EPF Balance Check UMANG App Issue : केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी (EPF) खात्यात ८.२५ टक्के व्याजदराने व्याजाची रक्कम जमा करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, ‘ईपीएफ ३.०’ च्या सिस्टीम अपग्रेडेशनमुळे अनेक सदस्यांना उमंग (UMANG) ॲपवर पीएफ बॅलन्स आणि क्लेम स्टेटस पाहताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. जर तुम्हालाही उमंग ॲपवर एरर दिसत असेल, तर घाबरण्याचे कारण नाही. ईपीएफओच्या (EPFO) ३ सोप्या आणि पर्यायी मार्गांनी तुम्ही एका मिनिटात तुमचा पीएफ बॅलन्स तपासू शकता.

उमंग ॲपवर पीएफ बॅलन्स का दिसत नाहीये?

केंद्र सरकारने ईपीएफओ ३.० अंतर्गत जुन्या व्यवस्थेत अनेक सुधारणा केल्या आहेत. लवकरच पीएफची रक्कम तुम्ही एटीएम (ATM) आणि यूपीआयद्वारे काढू शकणार आहात. या पार्श्वभूमीवर सिस्टीम अपग्रेड होत असल्याने UMANG ॲपवरुन सुविधा वापरण्यास अडचणी येत आहेत. उमंग ॲपवर तशी सूचनाही देण्यात आली आहे. लवकरात लवकर सेवा सुरळीत होईल असंही सांगण्यात आलं आहे. तुम्ही उमंग ॲप वापरू शकत नसला तरी इतर काही पर्यायांद्वारे पीएफ शिल्लक आणि क्लेमची कामे करू शकता.

मिस कॉलद्वारे पीएफ बॅलन्स जाणून घ्या

ईपीएफओ सदस्य आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून ०११-२२९०१४०६ (011-22901406) या क्रमांकावर मिस कॉल देऊन आपल्या पीएफ खात्यातील शिल्लक जाणून घेऊ शकतात. या नंबरवर कॉल केल्यानंतर एक रिंग वाजल्यानंतर आपोआप कट होईल. त्यानंतर लगेचच तुमच्या मोबाईल नंबर एसएमएसद्वारे पीएफ खात्याची ताजी माहिती पाठवली जाते.

ईपीएफओ पासबुक लाइट

ईपीएफओच्या अधिकृत सदस्यांसाठी ईपीएफओने पासबुक पोर्टलवर ‘Passbook Lite’ ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यासाठी तुम्हाला ईपीएफओच्या (EPFO) अधिकृत मेंबर पासबुक पोर्टलला भेट द्यावी लागेल. इथे तुमचा १२ अंकी UAN (युनिव्हर्सल अकाउंट नंबर), पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉग-इन करा. तुमच्या लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी (OTP) सबमिट करा. ‘View’ वर क्लिक करा आणि ‘Passbook Lite’ पर्याय निवडा. येथे तुम्हाला तुमचे ताजे योगदान, काढलेले पैसे आणि एकूण शिल्लक व्याजासह दिसेल. या संकेतस्थळावरुन तुम्ही पीएफ रक्कम काढण्याचेही दावे दाखल करू शकता.

SMS पाठवून पीएफ बॅलन्स तपासा

तुमचे तर UAN ॲक्टिव्हेट असेल तर तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून एक एसएमएस पाठवून शिल्लक तपासू शकता. यासाठी मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये ‘EPFOHO UAN’ असे टाईप करा (येथे UAN च्या जागी तुमचा स्वतःचा १२ अंकी नंबर टाका). जर तुम्हाला हा मेसेज तुमच्या प्रादेशिक भाषेत म्हणजेच मराठीत हवा असेल, तर UAN नंबरच्या पुढे ‘MAR’ हा कोड जोडा. (उदा. EPFOHO 123456789012 MAR) हा मेसेज ७७३८२९९८९९ (7738299899) या क्रमांकावर पाठवा. तुम्हाला तात्काळ शेवटचे योगदान, एकूण बॅलन्स आणि केवायसी स्थितीचा मेसेज येईल.