PF Withdrawal UPI UAN Activation : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) ईपीएफ ३.० च्या माध्यमातून पीएफ व्यवस्थापित करण्याच्या पद्धतीत मोठे आधुनिकीकरण केले आहे. PF खात्यातून पैसे काढणे, नोकरी बदलल्यानंतर अकाउंट ट्रान्सफर करणे आणि UAN शी संबंधित सेवा अधिक वेगवान, पारदर्शक आणि डिजिटल बनवणे हा या बदलांमागील मुख्य उद्देश आहे. तुम्ही जर ईपीएफओचे सदस्य असाल तर हे ५ मोठे बदल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.
१. PF चे पैसे काही दिवसांत मिळणार
पीएफ धारकांसाठी हा महत्वाचा आणि मोठा बदल असणार आहे. पीएफ काढण्यासाठी पूर्वीची लांबलचक प्रक्रिया इतिहासजमा होणार असून लवकरच दावे ‘ऑटो-सेटलमेंट’ प्रणालीअंतर्गत आणले जाणार आहेत. सध्या ही सुविधा केवळ ५ लाख रुपयांपर्यंतच्या ॲडव्हान्स क्लेमसाठी उपलब्ध आहे. नवीन प्रणाली लागू झाल्यानंतर संपूर्ण PF काढण्याचे क्लेम आपोआप प्रोसेस होतील.
२. UAN ॲक्टिव्हेशनसाठी UMANG ॲप आणि ‘फेस ऑथेंटिकेशन’ अनिवार्य
UAN (Universal Account Number) ॲक्टिव्हेट किंवा जनरेट करण्याच्या पद्धतीत मोठा बदल करण्यात आला आहे. आता UAN ॲक्टिव्हेट करण्यासाठी कर्मचाऱ्यांना UMANG ॲपचा वापर करावा लागेल. तसेच, आधार आधारित फेस ऑथेंटिकेशन अनिवार्य करण्यात आले आहे. डेटा सुरक्षा वाढवणे आणि ऑनलाइन सेवा अधिक जलद करणे हा यामागील हेतू आहे.
३. नोकरी बदलल्यावर ऑटोमॅटिक PF ट्रान्सफर
नोकरी बदलणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ट्रान्सफर प्रक्रिया अत्यंत सोपी होणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांचा UAN आधारशी लिंक आहे आणि KYC पूर्ण आहे, त्यांचा जुन्या खात्यातील PF बॅलन्स नवीन कंपनीच्या खात्यात आपोआप जमा होईल. यासाठी स्वतंत्रपणे अर्ज करण्याची किंवा जुन्या व नवीन मालकांचे मंजुरी फेरे मारण्याची गरज भासणार नाही.
४. क्लेम सेटलमेंटसाठी कडक मुदत आणि १२% व्याज
आपात्कालीन परिस्थितीत अवघ्या २ दिवसात पीएफची रक्कम काढणे आता शक्य होणार आहे. यासाठी ईपीएफओ संस्थेने नियम कडक केले आहेत. पीएफ दावा २ दिवसांच्या आत निकाली काढण्यावर EPFO चा भर आहे. तसेच, EPS अंतर्गत पेन्शन क्लेमसाठी २० दिवसांची मुदत निश्चित करण्यात आली आहे. पैसे मिळण्यास विलंब झाला तर ईपीएफओला वार्षिक १२% दराने व्याज द्यावे लागेल.
५. UPI द्वारे थेट बँक खात्यात मिळणार पैसे
EPFO चे पैसे काढण्यासाठी आता कोणत्याही कार्यालयात चकरा मारण्याची गरज पडणार नाही. कारण, क्लेम सेटलमेंट प्रक्रिया थेट तुमच्या UPI खात्याशी जोडण्याची योजना आहे. या सुविधेमुळे PF सदस्य भीम ॲपच्या माध्यमातून थेट क्लेम करू शकतील. याचे पैसे सदस्याला UPI शी लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होतील.
