पीटीआय, नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निधी संघटना अर्थात ईपीएफओने आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी (ईपीएफ) खात्यात व्याज जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे आणि सदस्यांना १५ जुलैपर्यंत व्याजासह जमा झालेली अद्ययावत रक्कम पडताळून बघता येईल, असे कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी सांगितले.
सुमारे ३४ कोटी सदस्य खात्यांसाठी ८.२५ टक्के दराने वार्षिक व्याज स्वयंचलितपणे सदस्यांच्या खात्यात जमा केले जाईल. सदस्य १५ जुलैपर्यंत त्यांच्या पासबुकमध्ये जमा झालेले व्याज पाहू शकतील, असे मंत्री म्हणाले. व्याजापोटी एकूण अंदाजित रक्कम १.४४ लाख कोटी रुपये वितरित केले जातील.
‘ईपीएफओ’ने केंद्रीयकृत आयटी-सक्षम सेवा प्रणालीची अंमलबजावणी केल्यामुळे पीएफ खात्यांची ऑनलाइन पडताळणी शक्य झाली आहे. ‘ईपीएफ ३.०’ अंतर्गत सुरू करण्यात आलेला हा प्रकल्प सुविधा वाढवण्यासाठी, कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि सदस्यांना पारदर्शक व अखंड सेवा देण्यासाठी तयार करण्यात आला आहे.
गेल्या महिन्यात सरकारने भविष्य निर्वाह निधीवर ८.२५ टक्के व्याज देण्यास मंजुरी दिली होती. मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी व्याजाची रक्कम सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात जमा केली जात असे. अद्ययावत प्रणालीमुळे व्याज लवकर जमा करणे शक्य झाले आहे. तसेच सदस्य त्यांच्या एकूण शिल्लक पीएफ रकमेपैकी ७५ टक्क्यांपर्यंतची रक्कम काढू शकणार आहेत.
आता सदस्यांना त्यांच्या तपशीलांची माहिती पाहण्यासाठी, तसेच पीएफ शिल्लक रक्कम, दाव्याची सद्य:स्थिती, निवृत्ती वेतनपात्र सेवेच्या नोंदी आणि घेतलेले लाभ तपासण्यासाठी एकच ‘एकीकृत डिजिटल इंटरफेस’ उपलब्ध असेल. यामुळे त्यांच्या पीएफ खात्यांबाबतची माहिती आणि दावे सादर करण्याबाबत पारदर्शकता व सुलभता सुनिश्चित होईल.
