EPF Interest After Job Resignation : खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी हा निवृत्तीनंतरचा सर्वात मोठा आधार मानला जातो. अनेकदा काही कारणास्तव नोकरी सुटते आणि पीएफमधील कर्मचाऱ्याचे योगदान थांबते. अशावेळी अनेक कर्मचाऱ्यांना एक मोठा प्रश्न पडतो, “आता मी पीएफ (PF) खात्यात नियमित पैसे जमा करत नाही, मग माझ्या जुन्या जमा रक्कमेवर मिळणारे व्याज लगेच बंद होईल का? ‘कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने’ आपल्या सोशल मीडिया हँडलवरून या प्रश्नाचे उत्तर दिलं आहे.

वयाच्या ५८ वर्षांपर्यंत मिळत राहणार व्याज

ईपीएफओच्या स्पष्टीकरणानुसार, जर एखाद्या कर्मचाऱ्याने निवृत्तीपूर्वीच नोकरी सोडली आणि त्यानंतर इतर कोणत्याही पीएफ अंतर्गत येणाऱ्या कंपनीत काम केले नाही, तरीही त्याच्या खात्यात जमा असलेल्या रक्कमेवर व्याज मिळणे लगेच बंद होत नाही. पीएफ खात्यातील शिल्लक रक्कमेवर सभासदाचे वय ५८ वर्षे होईपर्यंत नेहमीप्रमाणे व्याज जमा होत राहते.

खाते ‘इनऑपरेटिव्ह’ कधी होते?

पीएफ खात्यात लागोपाठ तीन वर्षे नवीन रक्कम जमा झाली नाही, तर ते खाते ‘निष्क्रिय’ होते आणि व्याज बंद होते, असा एक समज आहे. हा नियम ५५ वर्षांनंतरच्या निवृत्तीला लागू होतो. वयाच्या ५५ व्या वर्षी निवृत्त झाल्यावर किंवा परदेशात कायमस्वरूपी स्थायिक झाल्यावर, अथवा सदस्याचा मृत्यू झाल्यावर जर सलग ३६ महिने (३ वर्षे) कोणताही दावा किंवा योगदान आले नाही, तरच ते खाते ‘निष्क्रिय’ घोषित केले जाते.

कर्मचाऱ्याचे वय ५८ पूर्ण झाल्यानंतर काय होते?

ईपीएफओ योजनेत कर्मचाऱ्याचे निवृत्तीचे वय ५८ वर्षे आहे. त्यामुळे ५८ वर्षे पूर्ण झाल्यावर पीएफ खात्यातील रक्कमेवर व्याज मिळणे पूर्णपणे थांबते. ५८ वर्षांनंतर व्याज मिळणे बंद होते, याचा अर्थ तुमचे पैसे गायब होतात असा नाही. मुद्दल आणि ५८ व्या वर्षांपर्यंतचे व्याज खात्यात सुरक्षितच असते, फक्त ५८ नंतर नवीन व्याज चक्रवाढ पद्धतीने वाढणे थांबते.

नवीन नोकरी लागल्यास काय करावे?

जर तुम्ही जुनी नोकरी सोडल्यानंतर काही काळाने दुसऱ्या पीएफ धारक कंपनीत रुजू झालात, तर जुन्या खात्यातील पैसे काढून घेण्याऐवजी ते नवीन खात्यात ट्रान्सफर करणे हाच सर्वोत्तम मार्ग मानला जातो. युनिव्हर्सल अकाउंट नंबरमुळे नोकरी बदलली तरी कर्मचाऱ्याचा पीएफ रेकॉर्ड सलग राहतो. जुना निधी नवीन खात्यात वर्ग केल्यास मोठ्या रक्कमेवर चक्रवाढ व्याजाचा अधिक फायदा मिळतो.

‘EPF व्याज’ आणि ‘EPS पेन्शन’ यात काय फरक आहे?

  • अनेक कर्मचारी ईपीएफच्या व्याजाचा संबंध थेट ‘कर्मचारी पेन्शन योजनेशी’ जोडतात. परंतु, हे दोन्ही स्वतंत्र विभाग आहेत.
  • ईपीएफ (भविष्य निर्वाह निधी) : ही तुमची स्वतःची आणि मालकाची जमा रक्कम असते, ज्यावर ५८ वर्षांपर्यंत व्याज मिळते.
  • ईपीएस (पेन्शन योजना) : पेन्शन मिळण्याचे नियम पूर्णपणे वेगळे आहेत. त्यासाठी किमान सेवा कालावधी आणि नियमांची पूर्तता आवश्यक असते. ५८ वर्षांपर्यंत पीएफवर व्याज मिळते याचा अर्थ ५८ व्या वर्षी आपोआप पेन्शन सुरू होईलच असे नाही.