाठीही पीएफचा निधी खर्च करून टाकतील. परिणामी, निवृत्तीच्या वेळी हाताशी अत्यंत तुटपुंजी रक्कम शिल्लक राहील. सामाजिक सुरक्षेची इतर साधने उपलब्ध नसताना, निवृत्ती निधीचा असा संकोच होणे म्हणजे कामगारांचे वार्धक्य अंधारात ढकलण्यासारखेच आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.